हा कुणाचा फॉल्ट? अंक दुसरा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019   
Total Views |



मागील लेखात आपण स्तर-भ्रंश म्हणजेच फॉल्ट्सचा अभ्यास सुरू केला होता. या लेखात आपण तोच अभ्यास पुढे सुरू ठेऊन स्तर-भ्रंशाचे उरलेले वर्गीकरण व नंतर भारतातील व जगातील उदाहरणे बघू. गेल्या लेखात आपण स्तर-भ्रंशाचे २ प्रकारे वर्गीकरण बघितले होते. आता उरलेले २ प्रकार बघू.


.ठोकळ्यांची घसरण (Slip of the Blocks)-एका ठोकळ्याची दुसऱ्या ठोकळ्यावर कशाप्रकारे घसरण होते, त्यावरून स्तर-भ्रंशाचे काही प्रकार पडतात. ते प्रकार पुढीलप्रमाणे

 

. नतिलंब-घसरण स्तर- भ्रंश (Strike-Slip Fault) : जेव्हा ठोकळ्यांची घसरण ही त्या ठोकळ्यांमधील नतिलंबाला (Strike) समांतर असते, तेव्हा त्या प्रकारच्या स्तर-भ्रंशाला नतिलंब-घसरण स्तर-भ्रंश म्हणतात.

 

. नति-घसरण स्तर- भ्रंश (Dip-Slip Fault): जेव्हा ठोकळ्यांची घसरण ही त्या ठोकळ्यांमधील नतिला (Dip) समांतर असते, तेव्हा त्या प्रकारच्या स्तर-भ्रंशाला नति-घसरण स्तर-भ्रंश म्हणतात.

 

. तिरकस-घसरण स्तर- भ्रंश (Oblique-Slip Fault): जेव्हा ठोकळ्यांची घसरण ही त्या ठोकळ्यांमधील नतिला किंवा नतिलंबाला कोणालाही समांतर नसते, तेव्हा त्या प्रकारच्या स्तर-भ्रंशाला नति-घसरण स्तर-भ्रंश म्हणतात.

 

 
 

.निर्माण होण्याची प्रक्रिया (Mode of Occurrence): स्तर-भ्रंश तयार होण्याच्या प्रक्रियेवरून त्याचे काही प्रकार पडतात. ते पाहू.

 

.समांतर स्तर-भ्रंश (Parallel Fault) : जेव्हा दोन स्तर-भ्रंश फारच जवळजवळ असतात व दोघांची भ्रंश प्रतले एकमेकांना समांतर असतात, तेव्हा तशा प्रकारच्या स्तर-भ्रंशाला समांतर स्तर-भ्रंश म्हणतात. काही वेळा एकापाठोपाठ एक अशा अनेक समांतर स्तर-भ्रंशाचा एक गटच अस्तित्वात असतो. त्यातल्या स्तरांचा अभ्यास केल्यास ते स्तर जिन्यासारखे उतरत आले असल्यासारखे दिसतात. अशा गटाला स्टेप स्तर-भ्रंश (Step Fault) असे म्हणतात.

 

. परिमितीय स्तर-भ्रंश (Peripheral Fault): जेव्हा एखाद्या परिसराच्या सर्व बाजूंना स्तर-भ्रंश अस्तित्वात असतात व ते त्या परिसराच्या परिमितीवर पसरल्यासारखे दिसतात, तेव्हा त्या रचनेला परिमितीय स्तर-भ्रंश असे म्हणतात.

 

. रेडियल स्तर-भ्रंश (Radial Fault) : जेव्हा एखाद्या रचनेतील सर्व स्तर-भ्रंश हे एकाच बिंदूपासून सुरू होऊन अनेक निरनिराळ्या दिशांना जातात, तेव्हा त्या स्तर-भ्रंशांना रेडियल स्तर-भ्रंश असे म्हणतात.

 

 
 

तर, अशाप्रकारे स्तर-भ्रंशांचे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. स्तर-भ्रंशाचे अभियांत्रिकीमधील महत्त्वही वलींप्रमाणेच आहे. त्याचे कारण म्हणजे कोणताही स्तर-भ्रंश हे जमिनीत पडलेले फ्रॅक्चरच असते. आपल्या शरीरातील हाडांना फ्रॅक्चर झाले तर तो भाग मजबूत राहतो का? तशाच प्रकारे जमिनीतील फ्रॅक्चर झालेला भागही फार कमजोर असतो. त्यामुळे अशा कमजोर भागातील खडकांची सहनक्षमता (Bearing Capacity) ही फारच कमी असते. तसेच कोणत्याही स्तर-भ्रंशामध्ये सतत हालचाल होत असते. त्यामुळे हा भाग कधीही हलू शकतो. याच गोष्टींमुळे प्रत्येक स्तर-भ्रंशाचा परिसर हा भूकंपप्रवण असतो व शक्यतो या भागावर खनन वा बांधकाम करून कोणताही अतिरिक्त भार येऊ न देणे हेच रेकमंडेड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सबडक्शन झोन हा एक स्तर-भ्रंशच आहे, कारण त्यात एक काँटिनेंटल प्लेट दुसरीच्या खाली जाते. म्हणजेच त्या दोघींच्यात एक सापेक्ष हालचाल होते.

 

आता आपण स्तर-भ्रंशाच्या भारतातील व जगातील एकूण अस्तित्वाबद्दल माहिती घेऊ. भारतात अनेक ठिकाणी स्तर-भ्रंश अस्तित्वात आहेत. भारतभरात साधारणपणे ६७ स्तर-भ्रंश आहेत, त्यांपैकी १५ हे हिमालयात, १७ हे हिमालयाच्या आसपास, तर ३० हे भारतीय द्वीपकल्पात आहेत. तसेच अंदमान येथे २००४ साली जो महासंहारक भूकंप झाला, तो एका स्तर-भ्रंशावरच होता. आता जगातील काही प्रमुख स्तर-भ्रंशांची माहिती घेऊ.

 

.बंदा डिटॅचमेंट (Banda Detachment) : हा जगातला सर्वांत मोठा ज्ञात स्तर-भ्रंश आहे. याच्या भ्रंश प्रतलाचे क्षेत्रफळ हे सुमारे ६०,००० वर्ग किलोमीटर आहे. हा स्तर-भ्रंश प्रशांत अग्निचक्रामध्ये आहे. हा स्तर-भ्रंश जगातल्या महासागरांमधील सर्वात खोल भागात (जो भाग कोणत्याही घळईत किंवा डोहात नाही) म्हणजेच वेबर डीप येथे आहे. याची खोली जवळजवळ ७ किलोमीटर आहे.

 

. हेवर्ड स्तर-भ्रंश (Hayward Fault) : हा स्तर-भ्रंश जवळजवळ १२० किलोमीटर लांबीचा आहे. हा स्तर-भ्रंश अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को खाडीच्या पूर्वेला आहे. हा स्तर-भ्रंश कॅलिफोर्निया राज्यातील काही खूप जास्त लोकसंख्या असलेल्या भागातून जातो. या स्तर-भ्रंशात महासंहारक भूकंप निर्माण करण्याची क्षमता आहे. या स्तर-भ्रंशात आतापर्यंत रिश्टर स्केलवर ७ पर्यंतच्या तीव्रतेचे भूकंप होऊन गेले आहेत.

 

.सॅन अँड्रिआज स्तर-भ्रंश (San Andreas Fault) : हा स्तर-भ्रंशसुद्धा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात आहे. हा स्तर-भ्रंश हेवार्ड स्तर-भ्रंशाच्या पूर्वेला फारच जवळ आहे. याची लांबी ही साधारणपणे १,२०० किलोमीटर आहे. १९०६ साली ७.९ रिश्टर स्केलचा एक फार मोठा भूकंप या स्तर-भ्रंशात झाला. शास्त्रज्ञांच्या मते या स्तर-भ्रंशात साधारणपणे प्रत्येक २२ वर्षांमध्ये एक भूकंप ६ रिश्टर स्केलचा होतो. आता या फॉल्टमध्ये एवढा दाब निर्माण झाला आहे की, रिश्टर स्केल वर ७ किंवा त्याहूनही अधिक क्षमतेचा भूकंप होण्याची शक्यता आहे.

 

.वेलिंग्टन स्तर-भ्रंश (Wellington Fault) : वेलिंग्टन स्तर-भ्रंश हा सक्रिय स्तर-भ्रंश आहे. हा न्यूझीलंड देशाच्या उत्तरी बेटाच्या दक्षिणेला आहे. हा नतिलंब-घसरण प्रकारचा स्तर-भ्रंश आहे. हा स्तर-भ्रंश इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट व पॅसिफिक प्लेटच्या सरहद्दीवर आहे. या स्तर-भ्रंशामध्ये ३ भाग आहेत. आजपर्यंत या स्तर-भ्रंशामध्ये भूकंपाची काही नोंद झालेली नसली, तरी या स्तर-भ्रंशाची क्षमता ८ रिश्टर स्केलपर्यंत भूकंप निर्माण करण्याची आहे. तर, अशाप्रकारे आपण स्तर-भ्रंशाचे उरलेले प्रकार, त्यांचे महत्त्व आणि भारतातील व जगातील काही स्तर-भ्रंशांची माहिती घेतली. पुढील लेखात आपण रचनात्मक भूशास्त्राचा शेवटचा भाग, म्हणजेच सांध्यांची माहिती घेऊ.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@