पर्यायाची पर्याप्तताही पुसटच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019   
Total Views |



लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असून देशातील राजकीय वातावरणातही ही गरमागरमी दिवसेंदिवस वाढतच जाणार, यात शंका नाहीच. सध्या ही ‘राजकीय स्पेस’ ‘नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी’ यांच्या वादाविवादांवरूनच व्याप्त झाल्याचे दिसते. त्यात मग पुन्हा तिसरी आघाडी, फेडरल फ्रंटवाले अधूनमधून डोके वर काढतात आणि महागठबंधनाची तात्पुरती गाठ तरी बांधण्याचा प्रयत्न करतात. पण, या शर्यतीत आपण याही गटाचे नाही आणि त्याही गटाचे नाही, म्हणून अस्तित्व टिकविण्याच्या धडपडीत असलेल्या अरविंद केजरीवाल यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसते. त्यांचे ना काँग्रेसशी सख्य आणि भाजपशी तर उभे भांडण! म्हणूनच, तर नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “नरेंद्र मोदी कुणालाही परत नकोयत. त्यामुळे भाजपलाही मत देऊ नका आणि त्याचा पर्याय म्हणून काँग्रेसलाही मत देऊ नका. तुमचे मत द्या ते ‘आप’ला.” केजरीवालांचेही बरोबरच म्हणा, कारण शेवटी त्यांनाही पक्ष चालवायचा आहे, मग निवडणुका तर लढवाव्याच लागतात आणि मतांसाठी मतदारांना साकडे घालावेच लागेल. पण, भाजप नको, काँग्रेस नको म्हणून ‘आप’ला मतं द्या, या ‘दिल्ली पॅटर्न’ची पुनरावृत्ती राष्ट्रीय पातळीवर होऊ शकते, असे केजरीवालांना स्वप्नात तरी वाटलेच कसे? यालाच म्हणतात अतिआत्मविश्वास! अतिआत्मविश्वासाच्या जोरावर हेच केजरीवाल २०१४ सालीही मोदींच्या विरोधात दंड धोपटून वाराणसीच्या मैदानात उतरले होते. दिल्ली जिंकली, तशी वाराणसीही काबीज करू, या आवेशात केजरीवालांनी मोदींना आव्हान दिले. पण, मतदारांनी केजरीवालांना त्यांची जागा दाखवून दिली. तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी केजरीवालांना पराभव स्वीकारावा लागला होता. हे सगळे आज कदाचित केजरीवाल सहजगत्या विसरले असले तरी जनतेची स्मरणशक्ती अजूनही शाबूत आहे. त्यामुळे ‘मोदी नको’ हे रेटणारी काही टाळकी असली तरी ‘मोदीच हवेत’ या विचारांनी प्रेरितही कोट्यवधी मतदार आहेतच. तेव्हा, केजरीवालसारख्यांनी राष्ट्रीय राजकारणाचा उंबरठा चढण्याची पुन्हा खरं तर चूक करू नये. पप्पू आज जितका बदनाम आहे, तितकीच केजरीवालांची प्रतिमाही विश्वासार्ह नक्कीच नाही. त्यामुळे केवळ दिल्ली जिंकली, म्हणजे राष्ट्रीय निवडणुका खिशात घालता येतील, या भ्रमात केजरीवालांनी २०१९ मध्ये तर अजिबात राहू नये. कारण, केजरीवालांची, आम आदमी पक्षाची पर्याय म्हणून पर्याप्तताही पुसटच म्हणावी.

 

सोनिया आऊट, प्रियांका इन

 

१९७७-८० आणि १९९६-९८ आणि १९९८-९९ अशा तीन लोकसभा निवडणुका वगळता उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघावर काँग्रेसचेच निर्वावाद वर्चस्व राहिले. १९६७-७७ या प्रदीर्घ काळातही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी याच रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या. त्यानंतर शीला कौल, सतीश शर्मा या काँग्रेसी निष्ठावंतांनीही रायबरेलीचा काँग्रेसी गड अभेद्य ठेवला. म्हणूनच मग इतक्या सुरक्षित मतदारसंघात २००४, २००९ आणि २०१४ सालीही तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच निवडून आल्या. पण, आता वयोमानापरत्वे लोकसभा निवडणुकाही लढणे शक्य नसल्याने रायबरेलीचा हा काँग्रेसी वारसा सोनियांची कन्या प्रियांका वढेरा यांच्याकडे सोपविला जाण्याची राजकीय चर्चा मतदारसंघात जोरात सुरू असल्याचे वृत्त आहे. तसे झाल्यास, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपापला मतदारसंघ राखल्यास, प्रियांका आणि राहुल गांधी ही सख्ख्या भावाबहिणीची जोडी लोकसभेत एकत्र दिसू शकते. खरंतर प्रियांका गांधी या राजकारणात वरकरणी सक्रिय नसल्या तरी पडद्यामागे त्यांची भूमिका कायमच बजावत राहिल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका असो वा मुख्यमंत्रिपदाची माळ राजस्थान आणि मध्य प्रदेशात कोणाच्या गळ्यात घालायची, यासंबंधीची रणनीती; प्रियांका गांधी भावाच्या मदतीला नेहमीच धावून आल्या. एवढेच काय, तर राहुलऐवजी प्रियांकाच्या हाती काँग्रेसचे नेतृत्व सोपवले पाहिजे, या विचारांनीही मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना वेगळाच हुरूप चढला होता. पण, प्रियांकाला पुढे केले, तर राहुलचे नेतृत्व डावलल्यासारखे होईल, म्हणून प्रियांकाला बॅकफूटवर ठेवले गेले. पुढेमागे गरज पडल्यास प्रियांकाचा वापर ‘हुकूमी एक्का’ म्हणून करण्याची ही काँग्रेसची रणनीती असू शकते. त्याची सुरुवात २०१९ पासून होईल का, हे आगामी काळात कळेलच. पण, प्रियाकांचे पती आणि ‘देश का दामाद’ रॉबर्ट वढेरा यांच्यावर वेळोवेळी झालेले आर्थिक अफरातफरीचे, हितसंबंधांचे आरोप लक्षात घेता, प्रियांकाविरुद्ध प्रचारातील तो एक मोठा अडसर ठरू शकतो. त्यामुळे ‘सोनिया आऊट’ आणि ‘प्रियांका इन’ झाल्या तरी रायबरेलीचे भवितव्य उजळेल की नाही, ते माहीत नाही, पण घराणेशाहीचे एक पाऊल पुढे पडेल, यात शंका नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@