भाबडेपणाच्या ढोंगापासून विकृतीपर्यंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2019
Total Views |

 


 
 
 
राहुल गांधी हिंदुत्वाचा हा गाभा विसरून भोंदूत्वाकडे व तिथून पुढे विकृतीकडेच वाटचाल करत असल्याचे कालपरवा घडलेल्या प्रसंगातून दिसते अन् अशा इसमाला दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची घाई कप्पेबंद विचारात अडकलेल्या मूठभरांना झाली आहे, कमाल आहे की नाही? पण, आता जनतेनेच हे ठरवावे की, या कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्यांना निवडून द्यायचे की विजनवासात पाठवायचे?
 

भोली सूरत दिल के खोटे-

नाम बडे और दर्शन छोटे!

 

सत्तर वर्षांपूर्वीच्या ‘अलबेला’ चित्रपटातील गीताचे हे शब्द अनुभवण्याची संधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अवघ्या देशाला दिली. राजकारणात मोठमोठाले तीर मारून आलेला शिणवटा घालवण्याच्या थाटात गोव्यात दाखल झालेल्या राहुल गांधी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासलेल्या व कधीकाळी राजकारणात अस्पृश्य समजल्या गेलेल्या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीची काँग्रेसाध्यक्षांनी घेतलेल्या या भेटीने माध्यमांचेही लक्ष वेधले. अर्थात, हस्तीदंती महालात जन्मलेल्या शेंबड्या पोराने एखादे पाऊल टाकले तरी त्याचे दिग्विजयाला निघालेल्या सम्राटासारखे कौतुक करणारे खुशमस्करे ही वेळ दवडतील कशी, म्हणा? म्हणूनच ही भेट होते ना होते तोच सगळीकडे मग राहुल गांधींच्या राजकारणापलीकडील संवेदनशीलपणाचे, हळवेपणाचे गोडवे गाण्याचे सोहळे सुरू झाले. पण, मंगळवारचा दिवस सरला आणि राहुल गांधींच्या माणूसपणाचे ठेवणीतले मुखवटे गळून पडले. दुसऱ्याच दिवशी राहुलनी कोचीमध्ये युवक काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या मनातल्या दुष्टपणाचे, क्रूरपणाचे हिडीस असे दर्शन घडवले. ही तीच युवक काँग्रेस आहे, जिच्या कार्यकर्त्यांनी केरळच्या भररस्त्यात गायीचे वासरू कापून आपला बीभत्सपणा दाखवला होता. इथेच मोदी, राफेल, चौकीदार आणि अंबानी या चार शब्दांच्या फेऱ्याव्यतिरिक्त नाचता न येणाऱ्या राहुल गांधींनी पर्रिकरांच्या भेटीचा मतलबासाठी निर्लज्जपणे वापर करून घेतला.

 
पर्रिकरांनी राफेलबाबत एक अक्षरही उच्चारले नसताना राहुल गांधींनी पर्रिकर राफेल करारावरच बोलल्याचे ठोकून दिले. परिणाम, इन मिन पाच मिनिटांच्या भेटीत पर्रिकर राहुलशी राफेलबाबत कसे आणि काय बोलू शकतात, याचेही तारतम्य गमावलेल्यांनी मोदींविरोधात धुरळा उडवून देण्याची हौस भागवून घेतली. मात्र, गांधी कुटुंबाचा कसल्याशा सोन्याने मढवलेला महान वगैरे इतिहास, परंपरा सांगत गल्लोगल्ली फिरणारा हा माणूस प्रत्यक्षात किती विकृत आहे, याची लक्तरे पर्रिकरांनी दुसऱ्याच दिवशी जगाच्या वेशीवर टांगली. राजकारणात राहूनही सभ्यतेचा, साधेपणाचा, स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घालून दिलेल्या मनोहर पर्रिकरांनी राहुलना सविस्तर पत्र पाठवून सुरुवातीला प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल आभार मानले व नंतर मात्र राहुलच्या खोटारडेपणाचे वाभाडे काढले. एवढेच नव्हे तर पर्रिकरांनी झापल्यानंतर देशभरातूनही राहुल गांधींच्या हलकटपणावर संतापाची झोड उठली. पण, एवढे होऊनही शांत बसेल तो राहुल कसला? म्हणूनच मोदीद्वेषाचा कंडू शमवण्यासाठी मनोहर पर्रिकरांच्या आजारपणाचा आधार घेणाऱ्या या करंट्याने “पर्रिकर, तुमच्यावर खूप दबाव आहे, हे मी समजू शकतो. दबावामुळेच तुम्हाला मोदींप्रती निष्ठा दाखवावी लागते,” अशा शब्दांत आपला घसरलेला दर्जा दाखवून दिला. यावरूनच गांधी घराण्याचे मोठे नाव सांगणारा हा वारसदार प्रत्यक्षात किती छोटा, किती खुजा, किती कोत्या मनोवृत्तीचा आहे, याचा अंदाज लावता येतो.
 

खरे म्हणजे आजारपण हे काही कोणाला सांगून येत नाही. दुःखाच्या, त्रासाच्या, अडचणीच्या वेळी बऱ्याचदा ओळख नसलेली माणसेही माणसांना सहकार्य करतात, धीर देतात. माणसांचं सोडा, बऱ्याचदा मुकी जनावरेही आयुष्यात आलेल्या कठीण, आणीबाणीच्या प्रसंगात वैर विसरतात. अशी कित्येक उदाहरणे आपल्याला आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात, पण एकदा खालच्या पातळीवरच उतरायचे ठरवले असेल तर तसे करणाऱ्याला कोण रोखणार? राहुल गांधींचे तसेच झाले आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड, नॅशनल हेराल्ड प्रकरणात गाळात रुतल्याने मानसिक संतुलन ढासळलेल्या राहुल गांधींना आता फक्त आणि फक्त राफेल एके राफेलच दिसते. कदाचित स्वतःचा आणि पक्षाचाही ढासळलेला तोल राफेलचा जप केल्याने सुधारू शकेल, असा विश्वास त्यांना वाटत असावा. म्हणूनच त्यांना पर्रिकरांचा आजार दिसला नाही की, मृत्यूलाही माघार घ्यायला लावणारी त्यांची जिद्द दिसली नाही, त्यांना दिसला तो फक्त स्वार्थ! पण, राहुल गांधी जरी आज असे वागले असले तरी त्यांचा पक्ष मात्र पर्रिकरांच्या वाईटाकडे डोळे लावून बसल्याचे याआधीच समोर आले होते. सुरुवाती सुरुवातीला गोवा काँग्रेसने मनोहर पर्रिकरांच्या आजारपणाबद्दल बोलायचे टाळले. नंतर मात्र काँग्रेसी गुलामांनी आपले अस्सल रूप दाखवायला सुरुवात केली. पर्रिकर रुग्णालयात झुंज देत असताना, लढत असताना गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी अपशब्दांचा बेछूटपणे वापर केला. इथे उच्चारता येणार नाही, अशी बेलगाम वक्तव्ये या लोकांनी केली. कशासाठी? तर फक्त सत्तेसाठी!

 
एका छोट्याशा राज्यातल्या काँग्रेसींची ही मानसिकता असेल तर देशभर सांगाड्याच्या रूपात शिल्लक असलेल्या पक्षाच्या अध्यक्षांची वृत्ती किती वाईट असेल? याची कल्पनाच न केलेली बरी. कारण राहुल गांधींनी ती न केलेली कल्पनाच सत्यात उतरवून दाखवली. मुळात राफेल विमानांच्या व्यवहारावर व एकूणच प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ही आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक थांबायला हवी होती. पण, निवडक प्रकरणात न्यायालयाला शिरसावंद्य मानणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आपला तमाशा तसाच सुरू ठेवला. डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांनीही संपूर्ण करारावर स्पष्टीकरण दिले तरी राहुल गांधींच्या कोणत्याही मेंदूत ते घुसले नाही. कदाचित काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा भार डोक्यावर घेतल्याने सत्य स्वीकारण्यासाठी राहुलच्या डोक्याचे दरवाजेही बंद झाले असतील. म्हणूनच ते अजूनही राफेलच्या नावाने बोंब मारत गावगन्ना हिंडत असतात. पर्रिकरांची घेतलेली भेटही राफेलवरून आरोपांची राळ उडवता येईल, याच उद्देशाने घेतली की काय, अशी शंका त्यामुळेच निर्माण होते. प्रकृतीची विचारपूस वगैरे सगळी नौटंकीच म्हणजे. मोदी व भाजपद्वेषाने पछाडलेला हा इसम उद्या “मी इव्हीएमची भेट घेतल्याचे आणि इव्हीएमने मोदी मला हॅक करत असल्याचे सांगितले,” असेही म्हणू शकतो. कारण आगामी लोकसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर असंबद्ध बरळण्याची स्पर्धा सुरू झाली आहे आणि त्यात सर्वोच्च स्थान पटकावण्याची लालसा राहुलच्याही मनात निर्माण झाली असेलच ना? एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाचे वर्तन कसे असावे, यापेक्षा कसे नसावे याचा उत्तम नमुना म्हणजे राहुल गांधींचे हे वागणे आहे.
 

काही वर्षांपूर्वी एखादा मनुष्य अडाणी, मंद असेल तर एक कथा सांगितली जात असे. ती कथा म्हणजे- जन्माला येण्याआधी ब्रह्मदेव सर्वांना बुद्धीचे वाटप करतो. ही बुद्धी घेण्यासाठी प्रत्येकजण हातात भांडे घेऊन जातो. पण जो अडाणी, मंद मनुष्य आहे, तो बुद्धीवाटपाच्या कार्यक्रमावेळी चाळणी घेऊन गेला. परिणामी, ब्रह्मदेवाने वाटलेली बुद्धी त्याच्या भांड्यात स्थिरावलीच नाही. ती चाळणीतून पडून गेली. त्यामुळे ही व्यक्ती अडाणी, मंद म्हणूनच जन्माला आली. राहुल गांधींना ही गोष्ट लागू होते अथवा नाही, हे आता जनतेनेच ठरवावे. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गेल्या साडेचार वर्षांत झालेल्या काही काही विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींनी कपाळी गंध लावून मठ-मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा लावला होता. दरम्यानच्याच काळात ते जनेवूधारी ब्राह्मण असल्याचे एकनिष्ठ गुलामांनी पसरवले होते. राहुल गांधी व काँग्रेस सौम्य हिंदुत्वाकडे वळल्याचे आभासही तेव्हा कोणाकोणाला होत होते. पण, राहुल गांधींना कोणीतरी सांगायला हवे की, हिंदुत्व म्हणजे त्याग, इतरांची काळजी घेणे व सर्व जगाच्या कल्याणाची कामना करणे, हे होय. मात्र, राहुल गांधी हिंदुत्वाचा हा गाभा विसरून भोंदूत्वाकडे व तिथून पुढे विकृतीकडेच वाटचाल करत असल्याचे कालपरवा घडलेल्या प्रसंगातून दिसते अन् अशा इसमाला दिल्लीच्या तख्तावर बसविण्याची घाई कप्पेबंद विचारात अडकलेल्या मूठभरांना झाली आहे, कमाल आहे की नाही? पण, आता जनतेनेच हे ठरवावे की, या कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणाऱ्यांना निवडून द्यायचे की विजनवासात पाठवायचे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@