निरपेक्ष सेवा हा भारताचा मूळ विचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019
Total Views |


 


पुणे : “समाजाची निरपेक्ष सेवा करणे, हा भारताचा मूळ विचार आहे कारण, ‘सेवा परमो धर्मः’ असे आपल्या सर्व शास्त्रांमध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेवाकार्ये ही याच विचाराला धरून सुरू आहेत,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सेवाप्रमुख पराग अभ्यंकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागामार्फ प्रकल्पांची एकत्रित माहिती देणाऱ्या ‘सेवा गाथा’ या मराठीतील संकेतस्थळाचे अनावरण प्रसिद्ध उद्योजक प्रकाश धोका यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अभ्यंकर बोलत होते. यावेळी सेवा विभागाचे प्रांत प्रमुख प्रा. अनिलजी व्यास उपस्थित होते.

 

यावेळी अभ्यंकर म्हणाले की, “संघ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी सेवा कार्ये चालू आहेत. त्यांची माहिती लोकांपुढे यावी, असा विचार दीड-दोन वर्षांपूर्वी पुढे आला. समाजातील शेवटच्या थरातील व्यक्तीचे उत्थान झाल्याशिवाय देशाला परमवैभव मिळणार नाही. रा. स्व. संघाची बहुतेक सेवाकार्ये ही अशाच वर्गांत आहेत. ही सर्व सेवाकार्ये निःशुल्क आहेत. एवढे परिणामकारक कार्य लोकांपर्यंत जायला हवे, म्हणून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. आज सर्वत्र केवळ नकारात्मक बातम्या वाचायला व पाहायला मिळतात. त्यावर या संकेतस्थळावरील यशकथा हा उपाय आहे.”

 

व्यास म्हणाले की, “आपल्या सेवाकार्यात खूप वैविध्य आहे. सेवाकार्यातील प्रयोग या माध्यमातून पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी हा प्रवास सुरू झाला आणि आज या संकेतस्थळाच्या रूपाने तो पूर्ण झाला आहे.” यावेळी बोलताना उद्योजक प्रकाश धोका म्हणाले की, “जग डिजिटल होत आहे आणि वेगाने पुढे जात आहे. आपल्यालाही जगासोबत जावे लागेल. आपल्याला लोकांना माहिती द्यावीच लागेल आणि लोकांना या कामांची माहिती मिळालीच पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या माध्यमांचा उपयोग करून घ्यावा.” या संकेतस्थळाची माहिती देताना महेश पोहनेरकर म्हणाले की, “वनवासी कल्याण आश्रमापासून शहरी भागातील दलित, उपेक्षित घटकांसाठीची शेकडो सेवा कार्यही सुरू आहेत. संघ कार्यकर्त्यांचे हे कार्य लोकांसमोर यावे या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे या प्रकल्पांच्या यशोगाथा नागरिकांसमोर आणण्याचा उद्देश आहे.”

 

विविध यशोगाथा

 

‘www.sewagatha.org’ असा या संकेतस्थळाचा पत्ता असून या संकेतस्थळावर चित्रकूटच्या नानाजी देशमुखांपासून छत्तीसगढच्या चंपा भागात करणारे कात्रेगुरुजी, कर्नाटकच्या दुर्गम भागात काम करणारे अजित कुमार, उत्तराखंडच्या प्रलयानंतर पर्यावरणपूरक विकास मॉडेलचे प्रेरक आणि त्यामधून अनेक गावांची उभारणी करणारे डॉ. नित्यानंद, सेवा भारतीचे विष्णू कुमार, वनवासी कल्याण आश्रमाचे रमाकांत देशपांडे आदी संघ स्वयंसेवक आणि सेवाव्रतींची माहिती उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ दर आठवड्याला अद्यावत करण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@