बॅनरबाजीला लगाम हवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019   
Total Views |
 
 

मुंबई शहर व उपनगरात बेकायदा फ्लेक्स, पोस्टर, बॅनर्स लावणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी २२७ प्रभागात प्रत्येकी एक पदनिर्देशित अधिकारी नेमावा, अशी मागणी नुकतीच भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केली आहे. कारण, या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून त्याला लगाम घालण्याची आज नितांत गरज आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. असे हे जागतिक शहर म्हणूनच स्वच्छ व सुंदर राखणे हे प्रत्येक मुंबईकराचे कर्तव्य. फण, नागरिक सोडा, प्रशासनाही मुंबईच्या स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलताना दिसत नाही. मुंबईतील अनेक उड्डाणपूल, स्कायवॉकचे खांब, झाडे, भिंती इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स, पोस्टर, बॅनर्स झळकलेले दिसतात. कोणत्याही नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा वाढदिवस असला की मोठमोठे बॅनर लावले जातात. बर्‍याच वेळेस तर तो वाढदिवस होऊनही काही महिने ते बॅनर तसेच राहतात. त्यामुळे मुंबईचे सौंदर्य अधिकच डागाळते. काहीवेळा तर हे बॅनर अंगावर पडून नागरिक जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुण्यातीलही अशीच एक घटना ताजी आहेत. परंतु, राजकीय पक्ष मात्र त्यातून काही धडा घेताना दिसत नाही. अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरबाजीविरोधात ‘सुस्वराज्य फाऊंडेशन’ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीमध्ये विविध राजकीय पक्षांची अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे उघडकीस आले होते. या होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही अनेक राजकीय पक्षांनी ही होर्डिंग्ज काढली नाहीत. वास्तविक, मुंबई ही आर्थिक राजधानी व पर्यटकांसाठी आकर्षणाचे शहर. देश-परदेशातील लाखो पर्यटक मुंबईला भेट देतात. पण, दुर्देवाने त्यांना बॅनर, फ्लेक्सच्या विळख्यात गुदमरणार्‍या मुंबईचे ओंगळवाणे स्वरूप दृष्टीस पडते. त्यामुळे मुंबईतील या बॅनरबाजांविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घ्यायला हवी. या बेकायदा फ्लेक्स, पोस्टर, बॅनर्स यांची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींविरोधात कडक कारवाई करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला पाहिजे. वास्तविक, पालिकेकडे यंत्रणा आहे. मात्र ती यंत्रणा व याकामी एकूणच मनुष्यबळ कमी पडते. या कारवाईसाठी पालिकेने अधिकारी आणि कर्मचारी नेमायला हवेत. केवळ बॅनर्स तात्पुरती न काढता, त्या बॅनरवरील संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारल्यास असल्या बॅनरबाजीला आळा बसेल, हे निश्चित.

तरीही उधळपट्टी का?

राज्यातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली. या रुग्णवाहिकेमुळे हजारो रुग्णांचे प्राणही वाचले. मग ते ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील, सर्वांनाच या रुग्णवाहिकेचा लाभ झाला. मुंबईकरांनाही या सेवेचा पुरेपूर लाभ घेतला. इतकेच नाही तर मुंबई महापालिकेची कित्येक रुग्णालये या रुग्णवाहिकेची मदत घेत आहेत. ही रुग्णवाहिका सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. असे असताना खासगी कंत्राटदारांकडून पालिका रुग्णालयात कार्डियॅक रुग्णवाहिका भाड्याने घेण्याचा घाट सत्ताधारी शिवसेनेने घातला आहे. याबाबतच्या प्रस्तावावर विरोधकांनी पालिकेत जोरदार आक्षेप नोंदवला. मात्र, कंत्राटदारांचा पुळका असलेल्या सत्ताधार्‍यांनी हा प्रस्ताव कसाबसा रेटून नेला. यावेळी प्रस्तावावर मतदान घेतले असता भाजपसमर्थक अपक्ष गीता गवळी सभागृहाबाहेर निघून गेल्याने शिवसेनेने बहुमताने प्रस्ताव मंजूर केला. भाजपने याविरोधात संताप व्यक्त करीत सभात्याग केला. मात्र, पक्षीयवादात मुंबईकरांसाठी कार्डियॅक रुग्णवाहिका खरेदीचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेच्या केईएम, नायर, लोकमान्य टिळक रुग्णालय, कुपर, ट्रॉमा केअर, बोरिवलीतील कस्तुरबा रुग्णालय आणि भायखळा येथील कस्तुरबा रुग्णालयात ९ कोटी, ९६ लाख, ६९ हजार, ८९३ रुपये खर्च करून खासगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर २३ रुग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणला. भाजपने यावर हरकत घेत जोरदार विरोध केला. मुंबईत ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा सुरु असताना खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्णवाहिका घेण्याची गरज काय? कंत्राटदारांच्या फायद्यासाठी रुग्णवाहिका खरेदी केल्या जात आहेत का? असा प्रश्न भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या मुद्द्याचे समर्थन करून प्रशासनाची कोंडी केली. पालिका रुग्णालयांना जर रुग्णवाहिकेची सेवा मोफत मिळत आहे, तर दहा कोटींची खिरापत कंत्राटदाराला का वाटली? असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेला औषधांचा प्रस्ताव कित्येक महिने धूळ खात पडून राहतो, तर ‘१०८’ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध असताना खाजगी कंत्राटदारांवर दहा कोटींची उधळपट्टी नेमकी का केली जातेय, याचे उत्तर सत्ताधार्‍यांनी द्यावे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@