सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2019
Total Views |


 

अभिभाषणात राष्ट्रपतींनी केले मोदी सरकारचे कौतुक 

 

नवी दिल्ली : १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला सुरूवात झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी सरकारच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या कामास सुरूवात झाली. सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला असून मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी सरकारने प्राथमिकता दिली असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे.

 

"हे वर्ष देशासाठी अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. यावर्षी महात्मा गांधीजींची १५०वी जयंती आपण साजरी करत आहोत. आपला देश महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालला आहे." असे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी केले. राष्ट्रपतींच्या भाषणातून मोदी सरकारच्या कामाचा संपूर्ण आढावा देशाला ऐकायला मिळाला. यावेळी तरुण, शिक्षण, आरोग्य, आवास अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोदी सरकारने दिलेल्या योगदानाचा राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

 

"सरकार शोषणाविरोधात लढत आहे. देशभरात शौचालय बांधल्याने रोग निर्मुलन झाले आहे. ४.५ वर्षात १३ कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले. मोदी सरकारच्या कार्यकाळात ३,१०० कोटी रुपयांचा निधी जमा झाला. नैसर्गिक संकटांशी लढा देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. महागाई दर खाली आणल्याने मध्यमवर्गीय कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकराचे ओझे कमी करत आणि महागाईवर नियंत्रण मिळवत सरकारनं मध्यम वर्गाला बचतीच्या संधी दिल्या आहेत. मेहनत करणाऱ्या आपल्या मध्यम वर्गाची मिळकत आणि बचत वाढवण्याचे सरकारने प्रयत्न केले आहेत." असे काही मुद्दे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले.

 

पुढे ते म्हणाले की, "पंतप्रधान आवास योजनेला गती मिळाली. या योजनेंतर्गत १.३० करोड लोकांना घरांची चावी सोपवण्यात आली. दिव्यांगासाठी अटल बिहारी वाजपेयी सरकारने मोठे काम केले. दिव्यांगांसाठी ७०० कोटींची सहाय्यता उपकरणे देण्यात आली. कुपोषणाविरुद्ध राष्ट्रीय मिशनची सुरुवात करण्यात आली. देशातल्या प्रत्येक घरापर्यंत वीज पोहचली, २ कोटी ४७ लाख घरांपर्यंत वीज पोहचवण्याचे काम केले. माझ्या सरकारने २१ करोड भारतीयांपर्यंत जीवन ज्योती योजनेचा लाभ पोहचवण्याचे काम केले."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@