कामगारांचा लढवय्या नेता हरपला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019
Total Views |


 


कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन


नवी दिल्ली : कामगार नेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी दिल्ली येथे निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. कामगारांचा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती. दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फर्नांडिस यांच्या निधनामुळे कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला अशी भावना देशभरातून व्यक्त होत आहे.

 

फर्नांडिस यांचा जन्म कर्नाटकमधील मंगळुरु येथे ३ जून १९३० मध्ये झाला. त्यानंतर फर्नांडिस कामानिमित्त मुंबईत आले. येथे आल्यानंतर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात अपेक्षित वाढ न झाल्याने ८ मे १९७४ रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप घडवून आणला. येथूनच त्यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळाली. आणीबाणीच्या काळात त्यांची आक्रमक भूमिका संपूर्ण देशाने पहिली आहे. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत त्यांनी तिहार तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला. येथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.

 

१९६७ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते. आतापर्यंत त्यांनी ९ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी नवीन समता पक्ष स्थापन करून स्वतंत्र राजकारणाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली होती. यासोबतच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये केंद्रीय दळणवळण व उद्योग मंत्री आणि रेल्वे मंत्रालयाची जबाबदारीदेखील पार पाडली होती.

 

फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले, "जॉर्ज फर्नांडिस साहेब हे भारतातील सर्वोत्तम राजकीय नेत्यांपैकी एक होते. निडर, सरळ आणि दूरदृष्टी असणारे राजकीय नेते होते. गरिबांच्या हक्कांचे ते सर्वात प्रभावी नेतृत्व होते. त्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे."

 

फर्नांडिस यांच्या निधनामुळे एका समाजवादी युगाचा अस्त झाल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "गरिबांच्या न्याय हक्कांसाठी ते शेवटपर्यंत लढत राहिले. अन्त्योदय ला अभ्युदय बनवणे हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली असेल."

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@