शबरीमलैत घडलेले पाप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
शबरीमलै येथील भगवान अय्यप्पा मंदिराची शेकडो वर्षे जुनी परंपरा तोडण्याचे पाप काही लोकांच्या हातून घडले आहे. या पापात सर्वात मोठा वाटा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या चार पुरुष न्यायाधीशांचा आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या पाश्चात्त्य विचारांनी पछाडलेल्या या ‘अडाणी’ न्यायाधीशांनी कोट्यवधी हिंदूंना अस्वस्थ केले आहे. ही अस्वस्थता कुठले रूप घेऊन आणि केव्हा बाहेर पडेल, हे येणारा काळच सांगेल.
बुधवारच्या पहाटे, चाळीशीतील दोन महिलांनी, स्वत:ला तृतीयपंथीय सांगून, अय्यप्पा मंदिरात प्रवेश केला. या मंदिरात प्रवेश करण्याआधी 41 दिवस जे व्रत करावे लागते आणि डोक्यावर विशिष्ट द्रव्यांची एक पोटली घेऊन जावे लागते, ते काही या महिलांनी केले नव्हते. या मंदिरप्रवेशानंतर कथित महिला चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये पेढेही वाटले. केवळ केरळच नाही, तर संपूर्ण हिंदू समाज या घटनेने सुन्न झालेला आहे. आधुनिकतेचे फाजील भूत अंगात आणलेल्यांना परंपरा मोडल्याचे काही वाटणारही नाही. या दोन्ही महिला कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या, हे उघड झाले आहे. कशाला ही उठाठेव करण्यात आली?
 
 
भगवान अय्यप्पा यांच्या एकाही महिला भक्ताने मंदिरात प्रवेशाची मागणी केली नाही. उलट, आम्ही ही परंपरा प्राणपणाने पाळू, असाच निर्धार प्रत्येकीने व्यक्त केला आहे. असे असताना, कम्युनिस्टांना ही दुर्बुद्धी का सुचावी? या सर्व प्रगतिशील विचारवंतांनी शबरीमलै मंदिरातील महिलाप्रवेशाला, स्त्रीमुक्तीचे एक प्रतीक बनवून टाकले आहे. मागील आठवड्यात, केरळमध्ये 700 किमी लांबीच्या रस्त्यावर लाखो महिला हातात दीप घेऊन उभ्या होत्या. सायंकाळी ठीक सहा वाजता प्रत्येकीने तो दीप प्रज्ज्वलित केला आणि अय्यप्पा यांची भजने म्हणत, नामजप करीत अर्धा तास या सर्व महिलांनी, शबरीमलै मंदिराची ही प्राचीन परंपरा यापुढेही टिकवून ठेवण्याची प्रतिज्ञा केली. या महिलांच्या निश्चयाला काहीच किंमत नाही का? ज्या पाश्चात्त्यांमध्ये स्त्रीला मनुष्याचाही दर्जा नव्हता आणि तो दर्जा मिळावा म्हणून तिथे महिलांना संघर्ष करावा लागला, त्या पाश्चात्त्यांच्या समानतेच्या अशास्त्रीय संकल्पनेला आम्हा भारतीयांनी स्वीकारून किती मूर्खपणा केला आहे, हे आता लक्षात येऊ लागले आहे. कुठलीही एकछत्री राजवट नसतानाही हा हिंदू समाज हजारो वर्षांपासून कसा काय एकात्म राहू शकला, याचे कोडे या परभृत विचारवंतांना पडले आणि अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले की, या देशात रुजविण्यात आलेल्या परंपरा, तीर्थयात्रा, मेळे यामुळेच हा समाज एकात्म झाला आणि आजही आहे.
 
 
नेमका त्या गोष्टींवरच प्रहार करण्याचे कारस्थान फार आधी रचण्यात आले आणि आजही त्या कारस्थानाला साकार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कधी संविधानाची, तर कधी न्यायालयाचीही मदत घेण्यात येते. आपल्या परंपरा, कुळाचार, तीर्थयात्रा, मेळे यांच्यापासून हिंदू समाजाला तोडण्यात आले आहे. त्याचे आजकाल कुणालाच काहीही वाटेनासे झाले आहे. स्वत:ला कुणी प्रतिगामी म्हणू नये म्हणून जो तो या सुरात आपला सूर मिसळवीत आहे. अशा वातावरणात, केरळच्या हिंदू समाजाने आपल्या परंपरांबाबत जे अभूतपूर्व असे आचरण दाखविले, त्याने उर्वरित हिंदू समाज खडबडून जागा झाला आहे. एका परंपरेबाबत एखादा समाज किती आग्रही, किती संवेदनशील राहू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. केरळच्या हिंदू समाजासमोर सार्या देशाने नतमस्तक व्हावे, असे त्यांचे हे कृत्य आहे. हजारो वर्षांच्या क्रूर आक्रमकांच्या अत्याचारातूनही हा समाज जिवंत कसा राहिला असेल, याची एक झलक, अय्यप्पा भक्तांनी आम्हा सर्वांना दाखविली आहे. यासाठी समस्त हिंदू समाजाने या मंडळींचे कृतज्ञ असायला हवे.
 
 
 
या असल्या ‘निरर्थक’ परंपरा पाळल्याने आपल्या भौतिक समस्या सुटतात का? शेतकर्यांना जास्तीचे चार पैसे मिळतात का? लाखो गरिबांच्या मुखात दोन घास पडतात का? लाखो बेरोजगारांना रोजगार मिळतो का? असले वाह्यात प्रश्नही काही जणांनी उपस्थित केले आहेत. त्यांना विचारावेसे वाटते की, मंदिरात या दोन नास्तिक महिलांना घुसविल्यानंतर आता हे सर्व प्रश्न सुटणार आहेत का?
‘तत्त्वमसि’ या प्रसिद्ध पुस्तकात लेखक ध्रुव भट्ट लिहितात- प्रत्येक प्रथा पडते, तिच्यामागे काही ना काही कारण असतं. ऋषिमुनी जे नियम घालून देत असत, ते अगदी उगीचच तर नसणारच ना! हा देश कसा आहे! जिथली काही प्रजा संस्कृतसारख्या असंख्य संधी, समाज आणि जोडाक्षरांनी भरलेल्या भाषेत उत्तम साहित्यनिर्मिती करू शकत होती, तिथलीच दुसरी प्रजा जोडाक्षरांचा उच्चारही करू शकत नाही. इथल्या संस्कृतीच्या घडवय्यांनी या दोन टोकांमध्ये जगणार्या प्रजेला एकत्र टिकवून ठेवता येईल, अशी शास्त्रं तयार करताना किती विचार केला असेल! आयुष्याचा किती बारकाईनं अभ्यास करावा लागला असेल! महापंडित आणि अत्यंत निरक्षर प्रजा यांच्यामधलं संतुलन किती प्रयासानं केलं असेल! सगळ्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी सारखीच राहील, जीवनाला सामोरं जाण्याची रीत तशीच असेल, भावना समान असतील, अशी जीवनदृष्टी त्यांनी कशी जोपासली असेल?
 
 
ध्रुव भट्ट नर्मदा परिक्रमेच्या परंपरेबाबत म्हणतात- हजारो वर्षांपासून ही प्रजा अशीच तीर्थयात्रा करत आली आहे. चार धामांची यात्रा, गंगायमुनांमध्ये स्नान करण्यासाठी यात्रा आणि चार वेगवेगळ्या दिशांमध्ये भरणार्या महाकुंभमेळ्यांना जाण्याच्या यात्रा आणि आपापल्या प्रदेशातल्या लहान-मोठ्या तीर्थक्षेत्रांच्या यात्रा तर वेगळ्याच. ही संस्कृती तीर्थयात्रा करणार्यांच्या पायांवर उभी आहे. त्यांच्या पावलांनीच तिचा प्रसार झाला आहे. या यात्रांनीच आमच्या जीवनांना नवे नवे अर्थ दिले आहेत, आमच्या धर्मात औदार्य आलं आहे. यामुळेच या प्रजेच्या मनात धर्मापेक्षाही खोलवर रुजलेली आहेत अध्यात्माची मुळं! तशी ती नसती, तर ही प्रजा इतकी कणखर झाली नसती. आमच्या परंपरा अशा रीतीनं आणि अशासाठी निर्माण केल्या आहेत की, ज्यामुळे माणूस आणि निसर्ग एकमेकांच्या जीवनक्रमात अडचणरूप न होता टिकून राहतील. आमची आयुष्यपद्धतीच मुळी निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाशी वैर करून आमचं निभायचं नाही.
या सर्व परंपरा निर्माण करण्यामागचं हे भव्यदिव्य तत्त्वज्ञान इंग्रजाळलेल्या आम्हांसारख्यांच्या लक्षात आणूनच दिलं नाही कधी! आमच्या परंपरांची कुचेष्टा करतच आम्ही वाढलो. हेच कुसंस्कार आम्ही आमच्या पुढच्या पिढीकडे सोपविले. आज आम्हाला स्वत:चीच लाज वाटू लागली आहे आणि तेही या केरळच्या हिंदू समाजामुळे...
आपली संस्कृती टिकवून ठेवून, परंपरा सांभाळून ठेवून, प्रगतीही करून घ्यायची कला जगातल्या प्रत्येक प्रजेला अवगत नाही. विकासही करायचा आहे आणि जुनं काही टाकायचंही नाही, ही कला फक्त हिंदू आणि जपानी लोकांकडे आहे, असे विधान करत ध्रुव भट्ट, एकविसाव्या शतकात आपण जगातलं सर्वात प्रगत राष्ट्र असावं आणि आपल्या परंपराही आपल्याबरोबरच असाव्यात, अशी इच्छा व्यक्त करतात. ती चूक म्हणता येईल का?
भारतातील हिंदू समाजाची ही धडपड, शबरीमलै मंदिराची प्रथा मोडून, धुळीत मिळविण्यात आली आहे. म्हणून हे पाप आहे, सामाजिक पाप आहे, असे माझे मत आहे. याचे प्रायश्चित्त कोण भोगेल? आत्मविस्मृत हिंदू समाज की पापकर्ते? माहीत नाही.
प्रत्येकाला समानतेचा अधिकार देणारे आपले संविधान अपवाद म्हणून, अनुसूचित जाती/जमातींना, समानतेच्या संकल्पनेला बाजूला ठेवून आरक्षण देऊ शकते, तर स्त्री-पुरुष समानतेचा (पोकळ का होईना पण) शंखध्वनी करणारे हेच आपले संविधान, या एका मंदिराच्या बाबतीत, तेही एकाही महिला भक्ताची मागणी नसताना, ही प्राचीन परंपरा कायम का ठेवू शकत नाही, हा मला अस्वस्थ करीत असलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर संविधानाचे आजचे रक्षणकर्ते किंवा साधकबाधक अर्थ लावणारे देऊच शकणार नाही, याबद्दल तिळमात्र शंका नाही. हे उत्तर, इथला हिंदू समाजाच देऊ शकेल. तोच उत्तर देण्याचा खरा अधिकारी आहे. परंतु, हे घडेल का?
@@AUTHORINFO_V1@@