अराजकही हळूहळूच पसरते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2019
Total Views |



पालेकरांनी आतापर्यंत जी काही विधाने, वक्तव्ये केली, त्यातून लोकशाही वा जनतेच्या काळजीचा कितीही आव आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून मोदीद्वेषाने मना-मेंदूवर चढलेल्या काजळीचा भागच अधिक ठळकपणे डोकावताना दिसला.


रात्र कधीही एका क्षणात येत नाही तशीच दडपशाहीसुद्धा हळूहळू पसरत जाते, अशी सुरुवात करून ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात आपल्या सवंगड्यांच्या उपस्थितीत मोदीविरोधाची रिळे पुन्हा एकदा चालवली. नंतर “नरेंद्र मोदींना निवडून दिल्याने देशात अज्ञानाची, अंधाराची राजवट प्रस्थापित झाली. या अंधारयुगाचे आपण बळी झालो आहोत. अंधाराचे राजकीय हत्यार आपल्यावर पद्धतशीरपणे चालवले जात आहे,” अशा शब्दांत पालेकरबुवांनी आपल्या आख्यानात रंगही भरले. पण आख्यानाच्या या रंगांना द्वेषाची छटा असल्याचे पालेकर जरी विसरले असले तरी सर्वसामान्य जनता मात्र ते चांगलेच ओळखते. दुसरीकडे अमोल पालेकरांची चित्रपट व अभिनय क्षेत्रातील कारकीर्द नक्कीच मोठी आहे. एक कसलेला अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही पालेकरांनी चित्रपटसृष्टीला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. अर्थात पालेकर आपल्या क्षेत्रात कधीकाळी नावाजलेले असले तरी त्यांच्या चित्रपट वा अन्य क्षेत्रातील सर्वच विधानांशी सहमत असण्याचे काही कारण नाही. पालेकरांचे आजचे विधानही त्यापैकीच एक. कारण पालेकरांनी आतापर्यंत जी काही विधाने, वक्तव्ये केली, त्यातून लोकशाही वा जनतेच्या काळजीचा कितीही आव आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून मोदीद्वेषाने मना-मेंदूवर चढलेल्या काजळीचा भागच अधिक ठळकपणे डोकावताना दिसला. महिन्याभरापूर्वीही पालेकरांचे हेच रूप नसिरुद्दीन शाह, आमीर खान आणि असहिष्णुतेविषयीच्या विधानांनी समोर आले होतेच. आताही चित्रपट क्षेत्रातली कारकीर्द संपल्यातच जमा असल्याने तशाच आशयाची विधाने करत अमोल पालेकरांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेतले.

 

तथ्यहीन अन् आधारहीन आरोप करायचे, आपल्या कंपूतल्या सोबत्यांकडून टाळ्या मिळवायच्या आणि असहिष्णुतेचे, जातीयवादाचे ढोल पिटायचे हा शिरस्ता गेल्या साडेचार वर्षांपासून देशातल्या लब्धप्रतिष्ठितांनी मांडला. पुरस्कारवापसीपासून सुरू झालेले हे नाट्य आता ‘आर्टिस्ट युनाईट’ पर्यंत पोहोचले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवरील या लोकांची ही लगबग नक्कीच कोणासाठीतरी सुरू असल्याचेही दिसून येते. म्हणूनच या स्थितीत अमोल पालेकरांनी जी विधाने केली, त्यावर काही प्रश्न निर्माण होतात. अमोल पालेकरांनी जी दडपशाहीची, अराजकाची गोष्ट केली ती आजचीच आहे का? खरे म्हणजे देशात २०१४ लाच नव्हे तर त्याच्याही कितीतरी आधीपासून एक नव्हे तर अनेकानेक प्रकारचे अराजक मुसंड्या मारून प्रस्थापित झाल्याचे अनुभवायला मिळते. शासन, प्रशासन आणि जनतेच्या सहभागातून राजकीय पक्ष लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून या अराजकांशी दोन हात करण्याचे धोरण अवलंबतात. जगातल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण केले तर असे लक्षात येते की, आतापर्यंत लोकशाही प्रक्रियेच्या पोटात अशा अनेक अराजकांना पचवून टाकण्याच्या अचाट कथा दडलेल्या दिसतात. ही अराजके नेमकी कोणती असाही प्रश्न पडू शकतो. अंतर्गत बंडाळी, गैरकारभार-लाचखोरीने घातलेला गोंधळ, जनभावना पायदळी तुडवून निरंकुश सत्ता राबवणे अशा अराजकांची उदाहरणे दिली जातात. आपल्या देशाचा विचार केला तर ही अराजके कधी कन्हैय्या कुमारच्या रूपात तर कधी विशिष्ट घराण्याच्या राजसत्तेची वेठबिगारी करण्याच्या रूपात, कधी शेंडा-बुडखा नसलेल्या विचारवंत व कलाकारांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांतून तर कधी नक्षलवादाच्या-माओवादाच्या हिंसेतून, कधी इंदिरा गांधींच्या आणीबाणीतूनही येतात. अर्थात सर्वसामान्य माणसे व्यवहारी व वास्तववादी विचार करत असल्याने त्यांच्या नजरेला ते दिसतेही, पण पृथ्वीचा गोल आपल्याच मेंदूवर तरल्याच्या भ्रमात जगणाऱ्यांना ते दिसत नाही, दिसले तरी कळत नाही आणि कळले तरी वळत नाही.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी, संमेलनाआधी व नंतरही संमेलनाच्या अध्यक्षांसह व्यासपीठावर बसलेल्या सर्वच मान्यवरांनी संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण नाकारण्याचा कडक शब्दांत निषेध केला. सर्वांनी केलेल्या निषेधानंतर तरी तोपर्यंत सुरू असलेला विरोधाचा प्रकार संपायला हवा होता, पण तो अजूनही सुरु असून त्याला जोडूनच मुठभर लोकांकडून काही ना काही उचापत्या होताना दिसतात. कलेची व्यासपीठे राजकीय हेतू ठेवूनच वापरण्यासाठी आहे, असा विश्वास बाळगणारी ही मंडळी त्याच दृष्टीने धडपड करतात. परिणामी सृजनाचा वारसा सांगणाऱ्या कलाक्षेत्रावरही अराजकाचे मळभ दाटते व सुंदोपसुंदी सुरू होते. पालेकरांनाही सध्या तशाच अराजकाचे डोहाळे लागल्याचे दिसते. यातूनच त्यांनी “२०१४ साली आपण जागरूक राहिलो नाही. आपल्या चुकीमुळेच त्यानंतर देशात अंधाराचे राज्य सुरू झाले. आता २०१९ च्या निवडणुकीवेळी तरी डोळे उघडे ठेवून सत्ताधाऱ्यांच्या अंधारनीतीचा भेद करायला हवा,” असा सल्ला दिला. पालेकरांचा हा सल्ला मानला तर २००९ ते २०१४ या काळात भ्रष्टाचाराचे जे थैमान देशात चालू होते, ते अराजक नव्हते का? या पाच वर्षांच्या कालावधीनंतरही ही बेबंदशाहीची चक्रे जशीच्या तशी फिरत राहिली असती तर काय घडले असते? हे प्रश्न उपस्थित होतात. म्हणूनच यावर पालेकरांचे काय म्हणणे असावे, हे जाणून घेणे कुतूहलाचे ठरते. इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे लोकशाहीत प्रत्येकालाच आपापली राजकीय अभिव्यक्ती असायला कसलीही हरकत नाही. मात्र, राजकीय पुढारी देश स्वतंत्र झाल्यापासून सभा, संमेलने, भाषणे अशा माध्यमांच्या वापरातून अभिव्यक्त होत आहेत. पालेकरांना अशी माध्यमे वापरण्यापासून लोकशाहीत कोणीही रोखलेले नाही. सोबतच हिंसा, दडपशाही याविरोधात निघणारे सूर समर्थनीयच आहेत, मात्र जेव्हा ते काही विशिष्ट वेळीच अभिव्यक्त होतात तेव्हा त्यांच्या खरेपणाविषयी शंका वाटते. देशात सध्या डाव्या आणि समाजवाद्यांची राजकीय स्थिती काय आहे, हे वेगळे सांगायला नको, तरीही पालेकरांना राजकारणच करायचे असेल तर त्यांनी ते दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणावरून करण्यापेक्षा निवडणुकीच्या रिंगणात उतरून करावे आणि आपल्यामागे किती जनमत आहे, हेही आजमावून पाहावे.

 

दडपशाही, अराजकता वा अंधारयुगाचाच विचार केला तर पालेकरांनी राज्यासह देशाच्या नक्षलवादग्रस्त भागाकडे पाहावे. गडचिरोलीचेच उदाहरण घ्या. नक्षल्यांच्या भीतीने शिक्षण घेतलेल्या इथल्या कित्येक तरुणांना एकतर गावाबाहेर राहावे लागते किंवा घरी आले तर कुलूपबंद घरात लपावे लागते. महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्या तरी हे तरुण तालुका, जिल्ह्यातल्या वसतिगृहातच पडून राहतात. नक्षली उचलून नेतील, ही भीती त्यांना डसत असते. मोबाईल तर आजच्या काळातली निकडच, पण तोही या तरुणांना नक्षल्यांच्या विरोधामुळे वापरता येत नाही. पोलीस भरतीशिवाय इतर नोकऱ्यांची संधी नसलेल्या या तरुणांनी भरती होण्याचा प्रयत्न केला, तर ते नक्षल्यांना सहन होत नाही. परिणामी गावी परतू शकणाऱ्या व भरतीत अपयशी झालेल्या तरुणांची तंगडतोड सुरू होते. गावी गेलो तर नक्षल्यांच्या हातचा बळी होण्याची भीती असलेले हे तरुण मग जिथे कुठे काम मिळेल, तिथे भटकतात. मुलींची, महिलांची स्थिती तर आणखीनच वाईट. नक्षल्यांना जेव्हा गरज असते तेव्हा ते इथल्या मुली उचलून नेतात. हे असे होऊ नये म्हणून मुलींचे आईबाप त्यांच्या गळ्यात खोटी मंगळसूत्रेही घालतात. लग्न झालेल्या मुलींकडे नक्षली दुर्लक्ष करतात, म्हणून. शिवाय याहून वरचढ म्हणजे जो म्हणणे ऐकत नाही, अशा लोकांची सरळ कत्तल करायलाही नक्षली मागेपुढे पाहत नाहीत. हे फक्त गडचिरोलीचे उदाहरण झाले, पण देशातल्या नक्षली पट्ट्यात थोड्याबहुत प्रमाणात असल्याच काळ्या कारवाया चालताना दिसतात. पण शहरांमध्ये मात्र या नक्षल्यांना सहानुभूती दाखविणाऱ्यांकडून मोठमोठ्या सभा-संमेलने भरवली जातात. अशा ठिकाणी हजेरी लावणारे खरे म्हणजे नक्षल्यांचे व त्यांच्या या रक्तरंजित कारवायांचे समर्थकच असतात. हे लोक नक्षल्यांच्या बाजूने बोलताना दिसतात पण नक्षल्यांनी ज्या वनवासी, वंचित समाजातील तरुणांचे, मुलींचे खून पाडले त्यावर या मंडळींचे नेमके काय म्हणणे आहे? हेही त्यांनी सांगताना दिसत नाही. हे खरे अराजक आहे, अंधारयुग आहे, असहिष्णुता आहे, जे सर्वत्र हळूहळू पसरते आहे. त्यामुळे पालेकरांनी याबद्दल बोलावे, अभिव्यक्त व्हावे. तेव्हा कंपूबाहेरची सर्वसामान्य जनताही त्यांना नक्कीच साथ देईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@