पेणमध्ये संक्रांतीनिमित्त सुगडी कामाला गती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |



पेण (आनंद जाधव) : सुवासिनींचा वसा व अखंड सौभाग्यचे लेणे म्हणून ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात घरोघरी दिली जाणारी मातीची सुगडी (मडकी, लोटकी) बनविण्यात पेण तालुक्यातील व शहरातील कुंभार आळीतील कारागीर व्यस्त झाले आहेत.

 

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणादिवशी सुवासिनींचा वसा म्हणून प्रत्येक घरी पाच मातीची मडकी (सुगडी) पुजाण्याची प्रथा आहे. लग्न होऊन नववधू घरी आल्यापासून प्रत्येक वर्षी हा वसा चालू होतो. सुवासिनी पहाटे उठून ही सुगडी एका पारावर देवाजवळ ठेवून त्यांना चुन्याच्या टिकल्या लावून प्रत्येक सुगडीत उसाच्या कांड्या, हरभरा, पावटा, भुईमुगाच्या शेंगा, गाजर ठेवून त्यांचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करून, या सुगाडांना नवीन कोऱ्या कापडाने दिवसभर झाकून ठेवतात. संक्रांतीनंतर एक नवे पर्व सुरु होते, अशी आख्यायिका आहे. ग्रामीण भागात सुवासिनी या दिवशी या सुगड्यांचे पूजन करतात. तसेच ही सुगडी देणारा कुंभार हा एक भाऊ आहे. तो भावाच्या नात्याने आपल्या बहिणीचे सौभाग्य अबाधित राहावे, अशी मनोकामना करतो. तसेच कुंभाराच्या रुपाने प्रत्येक गावतील प्रत्येक घरी जेवढ्या सुवासिनी आहेत त्यांना प्रत्येकी पाच याप्रमाणे ही मडकी देतो. या बदल्यात या कुंभारांना गृहिणी धान्य देतात.

 

रथसप्तमीला उपवासाच्या दिवशी दुध उतू घालविण्यासाठी मातीच्या लहान सुगडयांनाही मागणी असते. दरम्यान, पेणमध्ये आता मोठ्या सुगाड्याबरोबर लहान सुगडे घडविण्याचे काम जोमाने सुरु आहे. संक्रांतीच्या अगोदर साधारण एक महिना कुंभारआळीत ही सुगडी बनविण्यास सुरुवात करतात. त्यासाठी लागणारी माती हल्ली औद्योगिकीकरणामुळे विकत घ्यावी लागते. त्या मातीत घोड्याची लीद मिसळून ती माती एक जीव करून सुगडी तयार केल्या जातात. सुगड्या भट्टीत भाजून घेतल्या जातात. याविषयी बोलताना कुंभा रआळीतील नवयुवक किशोर कुंभार म्हणाले की, ”ही एक पिढीजात चालत आलेली प्रथा असून, हे सुवासिनींचे लेणे आहे. सध्या माती, घोड्याची लीद कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने हा धंदा परवडत नसला तरी पूर्वापार चालत आलेली परंपरा आणि पिढीजात धंदा चालविण्यासाठी हे काम केले जाते.

 

आजही सुगडीचे महत्व कायम

 

कोकणात घरोघरी वापरल्या जाणाऱ्या खापरी, परळ, रांजण, तवी, भानवली, चुली यासारख्या वस्तू इतरवेळी कुंभार परंपरेने बनवीत असतातच. पण बदलत्या जीवनशैलीत संक्रांतीच्या आनंदाचे इतर संदर्भ बदलले तरी सुगडी हा संक्रांत सणाचा अविभाज्य घटक आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@