स्वप्नवत बंडखोरीची सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
२७ जुलै, १९७५ साली अहमदाबादहून जॉर्जनी इंदिरा गांधींना जे पत्र लिहिले आहे, त्याचा तर्जुमा वाचला तर जॉर्ज काय चीज होते, हे लक्षात येईल. इथे डरकाळ्या फोडणाऱ्यांनी शेपट्या घातल्या होत्या, असा काळ होता, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘मॅडम डिक्टेटर’ असे म्हणत जॉर्जनी इंदिरा गांधींची जी काही खबर घेतली आहे, त्याची शब्दयोजना, वाक्यरचना पाहिली की आजही शहारा आल्याशिवाय राहात नाही.
 

जॉर्ज फर्नांडिस गेले. खरेतर आपल्या आजारपणामुळे जॉर्ज सार्वजनिक जीवनातून केव्हाच निघून गेले होते, पण आता पार्थिव रूपानेही जॉर्ज आपल्यात नसतील. जॉर्जवर यापूर्वी खूप लिहिले गेले आहे. त्यांच्या साधेपणावर निगर्वी स्वभावावर आणि अनेकदा त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही. जॉर्जची आक्रमकता, त्यांचा रांगडेपणा यावर बेहद्द खुश असणारी जनता सदासर्वदा त्यांच्यामागे कायम राहिली. त्यांच्या मूळ बंडखोर व्यक्तिमत्त्वाला लोहियांच्या विचारांची बैठक लाभली होती. त्यामुळेच लोहियांप्रमाणे जॉर्जनेही आपल्या मागे विचारांव्यतिरिक्त काहीच सोडलेले नाही. लोकशाहीचा गजर करीत आपल्याच चार-पाच पिढ्यांची नाही जमले तर पोराबाळांची तरी सोय लावणारे नेते खूप आहेत. पण, या भाऊगर्दीत जॉर्ज अनोखे राहिले ते या वेगळेपणामुळेच! जॉर्ज बंडखोर असले तरी वेळोवेळी त्यांनी दाखविलेला विवेक अफलातून होता. स्वत:ला लोहियांचे अनुयायी म्हणविणाऱ्या मुलायमसिंह, लालू यादव यांना तो कधीच दाखविता आला नाही. सत्तेचे सोपान चढायची संधी मिळाली की विचारांचा वारसा सांगणारे कसे अविचारी होऊन जातात, याचा वस्तुपाठच लोहियांच्या अन्य पट्टशिष्यांनी घालून दिलेला असताना जॉर्ज वेगळे झळकत राहिले.

 

स्वप्नवत वाटावी अशी ती बंडखोरी ज्याचे भल्याभल्यांना आकर्षण होते. खादीचा चुरगळलेला कुर्ता आणि पायजमा अशा वेशातच जॉर्ज कायम राहिले. अगदी संरक्षणमंत्री झाल्यावरही त्यांनी आपला हा पेहराव सोडला नव्हता. आणीबाणीच्या विरोधात जॉर्ज दंड थोपटून उभे राहिले. हातात बेड्या, आवळून उंचावलेली मूठ असे हे छायाचित्र त्या दिवशीच्या सर्वच वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर झळकले होते. रेल्वेचा संप हा त्यांच्या कामगार नेता म्हणून गाजवलेल्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू होता. या बंदनंतर इंदिरा गांधींचे आणि जॉर्ज यांचे जाहीर खटके उडत होते. २७ जुलै, १९७५ साली अहमदाबादहून जॉर्जनी इंदिरा गांधींना जे पत्र लिहिले आहे, त्याचा तर्जुमा वाचला तर जॉर्ज काय चीज होते, हे लक्षात येईल. इथे डरकाळ्या फोडणाऱ्यांनी शेपट्या घातल्या होत्या, असा हा काळ होता, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘मॅडम डिक्टेटर’ असे म्हणत जॉर्जनी इंदिरा गांधींची जी काही खबर घेतली आहे, त्याची शब्दयोजना, वाक्यरचना पाहिली की, आजही अंगावर शहारा आल्याशिवाय राहात नाही. भूमिगत राहूनही त्यांनी जी पत्रे आपल्या कार्यकर्त्यांना लिहिली, ती अशीच जळजळीत आहेत. जॉर्ज हे असेच होते. या बेदरकार वृत्तीवरच लोक भाळत होते.

 
आम जनताच काय, पण एकेकाळची भारतसुंदरीदेखील त्यांच्यावर भाळली होती. साखळदंडातला फोटो पाहून तरुण, विद्यार्थी, कामगार असे सगळेच जॉर्जमध्ये आशेचा किरण शोधत होते. पण, जॉर्जना सत्तेची लालसा कधीच नव्हती. जे आपले नाही ते त्यांनी सहज सोडून दिले. इतकी अफाट लोकप्रियता लाभलेला हा नेता. सहसा अशी लोकप्रियता डोक्यात जाते. दिल्लीसारख्या निसरड्या ठिकाणी खुशमस्कऱ्यांच्या टोळ्या डोक्यात बऱ्याच महत्त्वाकांक्षा भरवून जातात. मग पाठीमागे किती खासदार आहेत, हे न पाहताही लोक सर्वोच्च पदाची स्वप्ने पाहात राहतात. जॉर्जनी असे कुठलेही उद्योग केले नाही. कामगार हे त्यांचे क्षेत्र. मुंबईवर गिरण्यांचे राज्य होते, तेव्हा गिरणी कामगारांचा बुलंद आवाज म्हणून जॉर्जकडे पाहिले जायचे. ‘बंदसम्राट’ ही खरी तर जॉर्जचीच बिरूदावली. व्यवस्थापनाशी साटेलोटे करून आपल्याच राजकीय पक्षासाठी नकली कामगार संघटना चालविण्याचा तो काळ नव्हता. असंघटित कामगार, रिक्षावाले, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे कष्टकरी अशा सगळ्यांनाच जॉर्ज त्यांचा आवाज वाटायचे. स्थित्यंतरे स्थितप्रज्ञाप्रमाणे पाहणाऱ्या या नेत्याने मुंबई महाराष्ट्रात येऊ घातलेले बदल वेळीच ओळखले होते. बाळासाहेब ठाकरेंचा मुंबईतला उदय आणि गिरणी कामगारांमध्ये अराजक आणणारे दत्ता सामंत जॉर्जना दुरून का होईना दिसत होते. जॉर्जनी एखाद्या फकिराप्रमाणे मुंबई सोडली. बिहारमधून १९६७ साली निवडणूक लढविल्यानंतर अनेक चढउतार जॉर्जनी पाहिले. १९७७ ची निवडणूक तर त्यांनी तुरुंगातूनच लढविली होती. पुढे-मागे इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाली आणि राजीवपर्व सुरु झाले. यातही जॉर्जने स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले होते.
 

आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जॉर्ज एनडीएत येऊन स्थिरावले. अटलजींसोबतची संरक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच बहरली होती. सैनिकांच्या शवपेट्यांबाबतच्या वादामध्ये जॉर्जना काँग्रेसच्या घाणेरड्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते, मात्र जॉर्ज बधले नाहीत. संपूर्ण आयुष्य बंडखोरीत जगलेला हा माणूस शेवटी संघपरिवाराच्या जवळ आला म्हणून टीकेचा धनी झाला होता. पण, ज्याने इंदिरा गांधींसमोर मान तुकवली नाही, त्याला या चिलटांचे काय? जॉर्जनी आपल्या तहहयातीत जसे संघर्ष केले तशाच प्रकारच्या पक्षीय घडामोडीही घडवून आणल्या. मात्र, आपल्या विवेकाचा आवाज कायम राखणारा नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांचे वेगळेपण कायम लक्षात राहील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@