जगाचा कैवार घेणं थांबवा..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019   
Total Views |



अमेरिकेने आधी अमेरिकेअंतर्गत प्रश्नांकडे पाहायला हवं आणि किमान मेक्सिकोबाबतचा प्रश्न तरी सरळमार्गी सोडवून दाखवायला हवा. मग जगाचा कैवार घेऊन भारतातील अंतर्गत गोष्टींची चिंता करावी. असं कोणत्याही क्षणिक कारणांनी संकटात येईल, इतकी भारतीय लोकशाही दुर्बल नाही.


'व्हाईट मॅन्स बर्डन’ नावाची एक संज्ञा जागतिक राजकारणाच्या संदर्भात वापरली जाते. या जगात आम्हीच काय ते ‘सिव्हिलाईज्ड’ आहोत, सर्वगुणसंपन्न आहोत. आमच्यासमोर आफ्रिका किंवा आशिया म्हणजे अगदीच सामान्य, मागास. त्यामुळे या जगाचं जे काही भलं करायचं आहे, ते केवळ आम्हीच करू शकतो, मार्ग आम्हीच दाखवू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आम्ही कुणालाही न विचारता, हक्काने ढवळाढवळ करणार. हेच ते ‘व्हाईट मॅन्स बर्डन’! आधी युरोप आणि दुसऱ्या महायुद्धात युरोप खिळखिळा झाल्यावर मग अमेरिका. अगदी अलीकडे इराक किंवा मध्य-पूर्वेत अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपात किंवा जागतिक राजकारण-अर्थकारणातील अमेरिकेच्या वागणुकीत या ‘बर्डन’च्या छटा स्पष्ट दिसतात. अमेरिका हे तर या कथित ‘बर्डन’चे जिवंत उदाहरण. गेल्या ३०-३५ वर्षांतील बहुतांश राजकीय इतिहास हा अमेरिकेच्या या अतिरेकी ‘बर्डन’मुळेच घडत गेला आहे आणि त्याचे परिणाम आज सबंध जग भोगत आहेअमेरिकेचा अध्यक्ष कोणीही असो, या परिस्थितीत त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही. अगदी शांत, उदारमतवादी, संयमी वगैरे प्रतिमा असलेले बराक ओबामा आठ वर्षं अध्यक्ष होते, तेव्हाही अमेरिकेच्या जागतिक व्यवहारात तसा काहीच फरक पडला नव्हता. आतातर डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकन मस्तिष्काचे नटबोल्ट खिळखिळे झाल्याचे दिसते. प्रारंभी अमेरिकेतील हिंदू मतांना चुचकारणारे आणि मोठ्या थाटामाटात सत्तेत आलेले ट्रम्प, आता सत्तेच्या खुर्चीवरील काटे जाणवू लागल्यानंतर ‘अमेरिकन राष्ट्राध्यक्षा’ प्रमाणे वागू लागले आहेत. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून भारताला दरडावण्याचा प्रयत्न अमेरिकेने करून पाहिला, पण भारतानेही ताठर भूमिका घेत दाद न दिल्यामुळे ते प्रयत्न फसले. त्यात चीनशी सुरू असलेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे महत्त्व अमेरिका नाकारूच शकत नाही. त्यामुळे या ना त्या मार्गाने अमेरिकेने भारतात नाक खुपसण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे प्रमुख डॅन कोट्स या ज्योतिषबुवांनी नुकतीच केलेली भविष्यवाणी हा याच प्रयत्नांचा एक भाग असू शकतो.

 

चालू वर्षांत भारतातील येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताला सांप्रदायिक दंगलींना सामोरं जावं लागू शकतं, असं या कोट्स महाशयांनी म्हटलं आहे. म्हणजे त्यांच्या विभागाने तसा अहवाल अमेरिकन सिनेटच्या सिलेक्ट कमिटीपुढे ठेवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आणखी भर दिल्यास भारताला सांप्रदायिक दंगलींचा सामना करावा लागू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. भारत-पाकिस्तान संबंधांबाबतही यामध्ये भाष्य करण्यात आलं असून घुसखोरी, शस्त्रसंधीचं उल्लंघन, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचं उल्लंघन इ. गोष्टी पाहता भारत पाकिस्तानसोबतचे संबंध येत्या निवडणुकीपर्यंत ताणेल आणि कदाचित पुढेही ताणेल, असं यात म्हटलं आहे. हे म्हणजे अगदीच वेड पांघरून पेडगावला जाण्यातला प्रकार म्हणायला हवा. अर्थात, हा प्रकार अमेरिका काही आज करत नाही. गेल्या साठ-सत्तर वर्षांत पाकिस्तानबाबत अमेरिकेचं हेच तर धोरण राहिलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळताच तत्काळ काश्मीर प्रश्नही जन्मला आणि त्यानंतर ती आजतागायत एक भळभळती जखम बनली आहे, याचं कारण पाकिस्तान आहे. पाकिस्तानने भारतातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले, पाकिस्तान गेल्या कित्येक वर्षांपासून जागतिक दहशतवादाचा अड्डा बनला आहे आणि हे सारं जग पाहत आहे. अमेरिकेची एवढीच जबरदस्त गुप्तचर यंत्रणा आहे, ती मात्र हे एवढं पाहायचं विसरली. त्यामुळे पाकिस्तानला खतपाणी मिळत गेलं, अमर्याद रसद मिळत गेली. बहुतांशवेळा ही रसद चक्क दहशतवादाला रोखण्याच्या महत्कार्यासाठी दिली गेली आणि आता हे कोट्स महोदय काय म्हणतात, तर भारतच पाकिस्तानसोबतचे संबंध ताणेल. राहता राहिली बाब ती भारतातील अंतर्गत प्रश्नांची. अमेरिकेने आधी अमेरिकेअंतर्गत प्रश्नांकडे पाहायला हवं आणि किमान मेक्सिकोबाबतचा प्रश्न तरी सरळमार्गी सोडवून दाखवायला हवा. मग जगाचा कैवार घेऊन भारतातील अंतर्गत गोष्टींची चिंता करावी. असं कोणत्याही क्षणिक कारणांनी संकटात येईल, इतकी भारतीय लोकशाही दुर्बल नाही. हिंदू राष्ट्रवाद तर नाहीच नाही. त्यासाठी अमेरिकेच्या बाहेरही काही जग असतं, त्यांनाही स्वतःची अशी काही जीवनमूल्यं असतात, संस्कृती असतात आणि तेल-खनिजे-बाजारपेठा याशिवाय बरंच काय काय असतं, हे आधी अमेरिकेला समजून घ्यावं लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@