गज्वी आणि बिटविन द लाईन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
साहित्य मानवी शाश्वत मूल्यांसाठीच नव्हे तर जीवसृष्टीच्या प्रत्येक हुंकाराच्या आविष्काराचा समर्थपणे आवाज होते, ज्या साहित्याला करुणा आणि जागृती या विशिष्ट चौकटीत न राहता वैश्विकतेचे परिमाण लाभते, ते चांगले साहित्य असे म्हणतात. हे सगळे मांडण्याचे कारण की, काही लोकांच्या मनता उगाचच एक गैरसमज आहे (जो त्यांच्या वैयक्तिक आकसामधून, स्वार्थासाठी त्यांनी जोपासला आहे) त्यांना वाटते की, विशिष्ट धर्माची निंदा करणारे, त्या धर्माच्या श्रद्धेची नालस्ती करणारे साहित्य हेच खरे साहित्य. या पार्श्वभूमीवर प्रेमानंद गज्वींसारखे नाटककार म्हणाले की, “मंदिरामध्ये जाणे वर्ज्य असेल तर देऊळ बंद पाडा.” गज्वींच्या भूमिकेचे समानता या दृष्टिकोनातून स्वागतच आहे. काहीही असो, थोडक्यात गज्वी यांच्या वाक्याच्या ‘बिटविन द लाईन’मधून सर्व जातीधर्माच्या स्त्रियांनी एक अर्थ काढावा का? जसा की, जिथे जिथे महिलांना बंदी आहे ती सर्व ठिकाणे बंद पाडण्याचे. यामध्ये महिलांना प्रवेश नाकारणाऱ्या, मौलानापद नाकारणाऱ्या मशिदी आणि स्त्रियांना फादरचे पद नाकारणारे चर्च, स्त्रियांना गुरुपद नाकारणारे गुरुद्वारा आणि अपवाद वगळता स्त्रियांना भन्तेपद नाकारणारे विहारही आलेच, ते सर्व बंद पाडा. असो, जगभरातले तमाम धर्म आणि त्यांची प्रार्थनास्थळे यामध्ये कुठे ना कुठे महिलांना दुय्यम वागणूक मिळतेच, पण दुटप्पीपणा असा की, उल्लेख होतो तो फक्त मंदिरामध्ये प्रवेश नाकारल्याचा आणि ती मंदिरे बंद पाडण्याचा. गज्वींसारखे नाटककार जेव्हा मंदिरासोबतच महिलांना दुय्यम स्थान देणारी जगभरातली मशिदी, चर्च, विहार यांना बंद पाडण्याचे आवाहन करतील तेव्हाच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विजय झाला असे वाटेल. पण तसे होत नाही आणि होणार नाही. कारण साहित्यिकांचे एक वर्तुळ नव्हे घेट्टोच आहे. या साहित्यिकांची, नाटककारांची क्रांती झाली हे व्यक्त करण्याची उत्तुंग सर्जनशीलताही ठरावीक पठडीतलीच असते. उदा. तिने देवाची मूर्ती फेकली किंवा हा देश आमचा नाही वगैरे वगैरे म्हणणे म्हणजे झाली क्रांती. दुर्दैव म्हणजे या सगळ्या फोलपणाला कुठल्यातरी दबावाखाली साहित्याचा दर्जाही दिला जातो. असो, विषयांतर. मात्र तरीही वाटते की, प्रेमानंद गज्वी यांच्या ‘मंदिर बंद पाडा’मधल्या वक्तव्यातील बिटविन द लाईन’ वाचायले हवे आणि तसा काही अर्थ गज्वींना अपेक्षित आहे का?, असेही विचारायचे आहे.
 

राजकारण की साहित्य?

 

पूर्वी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण या विषयावरून वादविवाद, भांडण, झगडे वगैरे या पठडीतले गोंधळ व्हायचे. आता सध्याच्या संमेलनाचा हा मुद्दा सुखेनैव सुटला. तर वाद रंगला तो साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोण करणार यावर. त्यानंतर तो वाद रंगला की, संमेलनाच्या आयोजकांनी नयनतारा सहगल यांना सुरक्षिततेच्या मुद्द्यासाठी संमेलनास न येण्याच्या केलेल्या विनंतीमुळे. यावर बहुसंख्य लोकांचे म्हणणे आहे की, नयनतारा यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आयोजकांनीच उचलला, हे बरे. कारण नाही तरी नयनतारा यांना या देशात फारच असहिष्णूता आहे, असे वाटते. या देशात चांगल्या म्हणजे तथाकथित निधर्मी विचारवंतांचे जगणे असह्य झाले आहे, असेही त्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर नयनतारा यांच्या मनातली हाक ऐकून आयोजकांनी त्यांना साहित्य संमेलनाला न येण्याची विनंती केली, हे बरेच झाले. आता यावर अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे म्हणत कित्येक भुवया वक्र होतील. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा लाभ घेतच बहुसंख्य साहित्यप्रेमींना वाटते की, साहित्यामध्ये साहित्य असावे. राजकारण नको. या पार्श्वभूमीवर संमेलनाचे उद्घाटक म्हणून निस्पृहता, सत्यता आणि विश्वासार्हता या मापदंडावर नयनतारा यांनी साहित्य संमेलनात काय भूमिका मांडली असती, ते सगळ्यांनाच माहिती आहे. साहित्य संमेलन हे राजकीय मत व्यक्त करण्याचे आखाडे आहेत का? आता कुणी आचार्य अत्रे, दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे यांची नावे घेऊ नका. त्यांनी साहित्य संमेलनामध्ये आवाज उठवला, तो अखंड सार्वभौम भारतीयत्वाच्या सुरक्षिततेसाठी. कोणा एका राजकीय पक्षाची तळी उचलून त्याची दलाली करण्यासाठी त्यांनी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरले नव्हते. कोणीही यावे आणि फुसका बार सोडून द्यावा आणि मग त्यानंतर महिनोन्महिने महाराष्ट्र त्या आगीत होरपळत राहतो, हे काही नवीन नाही. अनेक तथाकथित विचारवंत, साहित्यिक जे केवळ आणि केवळ सत्तार्थाने आणि स्वार्थांधाने भूमिका ठरवतात आणि लोकांच्या माथी आपले विचार थापतात. त्यांना साहित्याच्या दरबारात बोलवावे का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण सामान्यांना इतकेच वाटते की, साहित्य साहित्यच राहावे. राजकारण करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@