आघाडीच्या जोडीला इंजिन ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
निवडणुका म्हटल्या की, छोट्या पक्षांना जवळ करणं, उमेदवारांची जमवाजमव या गोष्टी आल्याच! आपल्यासाठी हे काही नवंही नाही. येत्या काळात फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग येऊ लागेल. पण, अशातच सध्या एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय ती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला राज्यात मनसेचं इंजिन खेचणार का? राज्यात निराधार मनसेला आघाडीचा आधार मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु, राज्यात ४८ पैकी केवळ चारच जागांबाबत वाटाघाटी शिल्लक राहिलेल्या आघाडीत मनसे सहभागी झाल्यास केवळ धक्का देण्यासाठी लावण्यात आलेलं इंजिन अशीच त्यांची गणना होण्याची शक्यता अधिक. मनसेच्या अस्तित्वावर आणि एकंदरीत त्यांच्या कार्यशैलीवर यामुळे प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होईल. मनसे आघाडीसोबत जाईल, या चर्चा रंगण्याला कारणही तसंच आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वाढलेली जवळीक. पवार-ठाकरे सोयरीक वाढल्याचे चित्र अलीकडच्या काळात अनेकदा दिसलं होतं. मग ती पवारांची महामुलाखत असेल, एकत्र केलेला विमान प्रवास असेल किंवा या दोघांमध्ये बंद दाराआड झालेली गुफ्तगू असेल. राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ‘कृष्णकुंज’वर राज यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ईशान्य मुंबई, ठाणे आणि दिंडोरी या लोकसभेच्या तीन जागांसाठी मनसे इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच मनसेची ही इच्छा पुरवण्यावर पवारदेखील विचार करत असल्याच्या चर्चा आहेत. तरी तीनच्या तीन जागा देण्यावर त्यांनी होकार दिला नाही, तरी दोन जागा देण्यावर होकार मिळण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. तसे झाल्यास महाआघाडीत आणखी एक नवा मित्र जोडला जाण्याची शक्यता आहे. जसं पवारांचं सूत प्रकाश आंबेडकरांशी जुळत नाही तरीही त्यांना महाआघाडीत सामावून घेण्याच्या चर्चा सुरू आहेत, तशाच काहीशा चर्चा मनसेबाबतही आहेत. केवळ मोदी द्वेषापायी आणि सत्तेच्या हव्यासापायी सुरू असलेल्या या महाआघाडीत येत्या काळात बिघाडी झाली नाही, तर त्यांना देवच पावला, असं म्हणावं लागेल. कारण, आघाडी एक आणि इच्छुक हजार अशी ही एकूणच गोंधळाची परिस्थिती.
 

गोलमाल है भाई...

 

पवारांचं राजकारण म्हणा समजण्यापलीकडचं. बोलायचं एक आणि करायचं दुसरचं, ही त्यांची खासियतच. त्यामुळे महाराष्ट्रात मनसेला आघाडीसोबत घेण्याचा त्यांचा विचार हा मराठी मतांना अधिकाधिक आपल्याजवळ खेचण्याचाच तर प्रयत्न नाही ना, या शंकेला हवा देणारा आहे. सध्या राज्यातील वातावरण काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीत जमतील तेवढ्या पक्षांना सोबत घेऊन विजयश्री आपल्याजवळ खेचून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. एकीकडे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेण्यासाठी काँग्रेसने बैठकींचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे आंबेडकरांनी एमआयएमशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांनाही महाआघाडीत सामील करण्याच्या हालचाली सुरु आहेत. केवळ सत्ताधारी पक्षाला शह देण्यासाठी सुरू असलेलं हे शहाणपण. असाच विचार काँग्रेस आणि मनसेमधूनही विस्तव जात नाहीच. दोन्ही पक्षांच्या विचारसरणी, नेतेमंडळी, कार्यपद्धती अगदी एकमेकांच्या विरुद्धच! संजय निरूपम आणि मनसे यांच्यातील सौख्य आणि प्रेम हे तर अगदी सर्वांच्याच परिचयाचे. त्यामुळे या महाआघाडीत मनसेची जर साथ मिळाली तर त्यांच्यात खटके उडणार हे निश्चितच. परंतु, महाआघाडीच्या हितासाठी पवारांचं हे ‘राज’कारण नाकारणं, हे काँग्रेससाठी हितावह ठरणार नाही. ‘राज’पुत्राच्या लग्नात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची उपस्थिती ही बाब नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. राज यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही लग्नाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, काँग्रेसच्या वतीने राहुल यांचे निकटवर्तीय अहमद पटेल उपस्थित राहिले. लग्नादरम्यान राज-पटेल यांच्यात खासगीत जवळपास २० मिनिटे चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पण, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नसले तरी महाआघाडीत मनसेच्या समावेशाबाबतची चर्चा झाल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, तर मनसेच्या ‘इंजिना’ने अचूक ‘वेळ’ साधून ‘हात’ धरण्याचा निर्णय घेतला तर ‘गोलमाल है भाई...’ असंच म्हणावं लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@