महाराष्ट्र पेटवणारा ‘बंटी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019
Total Views |



गेल्या काही वर्षांपासून स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करणाऱ्या मंडळींनी शिव-शंभुचरित्राचे विकृतीकरण करण्याचा सपाटा लावला. जितेंद्र आव्हाड, त्यांचा पक्ष आणि अन्य विकृतांनी त्याला हातभार लावत जातीय तेढ निर्माण करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. इतिहास अभ्यासक, संशोधक म्हणविणारे ‘इतिहास्यकार’ही याच काळात मतलबी लोकांच्या अंगाखांद्यावर भूछत्रासारखे उगवले.


महाराष्ट्राचा सातबारा आपल्याच नावावर असल्याच्या आविर्भावात बरळणाऱ्या जितेंद्र (बंटी) आव्हाडांनी नुकतीच वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्र पेटवण्याची धमकी दिली. निमित्त होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेला ‘पद्मविभूषण’ पुरस्कार. पहिली गोष्ट म्हणजे जितेंद्र आव्हाड आज कितीही वैचारिक आगी लावण्याच्या बाता मारत असले तरी, आव्हाडांचा आवाका मुंब्र्यापुरताच अन् जातीयवादाचा भडका उडवण्यापलीकडे नसल्याचे कुणीही सांगू शकेल. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त एकाच जातीचा विरोध अन द्वेष करणाऱ्यांकडून यापेक्षा अन्य काही चांगल्या गोष्टी होऊ शकत नाही, हेही खरेच म्हणा. दुसरीकडे महाराष्ट्र जाळण्याची इच्छा बाळगून असलेल्या आव्हाडांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधात काय काय गरळ ओकली, हे एव्हाना ट्विटर, फेसबुक आणि अन्य प्रसारमाध्यमांतून सर्वांसमोर आले आहेच. त्यामुळे ती विधाने पुन्हा एकदा इथे देण्याचे काही कारण नाही. तरीही एकसंध हिंदू समाजाला पोखरणाऱ्या अनेकानेक वाळवींपैकी एक असलेल्या जितेंद्र आव्हाडांच्या विधानांचा समाचार घेणे हे आपले कर्तव्य ठरते, म्हणून त्यांचे बाबासाहेबांवरील आरोप तरी काय आणि त्यात सत्यता ती किती, हे पाहूया. बाबासाहेब पुरंदरेंनी ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊसाहेबांची बदनामी केल्याचा आणि जेम्स लेन या अमेरिकन लेखकाला शिवाजी महाराजांवरील पुस्तक लिहिण्यासाठी अवमानकारक माहिती पुरवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. असाच आरोप जितेंद्र आव्हाड आणि संभाजी ब्रिगेडसारख्या जातीयवाद्यांनी, तसेच आव्हाडांच्या पक्षाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या बाबासाहेब पुरंदरेंना दिल्या गेलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावेळीही उकरून काढला होता. तद्नंतर मात्र आव्हाड किंवा तत्सम संघटनांच्या आरोपांना काडीचाही आधार नसल्याचे संदर्भ व साक्षी पुराव्यांनिशी वेळोवेळी सिद्ध झाले. पुरंदरेंच्या लिखाणावर व व्यक्तिमत्त्वावर करण्यात येणाऱ्या दोन्ही आरोपांची रोखठोक उत्तरे इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक आणि सर्वसामान्य शिवप्रेमींनीदेखील दिली. अर्थात, चोहोबाजूंनी मार खाण्याचीच सवय लागलेल्या या लोकांचे एवढ्यावरच समाधान होईल ते कसे? म्हणून आपली हीच हौस भागवण्यासाठी जातीद्वेषाचा गांजा लावलेल्या या मंडळींनी बाबासाहेबांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अर्थात, समोर आलेल्या प्रकरणावर सांगोपांग विचार करुन व सखोल अभ्यास करून निकाल देणाऱ्या न्यायालयाने या फाटक्या तोंडाच्या लोकांची योग्यता दाखवत पुरंदरेंविरोधातील याचिका फेटाळली व संबंधितांना १० हजारांचा दंडही ठोठावला. सोबतच “बाबासाहेब पुरंदरेंच्या आजवरच्या लिखाणात वादग्रस्त काहीही नाही,” असे म्हणत बाबासाहेबांच्या कार्याची प्रशंसाही केली. पण डोक्यात जातीयवादाचा किडा वळवळत असलेल्या जितेंद्र आव्हाडांची खोड अजूनही मोडल्याचे दिसत नाही. म्हणूनच असंबद्ध विधाने आणि वक्तव्ये करत आपल्या बुद्धीची लाज वेशीवर टांगत आव्हाडांनी त्याच त्या जुन्यापुराण्या आरोपांचा पाढा पुन्हा एकदा वाचला.

 

इतिहास वाचताना संदर्भासहित न वाचता केवळ जातीय द्वेषातूनच वाचणाऱ्या मंडळींना विशिष्ट व्यक्ती व समाजाविरोधात उर बडवण्याची उबळ दरवेळी येते. कोणताही ऐतिहासिक प्रसंग आणि घटना फक्त जातीच्या चष्म्यातून पाहणाऱ्या या लोकांना तत्कालीन परिस्थिती, चालीरिती, प्रथा, परंपरा, संस्कृती या कशाशीही घेणेदेणे नसते. उलट या सगळ्या गोष्टी वगळून ऐतिहासिक घडामोडींतही एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध उभे करण्याचीच चढाओढ या मंडळीत लागलेली असते. म्हणूनच काळाच्या उदरात गडप झालेल्या इतिहासातल्या अशा कितीतरी प्रसंगांना या लोकांनी आपल्या मनातल्या जातीयवादाने बरबटल्याचे पाहायला मिळते. हे बहुतेक सर्वच ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबद्दल झाल्याचे, होत असल्याचे दिसते. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे तर अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. परिणामी, अशी दोन थोर व्यक्तिमत्त्वे या करंट्यांच्या जातीयवादाच्या तावडीतून सुटतील, अशी कितीही अपेक्षा बाळगली तरी ते होणे शक्य नाही. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून आपल्या स्वार्थासाठी इतिहासाचा वापर करणाऱ्या मंडळींनी शिव-शंभुचरित्राचे विकृतीकरण करण्याचा सपाटा लावला. जितेंद्र आव्हाड, त्यांचा पक्ष आणि अन्य विकृतांनी त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हातभार लावत राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे, सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक म्हणविणारे ‘इतिहास्यकार’ही याच काळात मतलबी लोकांच्या अंगाखांद्यावर भूछत्रासारखे उगवले. आम्ही सांगू तोच खरा इतिहास, असे म्हणत या लोकांनी एका जातीला कायमच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अर्थात, संबंधित व्यक्तींकडून काही चुकीच्या गोष्टी, अपराध झाले असतीलच. ते नाकारण्याचा प्रश्नही नाहीच. पण म्हणून संपूर्ण समाजालाच वाईट ठरवण्याचे काय कारण, हाही प्रश्न उपस्थित होतोच की! पण हे विसरलेल्यांनीच कसलाही संदर्भ न घेता गलिच्छ आरोप कराण्याचा, राष्ट्रपुरुषांचे विकृतीकरण करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवचरित्र लिहिले, त्यांनी त्यांनी ते फक्त स्वतःच्या जातीला मोठे करण्यासाठीच लिहिल्याचे आरोपही या लोकांनी केले. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील आरोप हे त्याचेच उदाहरण.

 

खरे म्हणजे मागचे-पुढचे संदर्भ न घेता एखादेच विधान व शब्द समोर ठेवले, तर जगातल्या सर्वच पुस्तकांवर आक्षेप घेता येतील. पण हे समजून घेण्याची कुवत नसलेल्या लोकांनी बाबासाहेबांच्या शिवचरित्रावर आक्षेप घेतला व शेडा-बुडखा नसलेले आरोप केले. मात्र, ज्याने ते शिवचरित्र वाचले, अशा लोकांना त्यात काही आक्षेपार्ह असल्याचे आढळले नाही. उलट बाबासाहेब पुरंदरेंनी अर्धशतकाहून अधिक काळ शिवचरित्राचा ध्यास घेऊन ते पुस्तकाच्या, महानाट्याच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचवल्याचे दिसते. आजपर्यंत ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाच्या जवळपास पाच लाखांपेक्षा अधिक प्रती घराघरात गेल्या. जर खरेच या पुस्तकात काही वावगे असेल तर हे कसे शक्य झाले असते? दुसरीकडे आज जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांना शिवद्रोही म्हणताना दिसतात, पण शिवाजी महाराजांची खरोखरच बदनामी करणाऱ्या ‘शिवाजीचे उदात्तीकरण’ या पुस्तकाला आव्हाडांनी विरोध केल्याचे कधी दिसले नाही. उलट या पुस्तकाचे शनिवार वाड्यावरील ज्या एल्गार परिषदेत वाटप झाले, त्याचे समर्थन करताना ते दिसतात. जेम्स लेनच्या विकृत पुस्तकाच्या प्रती वाटणाऱ्या आणि टिपू सुलतानसारख्या धर्मांधाशेजारी शिवाजी महाराजांची प्रतिमा लावणाऱ्यांना आव्हाडांचा पाठिंबा असतो. तर जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी यावी, पुस्तक मागे घेतले जावे, म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला अन्य इतिहास अभ्यासक व संशोधकांच्या सहीनिशी पत्र पाठवणारे बाबासाहेब पुरंदरे आव्हाडांच्या लेखी शिवद्रोही असतात. यावरून आव्हाडांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचेच समजते. शिवाय अफझल खान शिवाजी महाराजांना मारायला आला नव्हता, असे विधानही याच जितेंद्र आव्हाडांनी केले होते. असा विकृत इसम आता शिवसन्मान परिषदा घेत महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करत आहे. आव्हाडांच्या या विधानातून आणखीही एक अर्थ निघतो. लवकरच लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. त्यामुळे येत्या काळात जर महाराष्ट्र पेटला, तर तो आम्ही पेटवला असे समजावे, असे अप्रत्यक्षपणे आव्हाडांनी सांगितल्याचे दिसते. इशरत जहाँसारख्या दहशतवादी मुलीला मासूम म्हणत तिच्या नावाने मुंबईच्या एका कोपऱ्यात अॅम्बुलन्स फिरवणारी व्यक्ती असलीच कामे करू शकते, हेही खरे. आज देशात आणि राज्यात पेटवण्यासारखे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, पाणी व्यवस्थापनाचे, भ्रष्टाचाराचे प्रश्न हाती घेऊन आजही रान उठवता येऊ शकते. पण ते प्रश्न उचलून हिंदू समाजात दुफळी निर्माण करण्याचे काम कसे पूर्ण होईल? सोबतच मुंब्र्यातून पकडलेल्या इसिस समर्थकांविरोधातही आव्हाड कधी तोंड उघडताना दिसत नाहीत, उलट पकडले गेलेल्यांप्रती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहानुभूती दाखवताना दिसतात. यावरुनच आव्हाड खऱ्याखुऱ्या प्रश्नांऐवजी भावनिक मुद्द्यांचा वापर आपल्या राजकारणासाठी करत असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच अशा लोकांच्या चुका, मतलबी राजकारण दाखवत, त्यावर आसूड ओढत, त्यांचे खरे चेहरे जनतेसमोर आणण्याचे काम आपण वेळोवळी केलेच पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@