खा. पूनम महाजनांच्या आंदोलनानंतर मिळाला रस्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |


 


विलेपार्ल्यातील ८०० रहिवाशांना दिलासा


मुंबई : विलेपार्ले येथील बामणवाडा हिल भागातील रहिवासी गेल्या एक महिन्यापासून जाण्या-येण्यासाठी रस्ता मिळावा, अशी मागणी करत होते. पण, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयएएआय) आणि जीव्हीके कंपनीच्या टोलवाटोलवीमुळे रहिवाशांच्या मागणीला यश येत नव्हते. अखेर शनिवारी खा. पूनम महाजन यांनी या मागणीला पाठिंबा देत आंदोलन छेडले व त्यांच्या आंदोलनाला यशही मिळाले. परिणामी, बामणपाडा हिल येथील ८०० रहिवाशांना रहदारीसाठी रस्ता उपलब्ध झाला आहे.

 

बामणवाडा हिल परिसरात राहणार्‍या ८०० रहिवाशांच्या घरांकडे जाणारा रस्ता एअरपोर्ट कॉलनी भागातून जातो. गेल्या एक महिन्यापासून दुरुस्तीच्या कारणास्तव हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे बामणपाडा हिल येथील रहिवाशांना ये-जा करताना अनेक अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागत असे. याविरोधात रहिवाशांनी आयएएआयकडे तक्रार केली. नंतर आयएएआयने हा मुद्दा जीव्हीके कंपनीचा असल्याचे सांगत रहिवाशांची बोळवण केली. रहिवाशांनी जीव्हीकेकडे तक्रार केल्यावर पुन्हा त्यांना आयएएआयकडे पाठवण्यात आले. अशाप्रकारे गेल्या एक महिन्यापासून केवळ टोलवाटोलवी आणि आश्वासनांमुळे येथील रहिवाशांची चांगलीच परवड झाली.

 

या विरोधात शनिवार दि. ५ जानेवारी रोजी भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन, भाजप आ. पराग अळवणी यांनी मोर्चा काढला. आपल्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी काढण्यात आलेला हा मोर्चा विलेपार्ले पोलीस ठाण्याजवळ अडवण्यात आला. यावेळी खा. पूनम महाजन यांनी तिथेच आंदोलन केले व मोर्चाला संबोधित केले. पुढे खा. महाजन, आ. पराग अळवणी व सर्वपक्षीय नेते आणि पोलीस प्रशासन, जीव्हीके व आयएएआय यांच्यात चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला. आंदोलकांच्या उग्र स्वरुपापुढे नमते घेत रहिवाशांना अखेरीस रस्ता खुला करण्यात आला.

 

दरम्यान, या मोर्चामध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा माने, जिल्हा उपाध्यक्ष व विस्तारक विलास करमळकर, काँग्रेसच्या नगरसेविका विनी डिसुझा, शिवसेनेचे उपविभागप्रमुख सुभाष सावंत, शाखाप्रमुख नरेश सावंत, माजी अपक्ष नगरसेवक निकोलस अल्मेडा, मनसेचे अजित आडिलकर, स्थानिक कार्यकर्ते सुनील आडिलकर व संजय जाधव मोर्चात सहभागी झाले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@