लांच्छनास्पद, हीन आणि विकृत, 'त्या' कृत्याचा देशभरात निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 

गांधीप्रतिमेवर बंदूक रोखणाऱ्या महिला नेत्याचा देशभरातून निषेध

 

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली जात असताना उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे काही समाजकंटकांच्या कृत्याने देशवासियांचा संताप अनावर झाला आहे. अलिगढ येथे हिंदू महासभेची महिला नेता पूजा पांडे हिने महात्मा गांधींच्या प्रतिमेवर जाहीरपणे प्रतीकात्मक गोळ्या घालण्याचे कृत्य केले आणि आता देशभरातून या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला जात आहे.

 

बुधवार, दि. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील देशाप्रेमींनी गांधींच्या स्मृतींस अभिवादन केले. मात्र, दुसरीकडे हिंदू महासभेची महिला नेता पूजा पांडे हिने अलिगढ येथे आपल्या विकृत मानसिकतेचे जाहीर दर्शन घडवले. खेळण्यातील बंदूक त्यांनी गांधींच्या प्रतिमेवर रोखली आणि त्या बंदुकीतून प्रतीकात्मक गोळ्या झाडल्या. तसेच, यावेळी उपस्थितांनी नथुराम गोडसे अमर रहेअशा घोषणाही दिल्या. त्यानंतर या प्रतिमेचे दहनही करण्यात आल्याचे समजते. ही पूजा पांडे आणि सोबत उपस्थित कार्यकर्ते हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते असल्याचे वृत्त आहे. या हीन कृत्याचे व्हिडीओही बुधवारी समाजमाध्यामांवरून प्रसारित झाले. ही मंडळी एवढ्यावरच थांबली नाहीत तर आपण ही नवी परंपरा सुरू केली असून आता दरवर्षी असेच करणार असल्याची दर्पोक्तीही त्यांनी केली.

 

या कृत्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा कृत्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. या कृत्याचा निषेध करणाऱ्यांत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचाही प्रचंड प्रमाणात समावेश दिसून येत आहे. हे कृत्य हिंदुत्ववादी विचारसरणीला तसेच, हिंदू संस्कृतीला कदापि शोभणारे नसून या विकृत, हीन आणि लांच्छनास्पद कृत्याचा तीव्र शब्दांत निषेधअशा कडक शब्दांत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह असंख्य नागरिकांनी या उन्मादी मंडळींना झोडपले आहे.

 

१३ जणांवर गुन्हा, तिघांना अटक

 

पूजा पांडे आणि कार्यकर्त्यांच्या या कृत्यानंतर अलिगढ येथील पोलीस स्थानकात १३ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांना गुरूवारी अटक करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या स्थानिक पोलिसांना निलंबित करण्यात आले असून उत्तर प्रदेश पोलिसांकडून या सर्व प्रकाराची कसून चौकशी केली जात असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

@@AUTHORINFO_V1@@