धक्कादायक! राहत फतेह अली खान यांच्यावर तस्करीचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : परकीय चलनाची देशाबाहेर तस्करी केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने नोटीस बजावली आहे. गायक राहत फतेह अली खान गेल्या अनेक वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी करत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत राहत फतेह अली खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी राहत फतेह अली खान यांनी योग्य खुलासा न केल्यास त्यांना अटक होऊ शकते. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

सुप्रसिद्ध दिवंगत पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांचे राहत फतेह अली खान हे भाचे आहेत. ‘लागी तुमसे मन की लगन’ या गाण्याने २००९ साली राहत फतेह अली खान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून राहत फतेह अली खान यांनी परकीय चलनाच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली. परंतु याचा कोणताही हिशोब त्यांनी आयकर विभागाला दिलेला नाही. राहत फतेह अली खान हे देशाबाहेर चलनाची तस्करी करत असल्याचे आढळले आहे.

 

ईडीच्या माहितीनुसार, राहत फतेह अली खान यांनी ३ लाख ४० हजार डॉलर कमावले होते. त्यापैकी २ लाख २५ हजार डॉलर बेकायदेशीररित्या भारताबाहेर पाठवले. हे पैसे त्यांनी कसे कमावले? भारताबाहेर कुठे आणि का पाठवले? याविषयी ईडीने त्यांना प्रश्न विचारले आहेत. राहत फतेह अली खान यांनी या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्यास त्यांना तस्करी केलेल्या रक्कमेच्या ३०० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. असे नकेल्यास राहत फतेह अली खान यांना अटक होऊ शकते. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

 

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर २०११ साली राहत फतेह अली खान यांना परकीय चलन घेऊन जाताना अडविण्यात आले होते. त्यावेळी राहत फतेह अली खान हे मांस निर्यातदार मोईन कुरेशी यांच्या दिल्लीतील घरी असलेल्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी मोईन कुरेशीकडून लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. राहत फतेह अली खान यांच्या मोईन कुरेशीशी असलेल्या संबंधांमुळे आता त्यांच्यावरील संशय आणखी दाट झाला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@