आगीपासून मुंबईला वाचवण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019   
Total Views |
 

विकासकांनी वा इमारतीच्या मालकांनी थोड्याशा बचतीकरिता भ्रष्टाचार करून अग्निसुरक्षा यंत्रणा बसविणे टाळू नये. सर्व नियम पाळून, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, फायर हायड्रंट प्रणाली, फायर एक्झिट आदी साधने लावावीत.

 

लोअर परळच्या कमला मिल-हद्दीमध्ये एका वर्षापूर्वी इमारतीच्या गच्चीवर नवीन बांधलेल्या वन अबव्ह व मोजोज बिस्ट्रो हॉटेल्समध्ये मोठी आग लागून १४ माणसे मरण पावली होती, परंतु त्यानंतर विकासकांनी व पालिकेने योग्य तो धडा वा खबरदारी न घेतल्याने २०१८ मध्ये अशाच प्रकारच्या आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसली. मुंबईतील अग्निशमन दल व महापालिकेच्या विशेष चौकशी पथकांनी कमला मिल आगीच्या प्रकरणानंतर अग्नि-प्रतिबंधक नियमांचे पालन न करणार्‍या निवासी व व्यावसायिक इमारतींची पाहणी केली होती व नियमभंग करणार्‍या इमारतींवर कायदेशीर इलाज म्हणजे नोटीस पाठविणे, दंड करणे इत्यादी बजावले होते. दरम्यानच्याच काळात कमला मिल आगीच्या दुर्घटनेची रीतसर चौकशी झाली व दोषींना शिक्षा सुनावली गेली आहे. पुढे काय याचा पाठपुरावा मात्र बहुतेक झालेला दिसत नाही. त्यामुळे २०१८ मध्ये अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. २०१७ च्या वर्षात आगीमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या २५ होती तर २०१८ मध्ये ती वाढून आगीच्या सुमारे दुप्पट घटना घडल्या आहेत. या आगींमध्ये कितीजण बळी पडले व कितीजणांना दुखापती झाल्या, यासंबंधीचा तपशील मुंबई महापालिका बाळगते व त्याप्रमाणे २०१८ सालात आगीमुळे ३६४ जणांना दुखापती झाल्या व ४३ जण आगीमुळे मृत्युमुखी पडल्याचे समोर आले. सरकारी माहितीप्रमाणे २००८ ते २०१८ या काळात ४९ हजारहून अधिक आगी लागल्या व त्यात ६०९ माणसे दगावली.

 

डिसेंबर २०१८ मधील काही मोठ्या आगींची माहिती अशी

 

४ डिसेंबर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये ४ किमीच्या परिसरात मोठी आग लागली. वनवासी लोकांची घरे यात होरपळली, अस्ताव्यस्त झाली. झाडे कोलमडून पडली. हा आगीचा वणवा कसा लागला, याची माहिती नाही. तरीही ही आग कोणीतरी मुद्दाम लावली, असा तर्कही काहींनी केला आहे.

 

१७ डिसेंबर : अंधेरी पूर्व मरोळ येथील कामगार रुग्णालयात वेल्डींग स्पार्कमुळे आग लागली. २ महिन्यांच्या बालकासह एकूण १० जण मृत्युमुखी पडले आणि १४७ जणांना दुखापती झाल्या. या जखमींना ७ रुग्णालयांत उपचाराकरिता पाठविण्यात आले. सुप्रीम कन्स्ट्रक्शनचे मुख्य अभियंता निलेश मेहता व सहायक नितीन कांबळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. इमारतीचे बांधकाम अजून अर्धवट स्थितीत आहे. सेंट्रल एसी बसविण्यासाठी वेल्डींगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे नक्की झाले. या इमारतीला ग्लासच्या म्हणजेच काचेच्या भिंती आहेत. त्यामुळे आग लागल्यावर धूर जायला जागा मिळू शकत नव्हती. परिणामी बरीच माणसे गुदमरली व जखमी झाली. ही आग प्रसुतीगृहापर्यंतदेखील पसरली होती, ज्यात अनेक नवजात अर्भके व स्त्रिया सापडल्या. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाकडे चौथ्या माळ्यापर्यंतची आग विझविण्याची यंत्रणा नाही. या कामगार रुग्णालयाची एक जुनी चार माळ्याची इमारत व बाजूला ७ माळ्यांची अनधिकृतपणे काचेच्या भिंतींची इमारत बांधून तयार होत आहे. पहिल्या माळ्याकडून नवीन इमारतीला प्रवेश दिला आहे. यात दोन्ही इमारतींमध्ये ३२५ कॉटची सोय केली आहे. सर्जरी व गायनॅकॉलॉजी विभाग असल्याने येथे रुग्णांची कायम गर्दी असते. परंतु, नियम डावलून फक्त एकच प्रवेशद्वार व गमनद्वार ठेवले गेले आहे. सेंट्रल एसी डक्टचे काम सुरू होते. स्प्रिन्क्रलर व फायर अलार्म प्रणाली काम करत नव्हत्या. काचेची भिंत व इमारत यातल्या फटीमध्ये आग लागल्यावर धावत असताना काही रुग्ण अडकले व मृत्युमुखी पडले. या कामगार रुग्णालयांना कामगारांच्या विम्याच्या हप्त्यामधून मोठा निधी (सुमारे रु. ५० हजार कोटी) उपलब्ध होतो, पण अग्निसुरक्षेचे नाव निघाताच या रुग्णालयांची कार्यवाही व तयारी शून्यवत असल्याचेच लक्षात येते व त्याचे आश्चर्यही वाटते.

 

२७ डिसेंबर : चेंबूरमधील टिळकनगरच्या सरगम सोसायटीच्या १५ माळ्याच्या इमारतीला आग लागली. ५ जण मृत्युमुखी पडले. ते सर्वजण ज्येष्ठ नागरिक होते. शंभरहून अधिकजण जखमी झाले. ११ व्या माळ्यावरील घरातील गॅसच्या स्फोटामुळे अग्निशमनच्या व पालिकेच्या अधिकार्‍यांनासुद्धा ते निरीक्षण करत असताना श्वास घेण्याचा त्रास झाला. या स्थानापर्यंत पोहोचण्याच्या अरुंद रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या केलेल्या असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहने आगीच्या ठिकाणावर वेळेवर पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे आग विझविण्यास विलंब लागला. आता या प्रकरणी ३ विकासकांवर पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. इमारतींसाठी निवास प्रमाणपत्र (OC) न घेता, अग्निशमन व्यवस्था कार्यान्वित न करता रहिवाशांचे पुनर्वसन करणे आणि आपत्कालीन मार्ग बंद करणे असे आरोप विकासकांवर लावण्यात आले आहेत. टिळकनगरच्या १६८ पुनर्वसनाच्या इमारतींपैकी ९० टक्के इमारतींना अजून निवास प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत.

 

२९ डिसेंबर : वरळी बीडीडी चाळीच्या मागे साधना मिल कंपाऊंडमधील साधना हाऊसच्या आगीत १६ अग्निशमन जवानांना औषध कंपनीच्या काळ्या धुरामुळे आजारी पडल्यामुळे रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रयोगशाळेतील एक जण मृत्युमुखी पडला. अग्निशमन अधिकार्‍यांना समजत नव्हते की, या महिन्यात एवढ्या आगी कशा लागल्या. कारण अग्निशमन दलाच्या पथकांनी डिसेंबर २७ ते डिसेंबर ३० पर्यंत चार दिवसांत ३७७ इमारतींची अग्निप्रतिबंधक नियमानुसार त्यांनी साधने उभारली आहेत का, यासंबंधी तपासणी केली असता त्यांना ३१ इमारती नियमभंग करीत होत्या, असे आढळले. त्यांनी आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक ठिकाणी अग्निसुरक्षाविषयक तपासण्या केल्या व १७ हजार ठिकाणच्या संबंधितांवर कारवाई केली आहे. अग्निशमन दलाने अग्निशमन नियमभंग करणार्‍या इमारतीमधील अनधिकृत वाढविलेली कामे तोडून टाकण्यास सांगितले, गमनमार्ग अडवणूक करणार्‍या कित्येक इमारतीतील अतिक्रमणे तोडून टाकण्यास सांगितले व २ हजार १०७ इमारतीतील अनधिकृत ज्वालाग्राही माल जप्त केला. नियम धाब्यावर बसविणार्‍या ठिकाणांना टाळे ठोकले आहे. रुग्णालये, शाळा अथवा उंच इमारती निवासी वा व्यावसायिक इमारतींच्या अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीत आढळलेल्या त्रुटी नोंद केल्यावर व संबंधितांना त्यात सुधारणा करण्याची शिफारस केल्यावर त्या इमारतीच्या मालकांना संधी देण्यात येते, परंतु त्या मालकांनी सुधारणा केल्या का नाही हे पडताळून तपासण्याची यंत्रणा अग्निशमन दलाकडे नाही. कदाचित पुरेसे मनुष्यबळ नसावे. आधीच्या काळात गेल्या ७ वर्षांत अग्निशमन दलाच्या पथकांनी मुंबईतील खाजगी व सरकारी, निमसरकारी अशा २५० रुग्णालयांची अग्निशमन नियमांना निर्देशून पाहणी केली. त्यातील कित्येक रुग्णालयांनी नियमभंग करून अग्निशमन व्यवस्था चोख ठेवली नव्हती. उपाययोजनांची पडताळणी केलेली नव्हती तसेच पाचही पालिका रुग्णालयांनी अग्निशमन कामे नियमाप्रमाणे ठेवली नव्हती. गेल्या काही वर्षात मुंबईतील छोट्या-मोठ्या रुग्णालयांमध्ये ६० आगीच्या घटना घडल्याची अग्निशमन नियंत्रक कक्षामध्ये नोंद झाली आहे. यापैकी अनेक घटना सदोष अग्निशमन यंत्रणेमुळे घडल्याचे उजेडात आले आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या (BSE) अधिकार्‍यांना त्यांच्या स्थळाच्या ठिकाणी थोडेफार बदल करण्यास सांगितले व काही हॉटेल्समध्ये जादा स्प्रिन्क्रलर व स्मोक डिटेक्टर लावण्यास सांगितले. मफतलाल जिमखान्याच्या ठिकाणी ३ जादा गॅस सिलिंडर सापडले. ते अग्निशमन पथकाने जप्त केले.

 

आगीच्या दुर्घटना थांबविण्याकरिता सरकारने व पालिकेने काय कृती कराव्यात?

 

इमारतींची अग्निप्रतिबंध व्यवस्था चोख राहण्याकरिता कडक नियम ठेवावेत. नियमभंग करणार्‍यांना कडक शासन करण्यात यावे. उंच इमारतींची आग विझविण्याकरिता वा अडकलेल्यांची सुटका करण्याकरिता हेलिकॉप्टरची सोय करावी. रासायनिक आगी विझविण्याकरिता वेगळी व्यवस्था व वाहने ठेवावीत. पालिकेच्या नगरसेवकांना पालिकेकडून श्वेतपत्रिका काढा, म्हणून आग्रह होत आहे. ती लवकर काढावी. त्यात अग्निशमन दलाला बळकट कसे करणार व त्यांचे मनुष्यबळ कसे वाढविणार याचा विचार करावा, तसेच आधुनिक अग्निशमनाची साधने कमी पडत असतील तर ती घेण्याची व्यवस्था करावी. नवीन मंजुरी मिळालेले फ्लोटिंग पंप लवकर उपलब्ध करावेत. मुंबईच्या लोकसंख्येला पुरी पडतील, अशी अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवावी. सर्व इमारतींचे विजेचे ऑडिट करावे. प्रत्येक गाळाधारकाने शॉर्ट सर्किट झाल्यावर सुरक्षितता म्हणून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ELCB) लावावे, कारण अनेक आगी लागतात. त्यात शॉर्ट सर्किटमुळे आगी लागतात, अशी नोंद झाली आहे. गॅस सिलिंडरमुळेही काही आगी लागतात ते पण इमारतीतील गॅस वापरणार्‍यांनी तपासून घ्यावेत.

 

विकासकांनी अग्निसुरक्षेचे नियम पाळावेत

 

विकासकांनी वा इमारतीच्या मालकांनी थोड्याशा बचतीकरिता भ्रष्टाचार करून अग्निसुरक्षा यंत्रणा बसविणे टाळू नये. सर्व नियम पाळून, स्मोक डिटेक्टर, स्प्रिन्कलर, फायर अलार्म, फायर हायड्रंट प्रणाली, फायर एक्झिट व रिफ्युझ रूम इत्यादी साधने लावावीत. इमारती बांधण्याकरिता रस्ता छोटा असेल तर उंच इमारती बांधू नये. दर ३ महिन्यांनी अग्निसुरक्षा साधनांचे मॉक ड्रिल करण्याची व्यवस्था करावी व ताबा दिल्यानंतर वापरणार्‍यांना प्रशिक्षण द्यावे. असे केले तर आगींचे प्रमाण कमी होईल व आगीच्या दुर्घटनेत अनेक जणांचे जीव जाणे कमी होईल व प्रॉपर्टी नष्ट होण्याची व्याप्तीदेखील कमी होईल. इमारत अ‍ॅथॉरिटीने रस्त्याच्या व अग्निशमन दलाच्या मनुष्यबळाच्या व अद्ययावत साधनांच्या अडचणींची दखल घेऊन अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवणे आदी बाबींकडे त्वरित लक्ष द्यावे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@