नशेचा नाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
 
 
मेरे पिछले स्कूल में ड्रग्स की लेन-देन होती थी। छुप के माल बेचा, खरीदा जाता था; स्कूल के ही कुछ सिक्रेट जगहो पे ड्रग्स लिये जाते थे। जो नहीं लेता था उसका बुरी तरह से मजाक उडाया जाता था। ड्रग्स, ड्रिंक्स, हुक्का पार्टीज बहुतही आम बातें थी। उस के कम्पॅरिजन में यह स्कूल काफी ओल्ड फॅशन्ड है। लेकिन मुझे यहाँपर सुरक्षित लगता है।एका मेट्रो शहरातील शाळा सोडून नाशिकच्या एका शाळेत दहावीला आलेला मुलगा मला सांगत होता. मानसशास्त्राची अभ्यासक म्हणून मला दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या - १. विस्कळीत कौटुंबिक परिस्थिती, आईचा प्रदीर्घ मानसिक आजार, वडिलांची करिअरमधील व्यस्तता आणि त्याचे स्वतःचे मानसिक अस्वास्थ्य अशा सगळ्या विस्कटलेल्या पार्श्वभूमीतून आलेला हा मुलगा त्या शाळेतल्या वातावरणातही स्वतःला व्यसनांपासून दूर ठेऊ शकला हे आश्वासक आहे आणि २. ड्रग्ससारखी समाज पोखरणारी गोष्ट आपल्या देशात युवा पिढीला इतकी सहजगत्या उपलब्ध आहे ही फार धक्कादायक परिस्थिती आहे.
 

यानंतर मी या विषयावर वाचन आणि चर्चा करायला सुरुवात केली; शोधनिबंध अभ्यासले. समोर आलेली माहिती खूप अस्वस्थ करणारी होती. भारतात २५ ते २८ टक्के मुले रस्त्यांवर राहतात. यातील बरीचशी मुले ड्रग्स, दारूसारख्या व्यसनांना बळी पडतात. पाच-सहा वर्षांपूर्वी अंमली पदार्थांचे व्यसन ही प्रामुख्याने रस्त्यावरील मुले, बालकामगार, पळवून आणलेली मुले यांची समस्या होती. परंतु, आज भारतात ही समस्या त्यापेक्षा कितीतरी व्यापक झालेली आहे. वेगवेगळ्या आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक गटांतील शालेय मुले या समस्येचा भाग झालेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अंमली पदार्थांचे पहिल्यांदा सेवन केले जाण्याचे वय वेगाने घटत चालले आहे; काही ठिकाणी अगदी पाच वर्षांपर्यंतही खाली आलेले आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की, आपल्या देशात सामाजिक व राजकीय पातळीवरचे कितीही कडक निर्बंध घातले तरी अंमली पदार्थांच्या तस्करीवर व ते सहजपणे उपलब्ध असण्यावर आळा घालण्यात पुरेसे यश येत नाही.

 

सिगारेट, दारू व अंमली पदार्थांच्या कह्यात आलेली तरुण मुले अकाली, असुरक्षित लैंगिक कृती, आक्रमकता, अपयश, शिक्षण अर्धवट सोडणे, गुन्हेगारी अशा चुकीच्या व धोकादायक वर्तनात अडकण्याची शक्यता वाढते. त्यातून पुढे अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक समस्या उद्भवू शकतात. मुलांनी अशा अपायकारक पदार्थांकडे ओढले जाण्यापाठीमागची कारणे काही अभ्यासकांनी मांडली आहेत. यात प्रामुख्याने चुकीच्या संगतीचा प्रभाव, अनुवंशिकतेचा व आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम, कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक-सामाजिक बदल, मनोसामाजिक अवस्थेतून उद्भवणारे अपायकारक वर्तन अशी जगभरात सर्वत्र आढळणारी करणेच भारतीय समाजालाही लागू पडतात असे दिसते.

 

जागतिकीकरणाच्या या दुष्परिणामांचा विचार पालकांनी खूप गांभीर्याने करणे गरजेचे आहे-

 

. मुलांना लहानपणापासूनच विधायक व सकारात्मक कृतींमधून आनंद मिळवण्याचे शिक्षण देणे. यातून चांगल्या सवयींची जोपासना होते.

 
२. मुलांच्या शाळेतील वर्तनाबाबत त्यांच्या शिक्षकांशी नियमित संवाद ठेवणे. बऱ्याचदा मुलांचे घरातील व शाळेतील वर्तन वेगवेगळे असते.
 
३. मुलांच्या दिनक्रमाचा, शैक्षणिक व पूरक कृतींचा, वर्तन व भावनिक आलेखाचा नियमित अंदाज घेत राहणे.
 
४. मुलांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक स्व-प्रतिमा जोपासली जावी यासाठी पालकांनी त्यांच्याशी विश्वासपूर्ण संवाद साधणे.
 
५. पालकांनी स्वतःचा व्यसनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पडताळून पाहणे. मुले अनुकरणातून शिकत असतात.
 
६. कुटुंब/समाज म्हणून व्यसनांबाबत ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. आपली कौटुंबिक स्नेहसंमेलने ही ड्रिंक्सच्या पार्टीज तर होत नाहीत ना?
 
७. मुलांशी व्यसनांबाबत, अपायकारक पदार्थांबाबत, त्यांच्या दूरगामी परिणामांबाबत मोकळेपणाने संवाद साधणे आणि संवाद दोन्ही बाजूने असतो हे लक्षात ठेवणे.
 
८. गरज असेल तिथे अहंकार व गुप्तता बाजूला ठेऊन कुटुंबातील, मित्रपरिवारातील समजूतदार व्यक्तींची, तज्ज्ञांची मदत घेणेपालक म्हणून आपल्या जबाबदार, समंजस वागण्याचा फायदा केवळ आपल्या मुलांनाच नाही तर पर्यायाने संपूर्ण समाजाला होणार आहे.
 
 
 - गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@