‘कलरीपयट्टू’चे मैदान गाजवणारी अम्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


सध्याच्या काळात मुलींनी मार्शल आर्ट शिकण्याची गरज आहे. कारण मार्शल आर्टमुळे आत्मविश्वास वाढतो. तुम्ही स्वतःची सुरक्षा तर करूच शकता, याउलट तुमचे मानसिक संतुलनही कधी बिघडत नाही.

 

केरळ, हे राज्य खरंतर त्याला लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्य व साधनसंपत्तीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पण केरळात एक अशी कला आहे, जी गेल्या शेकडो वर्षांपासून जपली जात आहे आणि तिचं जतन करणं हे खरंतर प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि ती कला म्हणजे, ‘कलरीपयट्टू’. भाले, लाठी आणि तलवारी यांचा वापर करून खेळला जाणारा कलरीपयट्टू हा एक मार्शल आर्टचाच प्रकार असून, अगदी प्राचीन काळापासून दक्षिण भारतातील विविध भागांत ही कला मुलांना आवर्जून शिकवली जाते. कलरीपयट्टू या खेळाबद्दल बरेच गैरसमज आहेत. कलरीपयट्टू ही कला ताइची आणि कुंगफू या मार्शल आर्टच्या प्रकारासारखी आहे, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, कलरीपयट्टू या कलेत लढण्याशिवाय स्वत:चा बचाव कसा करावा, याचेही प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ही कला केवळ वार करण्यासाठीच वापरली जाते असे नाही. त्यामुळे केरळात आजही प्रत्येक घरातील एक तरी मूल या युद्धनीतीचा अभ्यासक असतो आणि या मुलांसाठी ‘कलरीपयट्टू’ शिकवणारा त्यांचा गुरू हासर्वोच्चस्थानी असतो. अशीच एक ७५ वर्षीय गुरू गेली ६० वर्षे केरळमध्ये हा प्राचीन वारसा जपण्याचं काम करीत आहे. ती गुरू म्हणजे ’मीनाक्षी राघवन गुरुक्कल,’ ज्या केरळमध्ये गुरू अम्मा म्हणून प्रसिद्ध आहेत.

 

मीनाक्षी अम्मा यांचा कलरीपयट्टूची विद्यार्थिनी ते गुरू हा प्रवास फारच खडतर होता. ज्या वयात महिला आराम करत, देवाचं नामस्मरण करत, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असतात, त्या वयात मीनाक्षी अम्मा रोज सकाळी चार वाजता उठून व्यायाम आणि कलरीपयट्टूचा सराव करतात आणि तोही साडीत. खरंतर, कलरीपयट्टू शिकण्याची त्यांची लहानपणी विशेष इच्छा नव्हती, त्यांनी कथ्थक शिकायचे ठरवले होते. पण घरातले सगळे पुरुष कलरीपयट्टू शिकत आहेत, हे पाहून आणि कथ्थककरिता आपली लवचिकता वाढेल, या इराद्याने त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून कलरीपयट्टूचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मीनाक्षी अम्मांच्या मते, “केरळात मुलींनी कलरीपयट्टू शिकण्याचं प्रमाण आता वाढत असलं तरी, त्या काळात मुली नृत्यात जास्त रमायच्या आणि कलरीपयट्टू शिकल्याच तरी किशोरवयात सोडून द्यायच्या, मात्र माझ्या वडीलांनी मला माझ्या कलेशी एकनिष्ठ राहायला शिकवले.” मीनाक्षी अम्मांनी वयाच्या सातव्या वर्षी उत्साहात सुरू केलेला हा प्रवास वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंतही तेवढ्याच उत्साहात आजही कायम आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या वडीलांप्रमाणेच त्यांच्या पाठीशी नेहमीच उभे होते, ते म्हणजे त्यांचे गुरू आणि पती व्ही. पी. राघवन गुरुक्कल. मीनाक्षी अम्मांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून व्ही. पी. राघवन यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि नंतर वयाच्या सतराव्या वर्षी मीनाक्षी यांच्या वडीलांनी त्यांचा विवाह त्यांच्या गुरूंशी निश्चित केला. त्यावेळी राघवन यांनी मीनाक्षी यांचे कलरीपयट्टूचे प्रशिक्षण पूर्ण होण्याची वाट पाहिली आणि मग विवाहासाठी होकार दिला. याबाबत मीनाक्षी म्हणतात की, “आमचा प्रेमविवाह नव्हता, त्यामुळे त्यांनी मला नेहमी विद्यार्थिनी म्हणून आणि पत्नी म्हणून समान वागणूक दिली.”

 

मात्र, मीनाक्षी यांच्या तरुण वयातच, त्यांच्या पतीचे निधन झाले आणि सगळी जबाबदारी एकट्या मीनाक्षी अम्मांवर आली. आपल्या पतीची आणि वडीलांची कलरीपयट्टू या कलेसाठी असलेली आस्था टिकून राहावी, याकरिता त्यांनी केरळातील वटाकरा शहरात कढाथानंदन कलारी संगम नावाची मार्शल आर्टची शाळा सुरू केली आणि आज त्या शाळेत २५० हून अधिक विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या सर्वात जास्त आहे. मीनाक्षी अम्मांच्या मते, “सध्याच्या काळात मुलींनी मार्शल आर्ट शिकण्याची जास्त गरज आहे. कारण मार्शल आर्टमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही स्वतःची सुरक्षा तर करूच शकता, याउलट तुमचे मानसिक संतुलनही कधी बिघडत नाही.” आपली शाळा सुरू केल्यानंतर मीनाक्षी अम्मांनी काही काळ गावागावात फिरून मुलींना मोफत शिक्षण दिले होते. आजही त्या स्वत: मुलांना प्रशिक्षण देतात आणि त्यांच्याकडे शिकलेल्या मुलांनाच त्या गुरू म्हणून रुजू करून घेतात. काही वर्षांपूर्वी मीनाक्षी अम्मा यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर गाजला होता, ज्यात त्या एका तरुणाशी साडीवर तलवारबाजी करीत होत्या. या व्हिडिओमुळे त्या आज जगभरात प्रसिद्ध आहेत.

 

भारताची एक प्राचीन कला जोपासण्यासाठी मीनाक्षी अम्मांनी दिलेल्या योगदानाकरिता त्यांना २०१७ साली शासनाच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांचे केरळमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केलेले वक्तव्य खरंच प्रेरणादायी आहे, “तुम्हाला जेव्हा पुरस्कार मिळतो, याचा अर्थ तुम्ही काहीतरी कमावले आहे, असा होत नाही, तुमच्यावर आणखी जबाबदारी आली आहे, असा होतो. आज भारतात महिला सुरक्षित नाही, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा मला वाईट वाटते, कारण ज्या कलेची मी सेवा केली ती कला सगळ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत देशातील प्रत्येक महिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तोपर्यंत मी या कलेचे जतन करणार.”

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@