नसिरुद्दीनच्या ‘जमीर’ची गोष्ट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |


 


ज्यांनी एकसंध भारतीय समाजात आगी लावून त्या निखाऱ्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याच्या उठाठेवी केल्या, त्यांच्यासाठी नसिरुद्दीन शाह छाती पिटत आहेत. सोबतच नसिरुद्दीन शाह यांनी माओवाद्यांची बाजू घेऊन परकीयांच्या निधीवर पोसलेल्यांच्या हातातला ‘मोहरा’ होऊन आपला ‘जमीर’ विकण्याचा धंदा केल्याचेच या व्हिडिओतून दिसते.


ईन्सान की सबसे बडी गॅरंटी उसका अपना जमीर होता है,” अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या तोंडचा ‘मोहरा’ चित्रपटातील हा संवाद. ‘जमीर’ म्हणजे विवेक वा सद्सद्विवेकबुद्धी. जसजशा २०१९ च्या लोकसभा निवणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा स्वतःला लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णू म्हणविणाऱ्यांच्या वर्तुळातून विचारवांत्यांचा रतीब सुरू झाल्याचे दिसते. डिसेंबर महिन्यातच नसिरुद्दीन शाह, “भारतात मला माझ्या मुलाच्या सुरक्षेची काळजी वाटते,” असे तारस्वरात बोलले होते. त्यानंतर अमोल पालेकरांनीही नसिरुद्दीनची तळी उचलत, नव्हे त्यापेक्षा एक पाऊल पुढे जात आमिर खान आणि नसिरुद्दीन शाह यांना ते केवळ मुस्लीम असल्यानेच लक्ष्य केले जात असल्याचे तर्कट लावले होते. दरम्यानच्याच काळात गेल्या साडेचार वर्षांपासून सरकारकडून मिळणारा रमणा बंद झाल्याने साहित्यिक, लेखक, बुद्धिजीवी आणि मानवाधिकारवाल्यांनी ‘आर्टिस्ट युनाईट’च्या बॅनरखाली देशातली लोकशाही वाचविण्याची हाकाटी दिली. आता पुन्हा एकदा नसिरुद्दीन शाह यांनीच अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेशी संधान बांधून एक व्हिडिओ प्रसारित केला आणि आपला ‘जमीर’ नेमका कुठे पेंड खातो, याची साक्ष दिली. नसिरुद्दीन शाह यांनी “देशात सध्या द्वेष आणि क्रौर्याने हैदोस घातला असून त्याविरोधात आवाज बुलंद करणाऱ्यांच्या घरी छापेमारी करून त्यांची बँक खाती गोठवली जात आहेत. राज्यघटनेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बळाचा वापर करून दडपले जात आहे,” यासह समाजवादी, साम्यवादी टोळक्यांना आवडतील, अशी आणखीही बरीच विधाने आपल्या व्हिडिओतून केली. नसिरुद्दीन शाह यांनी या व्हिडिओतून जो काही राज्यघटना आणि लोकशाही वाचविण्याचा आव आणला आहे, तो खरोखर वाखाणण्याजोगाच म्हटला पाहिजे! काय ती त्यांची राज्यघटनेप्रतिची निष्ठा, काय तो त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास, काय ती त्यांची पीडितांबद्दलची कळकळ आणि काय ती त्यांची सामाजिक एकता व सलोखा अबाधित राखण्याची चिंता करणारी भाषा! पण, नसिरुद्दीन शाह यांनी हे खरेच केले ते नेमके कोणासाठी? इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी? शेतात कष्ट करणाऱ्या अन्नदात्यासाठी? खाणीत, कंपनीत, कारखान्यात राबणाऱ्या कामगारांसाठी? नव्हे, नव्हे! नसिरुद्दीन शाह यांनी ही सगळी तोंडाची वाफ दवडली ती फक्त आणि फक्त रक्तरंजित क्रांतीसाठी धडपडणाऱ्या माओवाद्यांसाठी, देश तोडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या देशद्रोह्यांसाठी आणि न्यायालयाचे, लोकशाहीचे, राज्यघटनेचे नाव घेऊन प्रत्यक्षात देशातल्या सर्वच व्यवस्थांना उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधलेल्या विषवल्लीसाठी!

 

कोरेगाव-भीमा येथे गेल्या वर्षी उसळलेल्या हिंसाचारातून एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभं करण्याची खेळी उघड झाली. सुरुवातीला हिंदुत्ववादी व्यक्तींवर आणि संघटनांवर दंगल पसरवण्याचा आरोप करण्यात आला, पण नंतर मात्र तपासयंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली व सूत्रधारांना अटकही केली. तपास यंत्रणांच्या चिवटपणामुळे समाजाच्या संघटितपणाचे तुकडे तुकडे करण्यासाठी खपणाऱ्या माओवाद्यांचे कपटकारस्थान उजेडात आले. सुधा भारद्वाज, वरवरा राव, गौतम नवलखा, अरुण परेरा आणि वर्नन गोन्साल्विस यांना बेड्या ठोकल्या गेल्या. ही सर्वच मंडळी समाजात प्रतिष्ठित म्हणून ओळखली जात असत. पण तपास यंत्रणांनी त्यांना गजाआड केल्यानंतर एकेकाच्या चेहऱ्यावरचा बुरखा टराटरा फाटत गेला आणि मुखवट्यामागे लपलेला भेसूरपणा समोर आला. आज नसिरुद्दीन शाह गळा काढत आहेत, ते या लोकांसाठी! ज्यांनी एकसंध भारतीय समाजात आगी लावून त्या निखाऱ्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याच्या उठाठेवी केल्या, त्यांच्यासाठी नसिरुद्दीन शाह छाती पिटत आहेत. ज्या लोकांच्या घरादारांवर तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या, बँक खाती गोठवली ते सगळेच लोक राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी नव्हे तर आपल्या आसुरी महत्त्वाकांक्षेने तिचे भक्षण करण्यासाठीच कार्यरत होते. हे लोक समाजात प्रेमभावाचे सिंचन करण्यासाठी नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारे बुद्धीभेद करून द्वेषाच्या, मत्सराच्या, हिंसेच्या काड्या पेटविण्यासाठीच राबत होते. माओवादी विचारसरणीच्या या लोकांनी पांढरपेशा मुखवटा परिधान करून शहरात आपल्या हिंसक विचारांची पेरणी केली. वंचितांच्या, पीडितांच्या, कष्टकर्‍यांच्या हक्कासाठी लढण्याचा देखावा उभा करत प्रत्यक्षात लोकशाही व्यवस्थेलाच खिळखिळे करण्याचे प्रयत्न केले. शहरी माओवाद म्हणतात तो हाच, ज्याने हाती शस्त्र घेऊन नव्हे तर हाती शस्त्र घेण्यासाठी प्रवृत्त होणार्‍यांच्या झुंडीच्या झुंडी तयार करण्याचेच उद्योग केले. ओठावर एक आणि पोटात दुसरे, अशी कार्यशैली असलेल्या या लोकांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या मनात आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी देशाविरोधात, समाजाविरोधात, व्यवस्थेविरोधात विष आणि विषच कालवले. माओवादाचा गांजा लावून विद्यापीठांत, संशोधन-प्रशिक्षण संस्थांत विघटनाची बीजे रोवली. नसिरुद्दीन शाह दलाली करतायत ती या लोकांची! वा रे वा! इतके दिवस एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इसमाने आपला खरा रंग दाखवला तो असा! काहीच दिवसांपूर्वी नसिरुद्दीन यांनी आपल्या देशभक्तीची ग्वाही दिली होती. शाह यांच्या देशभक्तीची व्याख्या नेमकी काय, याची प्रचिती इतक्या लवकर येईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण नसिरुद्दीन शाह यांनी स्वतःच्याच तोंडाने माओवाद्यांचे समर्थन करत शहरी माओवादाचा शिक्का आपल्या भाळी लावून घेतला. लवकरच गिरीश कर्नाड वगैरेंसारख्यांनी जसे ‘आय अॅम अर्बन नक्सल’ची पाटी लटकावून मिरवण्याचे काम केले, तसे नसिरुद्दीन शाहदेखील करताना दिसल्यास नवल वाटणार नाही.

 

नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या व्हिडिओतून राज्यघटनेचा जप करत ‘इन्साफ’ची मागणी केली, तसेच देशभरात द्वेषाने, जुलमाने उच्छाद मांडल्याची, ‘मजहब’च्या नावाखाली द्वेषाच्या भिंती उभारल्या जात असल्याची, निष्पापांच्या दिवसाढवळ्या हत्या केल्या जात असल्याची टेप वाजवली. सोबतच सरकारने कलाकारांवर, लेखकांवर बंदी घातल्याचेही ते म्हणाले. पण त्याचे दाखले मात्र त्यांनी दिले नाहीत. म्हणूनच नसिरुद्दीन शाह यांची ही सगळीच विधाने पाहिली, ऐकली की, त्यांना मेंदूविकारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचेच स्पष्ट होते. ‘हेमिस्पॅशियल निग्लेक्ट’ नावाचा एक विकार या क्षेत्रातील अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना माहिती असेल. ज्यात या विकाराने ग्रासलेल्या व्यक्तीला भोवतालच्या जगाचा फक्त निम्मा भाग दिसतो. नसिरुद्दीन शाह सध्या या विकाराने ग्रासलेले असावेत, म्हणून त्यांना आपल्या डाव्या बाजूचे तर दिसते पण उजव्या बाजूचे काहीही दिसत नाही. नव्वदच्या दशकात धर्मांध मुस्लीम अतिरेक्यांनी काश्मिरी पंडितांना काश्मीर खोऱ्यातून हाकलून लावल्याचे, २००२ साली गोध्रा स्थानकावर रेल्वेचा डबा पेटवून जाळलेले कारसेवकांचे मृतदेह, २०१२ साली रझा अकादमीच्या गुंडांनी आझाद मैदानावर घातलेला धुमाकूळ, काँग्रेस आघाडीच्या काळात सदानकदा बॉम्बस्फोटांनी हादरणारा देश आणि हिंदू दहशतवादाच्या खोट्या कथा रचून निरपराधांना गोवले जाण्याचे षड्यंत्र दिसत नाही. जे काही दिसते ते फक्त डाव्या मेंदूने आणि ते व्यक्तही होतात ते याच डाव्या विचारांच्या आधारावर. या लोकांची एक धारणा झालेली आहे, ती म्हणजे देशात जे काही वाईट झाले ते फक्त गेल्या साडेचार वर्षांत! याला ‘हेमिस्पॅशियल निग्लेक्ट’ नाही तर दुसरे काय म्हणणार? अपवाद वगळता गेल्या साडेचार वर्षांइतके सहिष्णू वातावरण देशात कुठे दिसले नाही, असे म्हणण्यासारखी परिस्थिती सध्या आहे. कदाचित याच वातावरणामुळे देशविघातक शक्तींना आपल्या पाताळयंत्री कारवायांची पूर्ती करता येत नसेल. म्हणून नसिरुद्दीन शाहसारख्यांच्या तोंडून ते आपल्या मनातली खदखद वदवून घेत असावेत. आमिर खानसारख्या महागड्या अभिनेत्यापेक्षा स्वस्तात बडबडणारा विदूषक मिळाल्याने या शक्तींनाही हायसे वाटत असेल! दुसरीकडे अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि तिच्यासारख्या अनेक संस्थांचे दुःखदेखील यातून कळते. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून बेकायदेशीर कामे करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे कामकाज थांबले, निधी आटला. परिणामी या संस्थांकडून मोदी सरकारच्या बदनामीची मोहीम चालवली जाणे साहजिकच. नसिरुद्दीन शाहदेखील या बदनामीकरण मोहिमेचाच एक भाग. म्हणूनच त्यांनी परकियांच्या निधीवर पोसलेल्यांच्या हातातला ‘मोहरा’ होऊन आपला ‘जमीर’ विकण्याचा धंदा या व्हिडिओच्या माध्यमातून केल्याचे दिसते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@