चाकोरीत न मावणारा चंद्र...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
‘बंदसम्राट’ ही जॉर्जची सर्वात ठळक झालेली ओळख आहे खरी; परंतु, मला ती तितकीशी कधी भावली नाही. त्यापेक्षा एका घराण्याच्या सर्वव्यापी आणि पाशवी वर्चस्वाला आव्हान देत खमकेपणे उभ्या राहणाऱ्या आणि लाखो-करोडो जनतेच्या आशा-आकांक्षांचा आवाज बनणारा जॉर्ज मला अधिक भावतो.  
 

आपल्याकडील रूढ राजकीय संस्कृतीत कोणी साधा नगरसेवक जरी झाला तरी, त्याला लगेच अतिआदरार्थी विशेषणांनी मढवून टाकण्याची प्रथा आहे. म्हणजे अमूक ‘जी’, तमूक ‘साहेब’ वगैरे वगैरे. चुकून जरी एखाद्याला खासगीतही ‘अरे-तुरे’ केलं, तर कधी त्या नेत्याच्या समर्थकांची झुंड अंगावर धावून येईल, याचा नेम नसतो. दुसरीकडे कलाकार, खेळाडूंच्या बाबतीत मात्र उलट स्थिती. म्हणजे अमिताभ बच्चन यांना वयाच्या ७६ व्या वर्षीही अनेकदा ‘तो अमिताभ’ म्हटलं जातं किंवा सचिन तेंडुलकर यांना निवृत्त होऊन ‘भारतरत्न’ बनल्यावरही ‘तो सचिन’च राहतो. आपल्या राजकीय संस्कृतीच्या अनेक मर्यादांपैकी एक म्हणजे, हे असे ‘अलिखित प्रोटोकॉल्स.’ आयुष्यात सारेच प्रोटोकॉल्स झुगारणाऱ्या बेदरकार जॉर्ज फर्नांडिसने हाही प्रोटोकॉल झुगारला आणि त्यामुळे आज जॉर्ज फर्नांडिस या देशाच्या माजी संरक्षणमंत्र्याचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालेले असतानाही मी नि:संकोचपणे ‘जॉर्ज गेला’ असं म्हणू शकतो. म्हणून जॉर्ज फर्नांडिस फार मोठे ठरतात.

 

वास्तविक, माझ्या पिढीला अक्कल येत होती तेव्हा जॉर्ज यांची राजकीय कारकिर्द अखेरच्या टप्प्यात होती. पुढे २००४ मध्ये सरकारच बदललं आणि जॉर्ज मंत्रीही राहिले नाहीत. त्यानंतर काही वर्षांत त्यांची प्रकृतीही बिघडली आणि मग त्यांनी सक्रिय राजकारणातून जवळपास निवृत्तीच घेतली. गेल्या अनेक वर्षांत जॉर्ज शरपंजरी का होईना, ‘आहेत’ इतकंच माहीत होतं. बाकी त्यांच्या त्या ७०-८० च्या दशकांतल्या सभा, मोर्चे, बंद वगैरे आम्ही पाहिले असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे लिखाण वाचून आणि त्यांचा सहवास लाभलेल्या व्यक्तींकडून आठवणी ऐकण्यातून जॉर्ज समजत गेले. एक कमालीचं बेदरकार, बेफिकीर, बिनधास्त, आक्रमक, कथित संकेतांची भीडभाड न बाळगणारं आणि विषयाला थेट भिडणारं अफाट व्यक्तिमत्त्व, जे हृदयाला भिडतं ते म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. राज्यशास्त्र आणि पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी राजकीय इतिहास समजून घेत असताना जॉर्ज हे व्यक्तिमत्त्व प्रेमात पाडतं.

 
हे सारे शब्द माझ्या मनातले नाहीत, जॉर्ज स्वत: तसं आयुष्य जगले, त्यातून ते लख्खपणे दिसून येतं. कर्नाटकातल्या मंगळुरूत कॅथलिक ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेला, सुरुवातीला ख्रिश्चन पाद्री बनण्याच्या वाटेवरून परत फिरून पुढे धर्मच नाकारणारा, मुंबईत नशीब आजमवण्यासाठी दाखल होऊन चौपाटीवर भेळपुरी खाऊन, फुटपाथवर झोपून दिवस काढणारा, कामगारांचा नेता बनून ‘मुंबई बंद’ पाडणारा, मग इंदिरा गांधींसारख्या शक्तिशाली सत्ताकेंद्राला सळो की पळो करून सोडणारा, बिहारमधून निवडून जाणारा, आई हिंदू आणि वडील मुस्लीम असलेल्या बंगाली मुलीशी विवाहबद्ध होणारा, केंद्रीय मंत्री म्हणून अनेक खात्यांची धुरा सांभाळणारा आणि आयुष्यात असं बरंच काय काय करणारा जॉर्ज फर्नांडिस. त्यांची राजकीय ध्येयधोरणं, निर्णय बरेवाईट असतील, त्याचं मूल्यमापन पुढे अनादी-अनंतकाळापर्यंत (किमान इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या आठवणी जीवंत राहतील तोपर्यंत तरी निश्चितच) सुरू राहील. परंतु, त्या साऱ्याच्या पलीकडे जाऊन जॉर्जच्या व्यक्तिमत्त्वाचा जो काही एक ‘फिनॉमीना’ आपल्यापुढे उभा राहतो, तो स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणातील एक स्वतंत्र मापदंड ठरतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला त्याच्याबद्दल आदर वाटो किंवा न वाटो, त्याची ध्येय-धोरणं पटो अथवा न पटो, मला ‘जॉर्ज’ आपला वाटतो. म्हणजे माझं वय, पात्रता वगैरे विसरून त्याला बिनधास्तपणे ‘जॉर्ज’ म्हणू शकतो. हे इतर कोणत्या नेत्याच्या बाबतीत अभावानेच शक्य होईल.
 

जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. जॉर्ज हे खरंतर समाजवादी. परंतु, काहींना ते पुढे भाजपसोबत गेल्यामुळे नावडते झाले. इतके की, आज काही प्रतिक्रिया येत आहेत, त्यात ‘जॉर्ज, तू राजकीयदृष्ट्या तीसेक वर्षांपूर्वीच मेला होतास’ वगैरेपर्यंत लोक पोहोचले आहेत. अर्थात, रा. स्व. संघ, भाजप यांच्याबद्दल किंवा त्यांच्यासोबत चुकून एखाद्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिलेल्यांवर काही राजकीय अस्पृश्यता भोगण्याची वेळ येते, हे देशाने गेल्या ६०-७० वर्षांत बरेचदा पाहिले आहे. दुर्देवाने अगदी प्रणवदांच्या ‘भारतरत्न’कडेसुद्धा याच चष्म्यातून पाहिले गेले. त्यामुळे हे काही नवीन नाही. त्यात जॉर्ज तर अनेक वर्षं भाजपचे विश्वासू, जवळचे साथीदार राहिले. त्यामुळे तथाकथित डाव्यांना जॉर्ज अप्रिय होणं ही अगदीच स्वाभाविक. काहींना वाटलं की, शेवटी शेवटी जॉर्जने काँग्रेसविरोधाचा अतिरेक केला म्हणून तो भाजपच्या वळचणीला वगैरे गेला. अर्थात, काँग्रेसविरोधाचा अतिरेक करून अप्रत्यक्षरित्या जनसंघ-भाजपला मदत करण्याचा ठपका बसणार्‍यांमध्ये अगदी जयप्रकाश नारायणांचाही नंबर लागतोच, तिथे जॉर्जचं काय सांगणार? त्यामुळे संघ-जनसंघ-भाजपशी जवळीक किंवा साथ, काँग्रेसविरोध आणि त्याचा अतिरेक असं जे काही असो, जॉर्ज फर्नांडिस यांनी ते बिनधास्तपणे, कुणालाही न डगमगता, थेटपणे केलं. घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी एकत्र यायचं आणि मग जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी वेगळं व्हायचं, आपापसात भांडायचं आणि बिलं जातीयवादी शक्तींच्या नावावर फाडायची, असला भोंगळपणा त्यांनी कधी केला नाही. राजकीय पंडितांच्या म्हणण्यानुसार, भले त्याची काही राजकीय किंमतही त्यांना चुकवावी लागली असेल, पण म्हणून घेतलेल्या भूमिकेपासून ते दूर हटले नाहीत. म्हणून जॉर्ज फर्नांडिस फार मोठे ठरतात.

 

मला जॉर्ज आवडण्यात त्याचं समाजवादी ‘असणं किंवा नसणं’ कधी आड येत नाही. जॉर्ज मंत्रिपदी नसताना, रालोआ सरकार पडून काँग्रेसप्रणित सरकार सत्तेत आलेलं असताना ल्युटन्स झोनमधील कॉन्स्टीट्युशन क्लबमध्ये एका कार्यक्रमात जेव्हा तिथे गांधी, नेहरू, राजेंद्र प्रसादांसोबत सोनिया गांधींची प्रतिमा दिसली, तेव्हा जॉर्ज कमालीचे भडकले होते. अखेर त्यांनी ती प्रतिमा तिथून उतरवायला लावलीच. “कुणा गुलामाच्या औलादीने हे काम केलं असावं,” अशी त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया. “कोणत्या आधारावर ही प्रतिमा इथे लावली? देश काय या नेहरू-गांधी खानदानाने विकत घेतला आहे का?” असे प्रश्नामागून प्रश्न प्रचंड संतापून विचारणारे जॉर्ज पाहून ३० वर्षांपूर्वी आणीबाणीच्या काळात म्हणजे जॉर्ज यांच्या ऐन उमेदीच्या काळात हे वादळ कसं होतं, याची कल्पना येते. इंदिरांच्या काळात काँग्रेसेतर चळवळ उभी राहिली आणि त्यातून वाजपेयी, अडवाणी, स्वत: जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह असंख्य कर्तृत्ववान मंडळी लख्खपणे प्रकाशझोतात आली, हे आपल्या आजच्या पिढीवर झालेले अनन्यसाधारण उपकार आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. जरी जनता पक्षाचं सरकार पार फसलं असलं तरी, त्या कालखंडाने आणि त्यात जॉर्जसारख्यांनी उपसलेल्या कष्टांमुळेहा देश काय या नेहरू-गांधी खानदानाने विकत घेतला आहे का?’ हे विचारण्याची हिम्मत तरी पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाली. कल्पना करा, काय असतील ते दिवस. विनय हर्डीकर यांनी आपल्या ‘विठोबाची आंगी’ या पुस्तकात १९७८ च्या चिकमंगळूर पोटनिवडणुकीवर सविस्तरपणे लिहिले आहे. हजारो-लाखोंच्या सभांना सामोरे जाणारे, गर्दीत बिनधास्तपणे घुसणारे आणि क्षणात तिला आपलसं करणारे, गर्दीची नस ओळखणारे, दिवस-रात्र कशाचीही चिंता न करता गावनगाव पायदळी तुडवत अक्षरशः वादळ निर्माण करण्याची क्षमता असणारे जॉर्ज फर्नांडिस हर्डीकरांनी छान मांडले आहेत. इंटरनेट, फेसबुक-ट्विटर वगैरे काही म्हणजे काही नसताना हा माणूस मंगळुरूत जन्मून ‘मुंबई बंद’ पाडून बिहारमधून निवडून येत होता.

 

‘बंदसम्राट’ ही जॉर्जची सर्वात ठळक झालेली ओळख आहे खरी; परंतु, मला ती तितकीशी कधी भावली नाही. त्यापेक्षा एका घराण्याच्या सर्वव्यापी आणि पाशवी वर्चस्वाला आव्हान देत खमकेपणे उभ्या राहणाऱ्या आणि लाखो-करोडो जनतेच्या आशा-आकांक्षांचा आवाज बनणारा जॉर्ज मला अधिक भावतो. जॉर्जने घडवून आणलेल्या रेल्वेच्या संपांवर बरंच लिहिलं गेलं. परंतु, पुढे रेल्वेमंत्री म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेला चालना देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हेही आपण विसरता कामा नये. कारण, अमुक काही ‘बंद करून दाखवलं’ या आनंदात काही लोक इतके आकंठ बुडून जातात की काही नवं सुरू करण्याची त्यांची क्षमता आणि योग्यता उरत नाही. जॉर्जचं असं झालं नाही. म्हणून जॉर्ज फर्नांडिस फार मोठे ठरतात. मला समजला-उमजलेला जॉर्ज फर्नांडिस हा असा आहे. बंदसम्राट, योद्धा, कामगारांचा नेता, समाजवादी नेता, संरक्षणमंत्री, हिरो, वादळ असं लोकांसाठी तो बरंच काय काय आहे. माझ्यासाठी जॉर्ज हा त्या चाकोरीत न मावणारा चंद्र आहे. त्यामुळे राजकारण घडत राहील, नेते येतील-जातील, नवनवा इतिहास लिहिला जाईल. परंतु, जॉर्जचं स्थान मात्र भारतीय स्वप्नाळू डोळ्यांच्या अवकाशात अढळपणे विराजित राहील, यात काहीच शंका नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@