समृद्धी महामार्गाच्या सर्व परवानग्या पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |



लवकरच कामाला सुरूवात होणार


मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या असून महामार्गाच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महामार्गासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण आणि वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्याचे ते म्हणाले. विविध बँकेच्या व्यवस्थापक-प्रतिनिधींची बैठक सोमवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

 

मुंबई-नागपूर द्रूतगती समृद्धी महामार्गासाठीचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. हा देशातील महत्वाचा प्रकल्प असून हा महामार्ग राज्याला २० वर्ष पुढे घेऊन जाणारा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या महामार्गामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट होऊन अनेक उद्योगांना चालना मिळणार आहे. महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रामुळे शेतीचा आणि परिसराचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

आयात निर्यातीला चालना मिळणार

 

समृद्धी महामार्ग जेएनपीटीला जोडला जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीला गती मिळणार असून व्यापार-उद्योग वाढीस लागतील. हा महामार्ग खऱ्या अर्थाने राज्याला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना समृद्ध करुन राज्याचे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा महामार्ग असेल.

 

महामार्गाची लांबी ७१० किमी

 

समृद्धी महामार्गाची लांबी ७१० किमी असून हा महामार्ग दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तसेच या मार्गावर २४ कृषी समृद्धी केंद्रे असतील, अशी माहित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी दिली. तसेच तेथे कारखाने, दुकाने, वर्कशॉप असतील. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. हा महामार्ग अजिंठा, वेरुळ, लोणार ही पर्यटनस्थळे आणि शिर्डी, शेगाव या तीर्थक्षेत्रांशी जोडला जाईल. तसेच दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा आणि जालना-वर्धा येथील ड्राय पोर्ट हे जेएनपीटीशी जोडले जाणार आहे. हा महामार्ग जगातील उत्तम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन बांधण्यात येणार आहे. या कामासाठी १३ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व परवानग्या मिळाल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@