श्रमिकांना सन्मान मिळवून देणारी उद्योजिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
श्रमिक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि या नवीन नावाने कंपनीने परत उभारी घेतली. अवघ्या १५ कर्मचाऱ्यांनी सुरू झालेल्या या संस्थेत सध्या २५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. चतुर्थ श्रेणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांच्या कार्याला हलकं समजू नये यासाठी ‘श्रमिक’ कार्यरत आहे. किंबहुना, ते संस्थेचे उद्दिष्टच आहे, असे तृप्ती ठाकूर मानतात. त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. यामुळे ‘श्रमिक’च्या कर्मचाऱ्याकडे आदराने पाहिले जाते.
 
 

सौदी अरेबियाच्या दूतावासाचं कार्यालय. त्या कार्यालयातील बैठकीचं प्रशस्त दालन. आपला चेहरा स्पष्ट दिसेल अशा लाद्या, कलाकुसर केलेलं सिलिंग, नुसतं पाहात राहावं असा नक्षीचा उत्तम नमुना असलेले झुंबर आणि त्यात टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता... त्या दालनात वर्तुळाकार टेबलापाशी पांढराशुभ्र अरबी पोशाख परिधान केलेले काही अरबी अधिकारी बसले होते. त्यांच्या मधोमध सर्वात वरिष्ठ अधिकारी बसले होते. एकदम करारी चेहरा, नजर तीक्ष्ण, डोळ्यात भरेल असं प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व. त्यांच्यासमोर एक भारतीय महिला बसली होती. अगदी भारतीय पेहेरावात. एका हॉस्पिटॅलिटी कंपनीची मालकीण. निमित्त होते त्या दूतावासाच्या देखभालीच्या कंत्राटासंदर्भात मुलाखतीचे. अरबी अधिकारी अरबी लहेजाच्या इंग्रजी भाषेत तिला प्रश्न विचारत होते. तीसुद्धा अगदी बाणेदारपणे आणि चोख उत्तरे देत होती. एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सीईओच्या तोडीस तोड तिची उत्तरे होती. आपल्या वकिलातीची देखभाल या भारतीय महिलेची कंपनी उत्तम पद्धतीने करू शकेल, अशी त्या अरबी अधिकाऱ्यांची खात्री पटली. “अभिनंदन मॅम, या वकिलातीच्या देखभालीचे कंत्राट आपल्या संस्थेला मिळत आहे.” ते अभिनंदनपर शब्द ऐकून २ मिनिटांसाठी ती भारतीय महिला उद्योजिका स्तब्धच झाली. ती उद्योजिका म्हणजेच श्रमिक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.च्या तृप्ती ठाकूर होय.

 

तृप्ती ठाकूर. पालघरजवळच्या पांचाली नावाच्या खेड्यात मराठी मध्यमवर्गीय ठाकूर कुटुंबात जन्मलेली मुलगी. बाबा श्रीकांत ठाकूर म्हाडामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ होते. आई गृहिणी. ग्रामपंचायतीच्या मराठी शाळेत तृप्तीने चौथीपर्यंत धडे गिरवले. चौथी झाल्यानंतर ठाकूर कुटुंब अंधेरीच्या डी. एन. नगरला आलं. तिथल्या महानगरपालिकेच्या शाळेत तृप्तीचं पुढील शिक्षण झालं. दहावीनंतर त्यावेळच्या पद्धतीनुसार तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. वाणिज्य शाखेत जरी तिने पदवी मिळवली तरी पहिल्यापासून स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय असावा, असंच तिला नेहमी वाटे. त्याच ओढीतून तिने ‘टेक्सटाईल डिझाईन’ विषयात पदविका मिळवली. उद्योजिका बनण्याचा मनी ध्यास असला तरी शिकण्यासाठी, प्रवासासाठी पैशाची गरज होतीच. कुटुंबावर आपला आर्थिक भार नको म्हणून एका लेखापाल कंपनीत ती काम करू लागली. दरम्यान तिचं लग्न झालं.

 

कालांतराने तिला डॉ. नामजोशी यांच्या वैद्यकीय संस्थेत नोकरी मिळाली. ती संस्था वैद्यकीय कार्यक्रमांचं आयोजन करत असे. त्या कार्यक्रमाचं संयोजन करण्याची जबाबदारी तृप्तीवर होती. तिने खूप चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडली. एक वर्ष काम केल्यानंतर दुसरी संधी तिच्यासाठी जणू वाटच पाहत होती. गोदरेज इस्पितळ लवकरच सुरू होणार होतं. या इस्पितळात बाह्यरुग्ण विभागप्रमुख म्हणून तृप्तीची नेमणूक झाली. रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामधील दुवा म्हणून ती काम करू लागली. या इस्पितळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जोगळेकर एक निवृत्त लष्करी अधिकारी होते. शिस्तीचे अत्यंत कडक. त्यांनी तृप्तीला हेल्थकेअर विषयात पदव्युत्तर पदविका मिळव, असा सल्ला दिला. तृप्तीने सिम्बॉयसिसमधून पदविका मिळवली. एकंदर अनुभव आणि पदविका यामुळे एका नामांकित इस्पितळात तिला सुपरवायझरची नोकरी मिळाली. १८ हजार रुपये पगार होता. मात्र, तृप्ती ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार संस्थेंतर्गत राजकारणामुळे त्यांना काहीच दिवसांत राजीनामा द्यावा लागला.

 

डॉ. नामजोशी यांना हे समजल्यानंतर त्यांनी तृप्तीला नोकरीचा प्रस्ताव दिला. तृप्तीसारख्या कर्मचाऱ्यांची संस्थेला गरज आहे, हे ते जाणून होते. तृप्तीला मात्र आता नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय करायचा होता. तिने आपण नोकरी करणार नाही, पण संस्थेसाठी मनुष्यबळ पुरविणारे सल्लागार म्हणून काम करू असे सांगितले. डॉ. नामजोशींना तृप्तीच्या गुणांची कदर होती. त्यांनी तत्काळ होकार दिला. याचवेळी २००९ साली श्रमिक एंटरप्रायजेसचा जन्म झाला. मात्र, मनुष्यबळ पुरविणारी एखादी कंपनी चालविताना कोणत्या परवान्यांची आवश्यकता असते, कोणती साधनं लागतात, कंपनी कशी चालवतात याविषयी वेगवेगळ्या लोकांनी तृप्ती ठाकूरांची दिशाभूल केली. परिणामी श्रमिक एंटरप्रायजेस सहा महिन्यांत बंद करावी लागली. मात्र, हार मानतील त्या तृप्ती ठाकूर कसल्या? शिवाजी महाराज आदर्श असलेल्या तृप्तींनी एका उद्योग प्रशिक्षण देणाऱ्या पथिक संस्थेमध्ये उद्योजकतेचे धडे घेतले आणि परत कंपनी सुरू केली. श्रमिक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि या नवीन नावाने कंपनीने परत उभारी घेतली. अवघ्या १५ कर्मचाऱ्यांनी सुरू झालेल्या या संस्थेत सध्या २५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. काही कोटींची उलाढाल ही कंपनी करते. हॉस्पिटल पेशंट केअर आणि हाऊसकिपिंग सर्व्हिस, होम, बंगलो, ऑफिसेस डिप क्लिनिंग यामध्ये पेस्ट कंट्रोल व वॉटर टँक क्लिनिंग सर्विस या मूल्यवर्धित सेवा म्हणून पुरविल्या जातात. अनेक नामांकित रुग्णालये, शाळा, डी. वाय. पाटील वैद्यकीय इस्पितळ, सौदी अरेबियाचे दूतावास, हाऊसिंग सोसायटीज, बंगले, जितेंद्र, रोहित शेट्टी सारखे सेलिब्रिटी या संस्थेचे ग्राहक आहेत. आयएसओ मानांकनही या संस्थेने मिळविलेले आहे.

 

चतुर्थ श्रेणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांच्या कार्याला हलकं समजू नये यासाठी ‘श्रमिक’ कार्यरत आहे. किंबहुना, ते संस्थेचे उद्दिष्टच आहे, असे तृप्ती ठाकूर मानतात. त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते. यामुळे ‘श्रमिक’च्या कर्मचाऱ्याकडे आदराने पाहिले जाते. ग्रामपंचायतीच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी स्वत:च्या गुणवत्तेवर एका परदेशी दूतावासाचं कंत्राट मिळवते, ही खरंच अभिमानास्पद बाब आहे. कदाचित शिवाजी महाराज निव्वळ आदर्श म्हणून न ठेवता त्यांची स्वराज्याची तळमळ या मराठमोळ्या तरुणीने अंगी बाणवल्यामुळेच ती आज या क्षेत्रात यशस्वी आहे. आज देशाला उद्योगक्षेत्रातील तृप्ती ठाकूरसारख्या रणरागिणींची गरज आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@