शे-सव्वाशेंची क्रांती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019
Total Views |


 


साहित्यिक कारणाशिवाय भलत्याच विषयासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरण्याची एक पद्धतच गेल्या काही वर्षांत रूढ झाली आहे. यावेळी मात्र असे काही न करता आल्याने आपल्या मनातील द्वेषाला जागा देण्यासाठीच मुंबईतल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यवतमाळच्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसी नाट्यावरून सुरू झालेला कांगाव्याचा तमाशा मंगळवारी मुंबईतही पार पडला. आपल्याच विचारांच्या बेड्यांनी जखडलेल्या शे-सव्वाशे लोकांच्या भाऊगर्दीने यावेळी साहित्य सोडून निराळ्याच विषयांवर गळे काढण्याची भूमिका चांगलीच वठवली. नाटकाच्या प्रयोगावेळी ज्या प्रकारे नाट्यगृहातील सर्वच दिवे मालवले जातात, तद्वतच अभिव्यक्तिस्वातंत्र्याविरोधातील या नौटंकीचा प्रयोगही अंधारातच सुरू झाला. एकत्र येण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ठिकठिकाणाहून आलेल्या एकाच कळपातल्यांनी हजेरीही पुरेशा प्रमाणात लावली. परंतु, सुरुवातीच्या गायनामुळे भरल्यासारखे दिसणारे सभागृह नंतर नंतर मात्र कंटाळवाण्या व एकसुरी भाषणबाजीमुळे ओस पडत गेले. म्हणजेच ही तथाकथित परिवर्तनाची क्रांती पद्यात तर शोभून दिसली, पण गद्याची, प्रत्यक्ष विचारांच्या देवाणघेवाणीची वेळ आली, तेव्हा मात्र तिचे वाळवंटात रूपांतर झाले. वस्तुतः नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नाकारल्या गेलेल्या निमंत्रणाचा निषेध सर्वच मान्यवरांनी केला होता. साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षांनीही याबद्दलची भूमिका रोखठोक शब्दांत मांडली होती. तेव्हा हा वाद न लांबवता आतापर्यंत तरी संपायला हवा होता. मात्र, साहित्यिक कारणाशिवाय भलत्याच विषयासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरण्याची एक पद्धतच गेल्या काही वर्षांत रुढ झाली आहे. यावेळी मात्र असे काही न करता आल्याने आपल्या मनातील द्वेषाला जागा देण्यासाठीच मुंबईतल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

दिवस उगवला की राजरोस निष्पाप मुसलमानांच्या हत्या होत आहेत, निर्दोषांना अटक करण्यात येत आहे, सध्याचा काळ हा अतिशय धोकादायक, भयानक आहे. काही दिवसांनी लोकसभेच्या निवडणुका होतील व त्यानंतर हिंदूराष्ट्र अस्तित्वात येईल,” अशा शब्दांत केंद्रातील विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधातील खदखद यावेळी नयनतारा सहगल यांनी व्यक्त केली. सोबतच “आम्ही हिंदू नाही, पण आम्ही ‘हिंदुस्तानीयत’ सोडणार नाही,” अशी मखलाशीही त्यांनी केली. अर्थातच पुरावे न देता खोडसाळपणा करण्यातच आघाडीवर असलेल्या उपस्थित नंदीबैलांनी सहगलबाईंच्या या प्रत्येकच विधानावर माना डोलावण्याचे काम केले. एकाच बाजूचे पाहणार्‍या नयनतारा सहगल यांनीही आपल्या विधानांची पुष्टी करणारे कोणतेही दाखले यावेळी दिले नाहीत. विशेष म्हणजे सहगल यांनी ‘हिंदुस्तानीयत’ मध्ये दूरचे जाऊ द्या, पण देहरादूनपासून जवळच्याच काश्मीरमधून हाकलल्या गेलेल्या पंडितांबाबत अवाक्षरही काढले नाही. म्हणजेच सहगल यांच्या ‘हिंदुस्तानीयत’ मध्ये मुसलमानांना, नक्षलवाद्यांना स्थान मिळाल्याचे दिसते, मात्र हिंदूंना, हिंदूंवरील अत्याचारांना नाही. पुढे याच मंचावरून नाटककार असलेल्या जयंत पवारांनी अमिताभ बच्चन यांच्यावर मनसोक्त टीका केली. विसंगतींनी भरलेले असे या सभेचे हे व्यासपीठ होते, कसे ते पाहूया. अर्णव गोस्वामींनी २०१५ साली घेतलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांना विचारलेला प्रश्न व प्रश्नाला अमिताभ बच्चन यांनी दिलेले उत्तर जयंत पवारांना खटकले. म्हणजे आता अमिताभ बच्चन यांनी जयंत पवारांना ‘मी काय बोलू?’ असे विचारायचे का? अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने ढोल पिटणारी ही मंडळी समोरच्या व्यक्तीने कोणत्या विषयावर अभिव्यक्त व्हावे, हेही आता ठरवणार का? एखादी व्यक्ती तुमच्या विचारसरणीची नसली तरी तिने संबंधित विषयावर व्यक्त होण्याचे बंधन तुम्ही घालणार का? ही दांभिकता, ही ढोंगबाजी म्हणजेच का, अभिव्यक्तिस्वातंत्र्य? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात. खरे तर हा देखील एक प्रकारचा बौद्धिक दहशतवादच आहे. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमोल पालेकरांनी अलीकडेच अमिताभबरोबर एक चित्रपटही केला आहे. आता अमिताभ इतका खटकत असेल तर पालेकरही खटकायला हवेत. मात्र, अभिव्यक्तीवाल्यांचे हे असेच असते. इतरांच्या डोळ्यातील कुसळ शोधताना त्यांना स्वतःच्या डोळ्यातले मुसळ मात्र दिसत नाही.

 

अमोल पालेकरांनी यावेळी सेन्सॉर बोर्ड व अभिव्यक्तिस्वातंत्र्य यावर बरीच काही पोपटपंची केली. साहित्य संमेलनाच्या निमित्तानेच ही राजकीय आखाडेगिरी करण्याची संधी मिळालेल्या पालेकरांनी नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसीवर व निषेधाच्या मूक अभिव्यक्तीवरही बडबड केली. संमेलनस्थळी नयनतारांचे मुखवटे लावून अगदी शांतिदूतांच्या आविर्भावात बसलेल्या तीन-चार महिलांना का उठवले? असा सवाल त्यांनी केला. पण प्रत्यक्षात संमेलनस्थळाची परिस्थिती काय होती? तर या मुखवटे पांघरलेल्या महिला शांत बसलेल्या नव्हत्या, तर स्वागताध्यक्षांचे भाषण सुरू असताना माध्यमांचे लक्ष वेधून भाषणात व्यत्यय आणण्यातच आघाडीवर होत्या. ही देखील स्वागताध्यक्षांच्या अभिव्यक्तीची गळचेपीच होती. मात्र, हा कंपू ते मान्यच करणार नाही. या महिलांचा उद्देश संमेलन उधळण्याचा तर नव्हता ना, असाही मुद्दा उपस्थित होतो. तरीही पालेकरांसारखा माणूस या महिला शांतपणे निषेध करत असल्याचे धडधडीत खोटे विधान करतो, याला काय म्हणायचे? इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, संमेलनस्थळी या महिलांच्या मूक निषेधाचा अधिकार मान्य करण्यात आला होता व त्यामुळेच त्यांना मुखवटे लावून बसायलाही मिळाले होते. दुसरीकडे संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांना आम्ही आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचेही पालेकरांनी सांगितले व नंतर अरुणाताईंच्या नम्र स्वभावाचा मानभावीपणे उल्लेख करत दोन भाषांतल्या दोन साहित्यिकांची संमेलनावेळी भेटण्याची संधी आताही हुकल्याचे म्हटले. खरे म्हणजे अरुणाताई आपल्या कंपूतल्या नाहीत, अशीच ही अव्यक्त खंत होती. मात्र, अरुणा ढेरेंची साहित्यिक प्रतिभा इतकी व्यापक आहे की, ती या सगळ्याला पुरून उरली. पर्यायाने पालेकरांना डॉ. ढेरेंवर बेलगाम टीका करता आली नाही. शिवाय या सगळ्या कार्यक्रमात सरकारच्या कथित दडपशाही व अघोषित आणीबाणीविरोधातही अगदी मुक्तहस्ते शब्दांची उधळण केली गेली. हा विरोधाभास लक्षात घेण्याजोगाच नव्हे का? शेवटचा मुद्दा क्रांतीचा, बदलाचा, परिवर्तनाचा. “इथे शेजारीही शत्रू बसलेला असेल,” अशी विधानेही या कार्यक्रमात काही वक्त्यांनी केली. आता अशा भयगंडाने पछाडलेल्या लोकांकडून आपण परिवर्तनाची काय अपेक्षा ठेवणार? कोणत्यातरी अनामिक भीतीचा बागुलबुवा उभा करायचा, लोकांना ‘एकत्र या, एकत्र या’ असे म्हणत जमवायचे, पण त्यांना ठोस काही द्यायचे नाही, असाच हा उद्योग. अखेरीस या रडक्या भाषणांना कंटाळून लोक जायला लागल्यावर आयोजकांनी आवरते घेतले. मात्र, या निमित्ताने का होईना यांच्या अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ मिळाले, हेही नसे थोडके.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@