कसाई ते गोरक्षक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
एकीकडे गोहत्येवरुन देशात दंगली भडकविण्याचे भीषण प्रयत्न होत असताना यंदांच्या ‘पद्मश्री’ पुरस्कारांच्या यादीतील महाराष्ट्रातील गोरक्षक शब्बीर मामूंचे नाव अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहे.
 

भारतीय संस्कृतीमध्ये गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक. गाईला हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच विशेष असे स्थान आहे. वैदिक ग्रंथातील तैत्तिरीयारण्यकामध्ये ‘माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसाऽऽदित्यानाममृतस्य नाभिः। प्र णु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामादिति वधिष्ट, इति॥(६.१२.१)’ या श्लोकावरून आपल्याला त्याची प्रचिती येते. तुम्ही गाईस माता, बहीण व कन्येसमान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे. असा या श्लोकाचा अर्थ होतो, तर अथर्ववेदातील ‘धेनुं सदनं रयीणाम्’(११.१.३४) हा श्लोकदेखील गायीचे माहात्म्य दर्शवतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये गोहत्येला व गोमांस सेवन निषिद्ध मानले जाते. मात्र, याच समाजात आजही अशा अनेक प्रवृत्ती आहेत, ज्या केवळ आर्थिक लोभापोटी गोतस्करी, गोमांसविक्रीचा व्यवसाय करतात. अशात अनेक गोरक्षक गाईस माता, बहीण व कन्या समजून तिचे जीवावर बेतून रक्षण करतात. अशा गोरक्षकांना कोणतीही जात वा धर्म नसतो. याचंच एक आदर्श उदाहरण द्यायचं झालं, तर शब्बीर बुढण सय्यद हे नाव अग्रस्थानी येते. नुकतेच त्यांना भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला.

 

शब्बीर सय्यद हे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून मान्यता असलेल्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्यामधील दहिवंडी या गावचे रहिवासी. बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर हे छोटेसे खेडे वसलेले आहे. मागास व दुष्काळग्रस्त तालुका असल्याने येथील परिस्थिती कशी असेल, हे तुमच्या लक्षात आले असेलच. अशा या गावात शब्बीर सय्यद हे गोरक्षक आपल्या रमजान, युसूफ या मुलांसह पत्नी, मुली यांच्यासोबत राहतात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एक मुस्लीम समाजाचा गोरक्षक आपल्या महाराष्ट्रात आहे आणि आम्हाला यापूर्वी या गोरक्षकाविषयी माहिती कशी काय मिळाली नाही. तर याच उत्तर हेच आहे की, शब्बीर सय्यद यांचं कुटुंब मागील ५० वर्षांपासून गोसेवेत सक्रीय आहे. आपल्या आजोबांनी सुरू केलेले गोसेवेचे हे व्रत शब्बीर मामू मागील २० वर्षांपासून मोठ्या आनंदाने व नि:स्वार्थी भावनेने पार पाडत आले आहेत. एवढंच नाही, तर ते प्रसिद्धीपासूनही ते वेळोवेळी दूर राहिले. त्यामुळेच त्यांच्या या पुण्यकर्माची महती जगासमोर आली नाही. मात्र, आज ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर का होईना, शब्बीर मामूंच्या कामाची दखल जगाने घेतली आहे.

 

आजोबा, वडील आणि आता शब्बीर मामू आणि त्यांची मुले अशा एकाच कुटुंबाच्या चार पिढ्या गोरक्षणासाठी काम करतात. त्यांच्या या गोप्रेमाची कथाही रंजकच आहे असेच म्हणावे लागेल. कारण, शब्बीर मामू यांचे वडील बुढण सय्यद हे कसाई होते. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात भाकड गाई, बैल खरेदी करून कत्तलखान्यात विकत असत. एकदिवस अचानक आपण जे काम करतोय हे पाप आहे, असे लक्षात आल्यानंतर बुढण सय्यद यांनी हे काम सोडण्याचा निर्णय घेतला व या निष्पाप जीवांची सेवा करण्याचे व्रत घेतले. त्यानंतर त्यांनी १९७० च्या दशकात दोन गाईंपासून गोशाळेची सुरुवात केली. आपल्या वडिलांच्या या पवित्र कामात शब्बीर मामूदेखील तरुणवयापासूनच सामील झाले. शब्बीर मामूने जेव्हा ही सुरुवात केली त्यावेळी त्यांना गोहत्या, गोशाळा, गोरक्षण अशा कोणत्याही गोष्टींची माहिती नव्हती. मात्र, एकच कळत होते ते म्हणजे मुक्या जीवावर शब्बीर मामूंचे असलेले प्रेम आणि आपण काहीतरी चांगलं करतोय याची जाणीव. मागील ५० वर्षांत सय्यद शब्बीर मामूंच्या कुटुंबीयांनी शेकडो देशी गायी व जनावरांचा सांभाळ केला आहे. शेकडो गायींना कत्तलखान्यात नेण्यापासून वाचवले आहे.

 

शब्बीर मामू यांचं संपूर्ण कुटुंब गोसेवेच्या कार्यात मग्न असते. आपल्या दावणीला असणारी जनावरे सकाळी सोडून डोंगरात जगवायची हा त्यांचा दिनक्रम. शेकडो भाकड जनावरं कोणत्याही मदतीशिवाय आणि भर दुष्काळात हे कुटुंब सांभाळते. दुष्काळ तसा येथील लोकांच्या पाचवीला पूजलेलाच... या परिस्थितीत अन्न-पाण्याच्या कमतरतेने मग ग्रामस्थ मामूंच्या दावणीला आपली गुरे आणून सोडतात. अशात एवढा मोठा डोलारा सांभाळायचा म्हणजे अग्निदिव्याचे काम. मात्र, शब्बीर मामू यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला गोसेवेचा वसा कधीही सोडला नाही. शेकडो मुकी जनावरे व कुटुंबातील १३ सदस्यांचा उदरनिर्वाह गाईच्या शेणापासून आणि गाईच्या गोऱ्ह्यांपासून मिळणाऱ्या पैशांतून चालतो. विशेष म्हणजे, गाई, बैलांची ते कधीच विक्री करीत नाहीत. विकत घेतलेले जनावर आम्ही कधीच कसायाला विकणार नाही, या बोलीवर ते गोऱ्ह्यांचा शेतकऱ्यांशी सौदा करतात. गाई, म्हशी, शेळीचे दूध तसेच दही, तूपही ते विकत नाहीत. आईच्या दुधावर फक्त तिच्या लेकरांचा हक्क असल्याने वासरांना ते कधीच दाव्याला बांधत नाहीत. गोहत्येबद्दल त्यांना प्रचंड तिरस्कार आहे, मांसाहार करणेही ते पाप समजतात. म्हणूनच त्यांच्या कामाची दखल सरकारी पातळीवर घेतल्याने या ‘पद्मश्री’ पुरस्काराला सर्वार्थाने एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. शब्बीर मामूंच्या कार्यातून इतर अनेकांनाही प्रेरणा मिळावी, ही सदिच्छा आणि शब्बीर मामूंचे ‘पद्मश्री’ जाहिर झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन आणि यापुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@