‘जन संघर्ष यात्रा’ नावाची सहल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
सत्तेप्रमाणेच काँग्रेसची ही जनसंघर्ष यात्रा आता पाचव्या आणि अंतिम टप्प्यात आहे, असेच म्हटले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, यांच्यासारखे दिग्गज नेते या संघर्ष यात्रेत सहभाग घेणार होते, परंतु काही कारण पुढे काढत त्यांनी या यात्रेकडे पाठच फिरवली.
 

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसचं गेल्या काही महिन्यांपासून राज्यातल्या, देशातल्या लोकांवर प्रेम ऊतू चाललंय. त्यातच जनसंघर्ष यात्रा या नावाखाली काँग्रेसच्या नेत्यांनी सहलीचं आयोजन केलंय. संघर्षयात्रा आणि त्यानंतर आता ‘जन संघर्ष यात्रा’ याद्वारेच काँग्रेसला संघर्ष करावा लागतोय, हे नक्कीनिवडणुका आल्या की, राजकारणी मंडळी कामाला लागतात. एरव्ही पाच वर्षांमध्ये दुर्लभ झालेलं मुखदर्शनही या निमित्ताने दिवसातून किमान तीन वेळा होत असतं. त्यातच वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्या पक्षाला अचानक सत्ता गमवावी लागल्यानंतर काय यातना भोगाव्या लागत असतील, हे काँग्रेसकडे पाहून समजतं. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आज, ‘ना घरका ना घाटका’ अशी स्थिती झाली आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसने कर्नाटकात सत्तेसाठी केलेली खलबतं. सत्ता हवी आणि भाजपला नमवायचं यासाठी मोठा पक्ष असूनही काँग्रेसने जनता दलाला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊन टाकली आणि ‘सत्तेसाठी काहीही’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले. असो. महाराष्ट्रातही अगदी तीच स्थिती आहे. सत्तेसाठी काहीही करण्याची परिस्थिती काँग्रेसवर उद्भवली आहे.

 

जन संघर्ष यात्रा ही लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेली एक सहलच म्हणावी लागेल. एसी गाड्या, चकाचक तयार झालेले नेते यांना घेऊन ही सहल आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. भालचंद्र मुणगेकर, खा. हुसेन दलवाई अशा मोजक्याच काँग्रेसच्या नेत्यांची ही ‘संघर्ष’ यात्रा होती. ही तथाकथित सहल सावंतवाडीहून सुरू झाली. सहल जरी नवी असली तरी मुद्दे गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या सहलीत घासून चोथा झालेलेच होते. जुनेच मुद्दे नवं लेबल लावून पुन्हा जनतेसमोर मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न यानिमित्ताने सुरू होता. महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीची स्थिती आजही तशीच आहे आणि लोकांमध्ये न मिसळता काम करणारे नेते काँग्रेसच्या कमिटीमध्ये आताही मिरवत आहेत. लोकांमध्ये मिसळून काम करण्यासाठी तशा प्रकारची मानसिकता लागते आणि काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये ही मानसिकता पूर्वीही नव्हती आणि आजही नाही.

 

जन संघर्ष यात्रेत काँग्रेसी नेत्यांनाच आपल्या अस्तित्वासाठी किती संघर्ष करावा लागतोय, हेही दिसून आलं. यातल्याच एका सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधान करून तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टीका करण्यात आली. जन संघर्ष यात्रेत काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी शब्दांची सीमा पार केली. त्यांच्या भाषणात शब्दांचा दर्जा घसरल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस ही काही मोदींच्या बापाची मालमत्ता नाही. सत्ताबदल होत असतो. काँग्रेसची सत्ता येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाही पुरके यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला. “अनेक महिलांचे आयुष्य बरबाद करणारा बाबा राम रहीम हा फडणवीस यांना अष्टपैलू व्यक्ती वाटतो. आपला मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला आहे की, त्यांनी बाबा राम रहीम याला स्वत:च्या घरी घेऊन जावे. हा बाबा त्यांना एखादा पैलू तरी दाखवल्याशिवय राहणार नाही.” असे वक्तव्य करत आपल्या संस्कृतीचे आणि बुरशी लागलेल्या मेंदूचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. सत्तेच्या हव्यासापायी कोणत्याही थराला जाऊन वक्तव्य करण्याची मानसिकता यावेळीही दिसून आली. काँग्रेसचा नुकताच या यात्रेचा टप्पा कोकणातून सुरू झाला.

 
काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली. निवडणुका असताना ज्या प्रकारच्या वातावरण निर्मितीची आवश्यकता असते, तसं वातावरण या ठिकाणीही तयार होताना दिसत नाही. किंबहुना काँग्रेसी नेत्यांची तशी मानसिकताही दिसत नाही. अनेकांनी यावेळी भाजपने काय केले, हा प्रश्न उपस्थित केला. परंतु, गेल्या अनेक वर्षांच्या सत्तेत आपण काय दिवे लावले, याचं उत्तर द्यायला मात्र कोणी तयार होत नाही. काँग्रेसच्या कोकणातल्या जन संघर्ष यात्रेतही खा. नारायण राणे यांचाच मुद्दा उपस्थित करण्यात आला. विकास बाजूला सारायचा आणि वैयक्तीक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायच्या अशा स्थितीतून काँग्रेसला आज वाट काढणं शक्य होत नाही. सत्तेप्रमाणेच काँग्रेसची ही जनसंघर्ष यात्रा आता पाचव्या आणि अंतिम टप्प्यात आहे, असेच म्हटले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, यांच्यासारखे दिग्गज नेते या संघर्ष यात्रेत सहभाग घेणार होते, परंतु काही कारण पुढे काढत त्यांनी या यात्रेकडे पाठच फिरवली. त्यांच्या सहभागी न होण्याला प्रदेश काँग्रेसमधील संघर्षच कारणीभूत असल्याच्या दबक्या आवाजातील चर्चा समोर येऊ लागल्या आहेत. जनसामान्यांमध्ये जाऊन संघर्ष करण्यापूर्वी काँग्रेससारख्या पक्षाने आपल्या अंतर्गत संघर्षाबद्दल अधिक विचार करणे आवश्यक आहे. काँग्रेस आणि गटबाजी यांचं जन्मोजन्मीचं नातं आहे. त्यातच काँग्रेसमध्ये होणारी गटबाजी ही महाराष्ट्रातल्या जनतेला काही नवी नाही. याची प्रचिती वारंवार जनतेला येतच असते. जनसामान्यांशी काडीमात्र संबंध आणि संपर्क नसलेल्या नेत्यांना पक्षीय कामकाजात स्थान दिले जात नाही, ही काँग्रेसची खासियत म्हणावी लागेल तर दुसरीकडे ज्या नेत्यांची नाळ थेट जनतेशी जोडली आहे, त्यांना पक्षीय कामकाजापासून दूर लोटण्याचं काम सततच काँग्रेसकडून करण्यात येते.
 
 
आज काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला भाजपसारख्या पक्षाला शह देण्यासाठी पंधरा-वीस छोट्या पक्षांची मदत घेऊन महाआघाडी करावी लागते, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाचा हा थेट झालेला पराभवच मानावा लागेल. याद्वारे कदाचित देशात महाआघाडीचं सरकार येईलही, हे आपण गृहीत धरू. पण या सरकारचं भवितव्य काय किंवा या सरकारची निर्णयक्षमता कशी आणि किती प्रभावी असेल, याबाबत विचार न केलेलाच बरा. असो. राज्याचा विचार केला तर काँग्रेसच्या या संघर्ष यात्रेत त्या त्या ठिकाणचे स्थानिक प्रश्न, एखाद्या ठिकाणी कमी पडत असल्यास सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवण्यासारखे प्रकार काँग्रेसकडून झाले असते तर ते नक्कीच स्वीकार करण्यासारखे होते. या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांव्यतिरिक्त स्थानिक प्रश्न, राज्याला पुढे नेण्याची दिशा, त्याबाबत आखलेली रणनीती याबाबत मांडणी होणे आवश्यक होते. सत्ताधारी असतो तसा त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधक हा हवाच; अन्यथा लोकशाहीची एकाधिकारशाही होण्यास वेळ लागणार नाही. परंतु सत्ताधार्‍यांनी मार्ग दाखवायचा आणि आम्ही केवळ आरोपच करायचा, ही मानसिकता नक्कीच गैर आहे. कोणत्याही प्रश्नांबाबत ठाम भूमिकाच नाही, हे या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवले. ही कदाचित अंतिम टप्प्यातली संघर्ष यात्रा असेल. ही जनसंघर्ष यात्रा रत्नागिरी, रायगड मार्गे ठाणे भिवंडी या ठिकाणी येऊन संपली. कोकणातून सुरू झालेल्या यात्रेदरम्यान मूळ ठिकाणी काही नेत्यांनी दांडी मारून काँग्रेसमधला अंतर्गत संघर्षही पुन्हा एकदा सर्वांसमोर आणलाच. त्यामुळे जनसंघर्षापेक्षा ही जास्त सहलच झाली असं म्हटलं तरी वावगं ठरायला नको.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@