‘बळीराजाचे प्रश्न संघटनेतूनच सुटतील’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2019   
Total Views |



पुजाऱ्याचा मुलगा ते प्राध्यापक आणि पुढे भारतीय किसान संघातर्फे शेतकरी आणि शेतमजुरांसाठी काम करताना चंद्रकांत कुडे यांनी समाजबांधवांसाठीच काम केले.


कर्जतमधील शेतकरी बांधवांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण होण्यासाठी कुडे नवीन प्रयोग करीत असतात. शेतकऱ्यांच्या समस्या सर्वत्र समान असल्या तरी, त्यावर त्या त्या भौगोलिक क्षेत्राचा परिणाम होत असतो. या सर्व बाबींचा विचार करून त्यांच्या समस्यांवर काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या शेतकरी बांधवाचे दैनंदिन जगणे माहिती असणे गरजेचे आहे. नुसती माहिती असून फायदा नाही, तर त्या जगण्याची संवेदना जाणवली पाहिजे. या संवेदनेतूनच चंद्रकांत कुडे हे कर्जत परिसरामध्ये शेतकरी बांधवांसाठी काम करतात. त्यांना जाणवले की, शेतकऱ्यांची नवीन पिढी शेती करण्यास नाखूश आहे. परिणामी, शेती व्यवसायामध्ये वृद्ध आई-बाप राबतात किंवा मजूर ठेवले जातात. पर्यायाने काही वर्षांनी शेती तोट्यात जाते. दुसरे असे की, रासायनिक खते वापरून केलेल्या शेतीचा गंभीर परिणाम जसा तो शेतमाल वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो; तसाच तो परिणाम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवरही होतो. या साऱ्या गोष्टींचा अभ्यास करून परिसरातील शेतकऱ्यांचे संघटन करण्यावर चंद्रकांत यांनी लक्ष केंद्रित केले. त्याचबरोबर ते कर्जत येथील अभिनव विद्यामंदिरचे विश्वस्त म्हणूनही काम करतात. याचा उल्लेख यासाठी की, शेतकरी कुटुंबातील तसेच परिसरातील वंचित गरजू विद्यार्थ्यांना शाळेची सुविधा प्राप्त व्हावी यासाठीदेखील ते प्रयत्न करत आहेत.

 

चंद्रकांत कुडे हे मूळ पेशाने शिक्षक. त्यांचे मूळगाव विदर्भातील उमरखेड. पण त्यांचे पूर्वज कामानिमित्त मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये स्थायिक झाले आणि कुडे कुटुंब हिंगोलीकर झाले. सीतारामपंत कुडे आणि सरस्वती यांना चार मुले. एक मुलगी व तीन मुलगे. त्यापैकी एक चंद्रकांत. सीतारामपंत गावात पूजा सांगायचे. त्यावरच त्यांचा प्रपंच चालायचा.घरात अर्थाजनाची कमी. त्यामुळे हौसमौज वगैरे शब्द कुटुंबापासून कोसो अंतर दूर. मात्र, त्या परिस्थितीमध्येही सीतारामपंत आणि सरस्वतीबाईंनी मुलांवर उत्तम संस्कार केले. आयुष्यात कितीही मोठे प्रश्न उभे राहिले तरी, धैर्याने तोंड द्यायची हिंमत त्यांनी मुलांना दिली. त्या काळात उमरखेडच्या चिन्मयमूर्ती संस्थानचे मंदिरही हिंगोलीमध्ये होते. त्या मंदिराचे पुजारी म्हणून सीतारामपंत काम करीत. त्यावेळी मंदिराची स्वच्छता, पूजापाठ, आरती, प्रसादाची सर्व कामे छोटा चंद्रकांत करीत असे. १९६०चा काळ होता. देशात सामाजिक, राजकीय स्थित्यंतरे घडत होती. हिंगोली तर छोटासा तालुका. पण जातीयवादाचे विषारी कवडसे कुडे कुटुंबीयांच्या घरात नव्हते. चंद्रकांत यांच्या वर्गात सर्व समाजाचे मित्र. पण पुजाऱ्यांचा मुलगा म्हणून विशिष्ट तथाकथित शिवाशिवीच्या चालीरीती चंद्रकांत यांनी पाळल्या नाहीत. किंबहुना त्यांना घरातूनच तशी शिकवण होती. कारण, त्यांच्या घरी अनेक कामांसाठी अठरा पगड जातींची माणसं यायची. घरी आल्यावर त्यांच्या घरातल्या मंदिरामध्ये विराजमान झालेल्या रामाच्या मूर्तीचे दर्शन घेत. त्यामुळे जातपात, स्पृश्य-अस्पृश्य या नकारात्मक विचारसरणीपासून ते दूरच राहिले. त्यामुळे समाजाच्या बहुपेडी संस्कृतीचे वास्तव ते समजू शकले. पण त्यांना समाजसेवेचा आणि वंचित-गरजूंच्या संवेदनात्मक जीवनासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली ती जनूभाऊ रानडे यांच्याकडून. जनूभाऊ हिंगोलीला रा.स्व.संघाचे प्रचारक म्हणून आले. गावात येताक्षणी मंदिरामध्ये झाडलोट करणारा, पूजा-अर्चा करणारा आणि त्याचबरोबर गावच्या सगळ्याच सवंगड्यांबरोबर समरस भावाने मिळून मिसळून राहणारा चंद्रकांत त्यांना दिसला. ते चंद्रकांतच्या घरी आले. त्या दिवसापासून चंद्रकांत रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. त्यावेळी खेळातून होणाऱ्या प्रबोधनातून ते घडू लागले. तिथे मिळालेल्या बौद्धिकामधून त्यांना हिंगोलीबाहेरचे जग दिसू लागले. देशासाठी, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, ही जाणीव दृढ होऊ लागली.

 

पुढे ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी नांदेडला गेले. वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी मिळवली. आणीबाणीचा काळ. त्यावेळी अनेक स्वयंसेवकांना तुरुंगवास झाला होता. पण, शाखा बंद पडू द्यायच्या नव्हत्या. त्यामुळे इतर माध्यमांतून जनसंपर्क करत राहणे गरजेचे होते. ते काम चंद्रकांत करू लागले. सत्याग्रहही केला. ४० मित्रांनी मिळून गावात प्रचारफेरी काढली आणि घोषणा दिल्या. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘लोकसंघर्ष समितीचा विजय.’ त्यासाठी त्यांना दोन महिने, दोन दिवसांची शिक्षा झाली. तुरुंगातून जेव्हा घरी परत आले, त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले, “आता घरी बसा आणि शेती करा. हे उद्योग बंद करा.” पण तरीही घरच्यांना माहिती होते की, चंद्रकांतचे विचार योग्यच आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांनी धुळ्याला प्रचारक म्हणून जायचे ठरवले तेव्हाही घरातून सौम्य विरोध झालाच पण, त्यावेळेपुरताच. मात्र, प्रचारक म्हणून जबाबदारी असताना चंद्रकांत यांना शेतकरी आणि मजुरांचे जगणे खऱ्या अर्थाने कळले. पुढे कर्जत येथे प्राध्यापक म्हणून नोकरी करताना त्यांनी भारतीय मजदूर संघाची जबाबदारी स्वीकारली आणि शेतकरी, शेतमजुरांसाठी काम करू लागले. कर्जत परिसरातील शेतमजुरांच्या वस्तीमधून, शेतकऱ्यांच्या झोपड्यांमधून चंद्रकांत यांच्या कामाची पावती मिळते. चंद्रकांत म्हणतात, “बळीराजाचे प्रश्न संघटनेतूनच सुटतील.”

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@