तब्येत पाहायला आलात, राजकारण करून गेलात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019
Total Views |



‘पुन्हा कधी राजकीय अजेंड्यासाठी आजारी माणसाला भेटू नका..’

 

पणजी : काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यानंतर नव्या राफेल कराराबाबत मला काही माहिती नव्हती असे मनोहर पर्रीकरांनी मला सांगितलेअसा खळबळजनक आरोप राहुल यांनी केला. राहुल यांच्या या आरोपावर मनोहर पर्रीकर भलतेच संतापले असून बुधवारी त्यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात ‘तुम्ही माझ्या प्रकृतीची विचारपूस करायला आला होता, मात्र राजकारण करून गेलातअशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. तसेच, आपल्या अवघ्या ५ मिनिटांच्या भेटीत राफेलविषयी काहीही चर्चा झाली नसल्याचे पर्रीकर म्हणाले.

 

गोवा येथे खासगी दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी मंगळवारी मनोहर पर्रीकर यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पर्रीकर गेले काही महिने कर्करोगाचा सामना करत आहेत. यानंतर राहुल यांनी ट्विट करत पर्रीकरांची प्रकृती सुधारावी, यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या. ही भेट वैयक्तिक होती’ असे स्पष्टीकरण दिले. परंतु, यानंतर केरळमधील कोची येथे मात्र एका कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी राफेलबाबत पुन्हा एकदा आरोपांची राळ उडवली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या राफेल व्यवहाराबाबत तत्कालीन संरक्षणमंत्री पर्रीकर यानाही कल्पना दिली नव्हती आणि पर्रीकर यांनीच मला तसे सांगितल्याचा गंभीर आरोप केला. साहजिकच, हा आरोप माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. यावर मनोहर पर्रीकर यांनी राहुल यांना सविस्तर पत्र लिहून या कृतीबाबत चांगलेच सुनावले आहे.

 

पर्रीकर आपल्या पत्रात म्हणाले की, ‘कोणतीही पूर्वकल्पना न देता आपण मला भेटायला आलात. माझ्या प्रकृतीची विचारपूस केलीत, सुधारणेसाठी शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी आभारी आहे. तथापि, माध्यमांमधून आपल्या या भेटीबाबतचे जे वृत्त माझ्या वाचनात आले ते माझ्यासाठी धक्कादायक आहे. तुम्ही केलेला आरोप मी पाहिला. मला अतिशय दुःख होते की तुम्ही माझ्या या भेटीचा वापर तुमच्या राजकारणासाठी केलात. आपण जेमतेम ५ मिनिटे भेटलो, त्यात आपल्यात राफेलसंबंधी काही चर्चा अथवा उल्लेखही झाला नाही.असे पर्रीकर म्हणाले. आधी सदिच्छा भेट देण्याचा मोठेपणा दाखवणे आणि मग आपल्या राजकीय स्वार्थासाठी खोटी वक्तव्ये करण्यापर्यंत खाली घसरणे, ही कृती माझ्या मनात तुमच्या भेटीच्या हेतूविषयीच संशय निर्माण करते’ अशा शब्दांत पर्रीकर यांनी आपला राग व्यक्त केला. ‘मी इथे एका जीवघेण्या आजाराशी लढतो आहे. माझ्यावर झालेल्या संस्कार आणि विचारांच्या ताकदीवर मी अशा असंख्य संकटांचा सामना करून गोव्याची आणि देशाची सेवा करतच राहीन.’ असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

‘तुम्ही खरे काय ते सांगाल, या आशेवर आणि काहीशा निराशेसह मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे’, असेही पर्रीकर यांनी या पत्राअखेरीस म्हटले आहे. तसेच, ‘पुन्हा कधीही आजारी माणसाची भेट घेऊन त्याचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करू नका’, असा सल्लाही मनोहर पर्रीकर यांनी दिला आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने गेले काही महिने ग्रस्त असलेले मनोहर पर्रीकर आपल्या आजारपणातही पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रीय होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावली आहे. अशात, राहुल गांधी यांच्याविरोधात व्यक्त केलेल्या या तीव्र संतापामुळे राहुल यांच्यावर समाजमाध्यमांद्वारे नागरिकही मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहेत.

 

आधी सदिच्छा भेट देण्याचा मोठेपणा दाखवणे आणि मग आपल्या राजकीय स्वार्थासाठी खोटी वक्तव्ये करण्यापर्यंत खाली घसरणे, ही कृती माझ्या मनात तुमच्या भेटीच्या हेतूविषयीच संशय निर्माण करते.

 

- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@