इंदिरा गांधींना धडकी भरायला लावणारे जॉर्ज यांचे पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
डरकाळ्या फोडणाऱ्या भल्याभल्यांनी त्यावेळी शेपट्या घातल्या होत्या. अशा आणीबाणीत जॉर्ज सातत्याने इंदिरा गांधींच्या विरोधात गर्जत होते. या पत्राचा तर्जुमा वाचला की, जॉर्ज फर्नांडिस किती आक्रमक होते हे लक्षात येईल.
 
 
इंदिरा गांधी, 
 

तुम्ही तुमची हुकूमशाही राजवट सुरु केल्यापासून मला चांगलीच प्रसिद्धी मिळत असल्याची नोंद मी घेतली आहे.

 

पहिली गोष्ट म्हणजे, १९७४ च्या मे महिन्यात पुकारलेला रेल्वेचा संप तुम्हाला अजूनही डाचत आहे. तुम्हाला यातून सत्तेवरुन खाली खेचणाऱ्यांची, फेकून देणाऱ्यांची ताकदही तुम्हाला लक्षात आली असेल.

 

तुम्हाला माहितीच आहे की, रेल्वेचा संप हा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वैध मागण्यांसाठीच पुकारलेला होता. तुम्हाला हेही माहिती आहे की, तुमच्याच सीपीआय व एआयटीयुसीनेदेखील संपात सहभाग घेतला होता. तुम्ही रेल्वे संपाचा मुद्दा उचलून धरता आणि आपल्यावरील आरोपांपासून दुर्लक्ष करता याचबरोबर आमच्याविरोधात खोटा प्रचार करता तेव्हा तुम्ही मे, १९७४ च्या संपाला कर्मचाऱ्यांचा महान संघर्ष म्हणणाऱ्या सीपीआय प्रमुख एस. ए. डांगे यांनी युरोपीयन सत्ताधीशांशी केलेली तुमची तुलना तसेच तुरुंगात आठवडाभर राहिलेल्या सीपीआय खा. पार्वती कृष्णन व सीपीआयमधील तुमच्या छोट्यामोठ्या हजारो कठपुतळ्यांचाही मानभंग करता.

 

जेव्हा तुमच्या काँग्रेसशी निगडीत संघटना संलग्न असलेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनने (आयटीडब्ल्युएफ) तथ्यात्मक चौकशीसाठी आपले कमिशन भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या सरकारने, फॅसिस्ट पद्धतीने फेडरेशनच्या कमिशनला देशात येण्यापासून रोखले. म्हणूनच रेल्वे संपावरुन खोटे बोलायचे तुम्ही थांबवा.

 

दुसरी गोष्ट म्हणजे, मी मे-जून १९७४ च्या संपकाळात परदेशातून बक्कळ पैसा मिळवल्याचा तुम्ही केलेला आरोप.

 

हा खरे तुम्ही तुमच्या आयुष्यात जो काही खोटारडेपणा, लबाडपणा केला त्याचा कळस ठरेल, असाच आरोप आहे. जर तुम्ही केलेल्या आरोपात खरोखरच काही तथ्य असेल तर मग माझ्याविरोधात गुन्हा नोंदवायला तुम्हाला एक वर्षाचा कालावधी का लागला.? माझ्याविरोधात पुरावे सादर करा, खटला चालवा आणि जर आरोपांत खरेच काही सत्यता असेल तर मला शिक्षा करा. सर्वच हुकूमशहा जन्मजात खोटारडे असतात, पण, मॅडम तुम्ही त्या सर्वांच्याच वरचढ आहात, असे दिसते.

 
जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरील दै. 'मुंबई तरुण भारत'चा आजचा अग्रलेख वाचलात का?
 
 
 

तिसरे म्हणजे, तुमचे प्रचारक ज्यात भारतातील रशियन पॅट्रीयट्सचाही समावेश होतो त्यांनी मी जपानी व अमेरिकन संस्थांकडून हजारो डॉलर्स घेतल्याचे लिहिले. यासाठी तुम्ही दोन ड्राफ्ट उद्धृत केले आहेत, एक म्हणजे ६८ हजार डॉलर्सचा आणि दुसरा म्हणजे १७ हजार डॉलर्सचा, जे की जून १९७५ ला बॅंक ऑफ टोकियोतून मी वटवले. तुम्हाला हे चांगलेच माहिती आहे की, हे दोन्ही ड्राफ्ट २७ मे १९७५ रोजी जोधपुरमध्ये भरलेल्या पंधराव्या परिषदेत जपानी रेल्वेमन्सकडून ऑल इंडिया रेल्वेमन्स फेडरेशनला देणात आले. जपानी रेल्वेमन्स फेडरेशनने ६८ हजार डॉलर्सचा तर जपानी लोकोमोटीव्ह इंजिनीअर्स युनियनने १७ हजार डॉलर्सचा चेक दिला होता. हा पैसा म्हणजे जपानी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या भारतीय सहकाऱ्यांना केलेली मदत आहे. कारण मे १९७४ ला तुम्ही या भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन हाकलून लावल्याने त्यांना दिलासा देण्याची गरज होती. जपानच्या दोन्ही रेल्वे कर्मचारी संघटनांच्या सहा नेत्यांनी जोधपुरच्या परिषदेत भाग घेतला, तसेच त्यांच्याबरोबरीने तुर्कीचे रेल्वे संघटनही यात सामिल झाले होते. असे असतानाही तुमची जपानी रेल्वेमनला ते अमेरिकेसाठी काम करतात असे म्हणण्याची हिंमतच कशी झाली.? माझ्याविरोधात परदेशातून पैसे मिळवल्याचा जो काही आरोप तुम्ही व तुमच्या प्रचारकांकडून केला जातोय, त्यामागे किती विकृत विचार असतील.? एआयआरएफला मिळालेला पैसा न पैसा बॅंकेतच जमा केलेला आहे तरीही तुम्ही माझ्याविरोधात खोटारडेपणा करत आहात.

 

मॅडम डिक्टेटर, तुम्ही सत्य आणि सभ्यतेबद्दल आदरही व्यक्त करू शकत नाहीत.? आपल्या सामर्थ्याच्या आधारे तुम्ही माझ्याविरुद्ध सर्वात वाईट मोहिमेत सामील झाला आहात.

 

चौथी गोष्ट म्हणजे, चीनचे अध्यक्ष माओ यांना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपावरील तुमच्या दडपशाहीविरोधात मी लिहिलेल्या पत्राची.

 

माओबद्दल बोलण्याआधी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या बऱ्या. तुम्हाला असे म्हणायचेय का की तुमचा रेल्वेमन्सच्या संपावर अजिबातच दबाव नव्हता.? राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनादेखील यामुळे जगातल्या सर्वच कामगारांच्याकडून तसेच डब्ल्यूएफटीयूकडूनही निंदेचा समाना करावा लागला.

 

आणि मॅडम डिक्टेटर, कृपया माओला पाठवलेले माझे पत्र सार्वजनिक करा आणि आपल्या विरोधकांशी कशी वर्तणूक असावे असे सांगणारे तुमच्या विकृत मनाने तयार केलेले पुरावेही सादर करा.

 
 
जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीचा हा लेख वाचलात का?
 
 
 
 

डिसेंबर १९७४ मध्ये भारतीय माध्यमात हाँगकाँगमधील चिनी रेल्वेमन्सच्या संपाचे व लष्कराने हस्तक्षेप करण्यास दिलेल्या नकाराचे वृत्त झळकले. एआयआरएफने यावेळी चिनी दुतावासाबाहेर निदर्शने केली तसेच चिनी सरकारकडून लष्कराच्या साह्याने संप उधळून लावण्याबद्दल सुरु असलेल्या प्रयत्नांचा निषेध केला, सोबतच चिनी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाठिंबाही दिला. मीही या विरोध प्रदर्शनात सहभागी झालो होतो. यावेळी चीनचे अध्यक्ष माओ यांना लिहिलेले निवेदन चिनी दुतावासाच्या माध्यमातून पोहोचवण्याचेही आम्ही ठरवले. मात्र चिनी दुतावासाने आमच्यासाठी दरवाजे बंद केले होते. तेव्हा तुमच्या पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ते निवेदन चिनी दुतावासाच्या आवारात टाकले. निवेदनात चिनी रेल्वे कर्मचाऱ्यांना देत असलेल्या पाठिंब्याची, तसेच माओ यांना कर्मचाऱ्यांविरोधात दडपशाही न करण्याची विनंती व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली होती. यातच तुम्ही भारतात ज्याप्रकारे रेल्वेमन्सच्या संपावर दबाव आणला, त्याचा संदर्भ दिलेला होता.

 

मात्र १९७५ च्या जानेवारीत अचानकच मला चिनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपातील रशियन्सच्या सहभागाची व त्यातून चिनी सरकारविरोधातील कारवायांची माहिती मिळाली.

 

आणि मॅडम डिक्टेटर, जर तुम्ही जर मला अमेरिकन हस्तकाच्या किंवा चिनी हस्तकाच्या रुपात पाहात असाल तर मी तुम्हाला ही आठवण करुन देतो की, मी तोच जॉर्ज फर्नांडीस आहे, ज्यासाठी तुमच्या पिताश्रींनी चौ-एन-लॉय या चिनी पंतप्रधानांची माफी मागितली होती. भारत-चीन तणावाच्या संबंधातील श्वेतपत्रिकेत आजही तुमच्या पिताश्रींचे ते पत्र आहे.

 

पाचवी गोष्ट म्हणजे, केरळमधील मुस्लिम लीगच्या नेत्यांनी सर्वाधिक जातीयवादी व्यक्ती असल्याच्या केलेल्या विधानाबद्दल. मी तुमच्याविरोधात जे गेल्या तीन वर्षापासून बोलत आलो, लिहित आलो ते जवळपास सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहे. पण तुम्ही स्वत: हुकूमशहा होईपर्यंत थांबलात आणि माझ्या आरोपांना नाकारण्यासाठी प्रेस सेन्सॉरशिप लादली. मी पुन्हा तेच आरोप करतो, जे की भारत-पाकिस्तान युद्धावेळी केले होते. तुम्ही गृहमंत्र्याच्या नात्याने एक गुप्त पत्र प्रसिद्ध केले जे सर्वच खाजगी व सरकारी विभागांना लागू होते. मुस्लिमांना मोक्याच्या, महत्त्वाच्या अधिकारपदावरील नोकऱ्या देण्यात येऊ नयेत, असे त्यात लिहिले होते.

 

त्यानुसार, मुंबईच्या (तत्कालीन बॉम्बे) बेस्ट उपक्रमातील मुस्लिम नियंत्रकांना हटवून निरीक्षकाच्या जागेवर पाठवले गेले. बॉम्बे म्युनिसिरल कॉर्पोकेशनने वैतरणा वॉटर वर्क्समध्ये काम करणाऱ्या मुस्लिमांना तिथून हटवले व त्यांच्या कुटुंबियांपासून दूर शहरात कामावर पाठवले. भाभा अणू केंद्रातील मुस्लिमांना एक महिन्याचा आगावू पगार देऊन घालवून देण्यात आले. मी यात हस्तक्षेप केला पण व्यवस्थापनाने दाद दिली नाही.

 

मी हाच आरोप पुन्हा एकदा करतो की, मुस्लिमांना देशात समानतेचा अधिकार नाकारला जात आहे, लष्कर, पोलिस आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याशी भेदभाव केला जातो. मी हे तथ्य व आकडेवारीच्या आधारे सिद्धही करु शकतो. माझा मुद्दा हाच आहे की या हुकूमशाहीबाबत काही केले पाहिजे.

 

अखेरीस, माझे हे पत्र तुम्ही सार्वजनिकरित्या प्रकाशित करण्याची हिंमत दाखवाल, अशी मी मागणी करु शकतो का.?

 

- जॉर्ज फर्नांडिस,

अहमदाबाद,

२७ जुलै, १९७५

 

‘जॉर्ज फर्नांडिस स्पीक्स’ या पुस्तकातून साभार

भाषांतर – महेश पुराणिक

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@