हा विधायक वृत्तीने काम करणाऱ्या संघटनाचा सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |



मुंबई : "केंद्र सरकारने दिलेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार हा संघटीतपणे, विधायक वृत्तीने आणि कोणत्याही हितसंबंधांशिवाय काम करणाऱ्या संघटनाचा सन्मान आहे." असे प्रतिपादन नुकतेच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले डॉ. अशोकराव कुकडे यांनी दै. ‘मुंबई तरूण भारत’शी बोलताना केले.

 

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारजाहीर केले. यामध्ये लातूर येथील विवेकानंद संशोधन केंद्राचे संस्थापक डॉ. अशोकराव उपाख्य काका कुकडे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्वतः डॉ. अशोकरावांनी दै. ‘मुंबई तरूण भारत’सोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास मला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून फोन आला आणि त्यांनी मला असा पुरस्कार जाहीर झाल्याचे सांगितले. हे मला अगदीच अनपेक्षित होते. तसेच, आपण केलेल्या कामाची दखल शासनाकडून घेतली जाईल, हेही अनपेक्षित होते. मी स्वतःही आजवर अशी कोणत्याच पुरस्काराची अपेक्षा केली नव्हती. परंतु, या पुरस्कारामुळे आजवरच्या कामाला एकप्रकारे मान्यताच मिळाली असून पुरस्काराची बातमी समजताच माझ्या सहकाऱ्यांना झालेल्या आनंदावरून या पुरस्काराचे महत्व लक्षात येते."

 

हा पुरस्कार सामुहिक परिश्रमांना मिळालेला पुरस्कार आहे, असे डॉ. कुकडे यांनी ठळकपणे नमूद केले. आरोग्य, शिक्षण, संघकार्य, जलयुक्त शिवार, शेती यांसह अनेक विषयांत अथकपणे काम करणारी एक चांगली ‘टीम’ उभी राहिली आणि त्या टीमला मिळालेला हा पुरस्कार असल्याचे ते म्हणाले. या पुरस्काराबाबत आपल्याला आनंद आणि अभिमान वाटतो, असे सांगत संघटीतपणे, विधायक वृत्तीने व कोणत्याही हितसंबंधांशिवाय काम करणाऱ्या संघटनाचा हा सन्मान आहे, असे डॉ. अशोकरावांनी प्रांजळपणे सांगितले. तसेच, हा लातूरचा सन्मान आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. तसेच, हा पुरस्कार आमच्या टीमसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वासही डॉ. अशोकराव कुकडे यांनी यावेळी व्यक्त केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@