..तर मुख्यमंत्रीपद सोडेन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2019
Total Views |



सिद्धरामैय्या गटाच्या कुमारस्वामींवर कुरघोड्या सुरूच


बंगळूरू : कर्नाटकातील सत्तानाट्यात रोज नवनव्या धक्कादायक गोष्टी घडत असून यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती कमालीची अस्थिर झाली आहे. नुकत्याच काँग्रेस आमदार आणि विद्यमान सरकारमधील मंत्र्यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात जाहीर टीकाटिप्पणी करत याआधीचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या हेच चांगले होते, अशी विधाने करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे हतबल आणि त्रस्त झालेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला असून हे असेच चालू राहिले तर मी मुख्यमंत्रीपदही सोडेन, असे त्यांनी सुनावले.

 

कर्नाटकात सलग ५ वर्षे बहुमतात सत्तेत राहिल्यानंतर आता आपल्यापेक्षा निम्म्याहून कमी जागा मिळवणाऱ्या जनता दल-सेक्युलरसोबत आघाडी करावी लागते आणि मुख्यमंत्रीपदही जेडीएसच्या पारड्यात टाकावे लागते, ही बाब काँग्रेसमधील अनेक नेत्यांना, आमदारांना रुचलेली नाही. विशेषतः, माजी मुख्यमंत्री व आता बाजूला फेकले गेलेले सिद्धरामैय्या यांच्या गटाला ही सल फारच जाणवते आहे. त्यातूनच रविवारी काँग्रेसचे एक आमदार एस. टी. सोमशेखर एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले की, सिद्धरामैय्या यांना जर आणखी एक टर्म मिळाली असती तरच कर्नाटकाची ‘खरी प्रगती’ झाली असती. हे कमी म्हणून की काय, राज्य सरकारमध्ये मंत्रीपदी असलेले सी. पुत्तरंगाशेट्टी म्हणाले की, सिद्धरामैय्या हेच माझे मुख्यमंत्री आहेत. कुमारस्वामी सरकारमधीलच एका मंत्र्याने आपल्या मुख्यमंत्र्याचे असे जाहीर वाभाडे काढल्यानंतर साहजिकच काँग्रेस आणि जेडीएस अशा दोन्ही बाजूंनी त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.

 

मुख्यमंत्री कुमारस्वामी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काँग्रेस आघाडीची मर्यादा ओलांडत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींवर ताबा ठेवायला हवा. जर हे सारे असेच सुरू राहिले, तर मी मुख्यमंत्रीपद सोडायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला. परंतु, वास्तवात कुमारस्वामी यांच्या या वक्तव्यांतून आक्रमकतेपेक्षा हतबलताच अधिक जाणवत असल्याचे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दुसरीकडे, सिद्धरामैय्या यांनी आपल्या गटातील नेत्यांच्या वक्तव्यांवर सारवासारव करताना सांगितले की, माध्यमांनी या वक्तव्यांचा विपर्यास केला आहे. आमच्यात कोणताही वाद नसल्याचे सांगत मी स्वतः कुमारस्वामी यांच्याशी बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सिद्धरामैय्या यांच्याकडे काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या समन्वयकपदाची धुरा देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी आपल्याच आमदारांबाबत आक्रमक पवित्रा घेत आमदार जे काही बोलले ते स्वीकारार्ह नसल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी या वक्तव्यांचे स्पष्टीकरण न दिल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही सांगितले.

 

सिद्धारामैय्यांनी खेचला महिलेचा पदर

 

राज्य सरकारमध्ये ही वादावादी सुरू असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या भलत्याच कारणामुळे टीकेचे लक्ष्य ठरले. एका कार्यक्रमात लोकांशी संवाद साधत असताना एका महिलेने सिद्धरामैय्या यांच्याकडे येऊन आपल्या तक्रारी सांगितल्या. यावर सिद्धरामैय्या यांनी भडकून तिच्या हातातील माईक काढून घेतला आणि त्याचवेळी तिचा पदरही खेचला. या अत्यंत हीन आणि गलिच्छ वर्तनाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यामांवरून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, कर्नाटक राज्यासह देशभरातून या कृतीबाबत सिद्धरामैय्या यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@