धरती कहे पुकार के...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



अमेरिकेतल्या शालेय पाठ्यपुस्तकातूनआर्यांचे आक्रमण’ ही संकल्पना काढून टाकण्यात आली आहे. आपल्याकडचे विद्वान नि विचारवंत मात्र सगळ्या नव्या संशोधनाकडे साफ दुर्लक्ष करून व्हिन्सेंट स्मिथ साहेबांचे जुनचे धडे गिरवत आहेत. आता या अंधश्रद्धेचं निर्मूलन कुणी करायचं?


वरील मथळ्यावरून आपला कदाचित असा समज होईल की, मी आज आपल्यासमोर जुन्या हिंदी चित्रपटाचा विषय मांडणार आहे. १९५० ते १९७० अशी तीन दशकं आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत ख्वाजा अहमद अब्बास, बलराज सहानी, साहिर लुधियानवी, चेतन आनंद, राज कपूर इत्यादी डाव्या विचारसरणीची कलावंत मंडळी बराच प्रभाव टाकून होती. हे लोक वरील मथळ्याच्या जवळपास जाणारे चित्रपट काढून डाव्या विचारसरणीचा प्रचार वगैरे करायचे. पण मला आज त्याबद्दल सांगायचं नसून, ‘उत्खनन’ या विषयाबद्दल सांगायचं आहे. अयोध्या राममंदिराच्या स्थळी, भारतीय पुरातत्त्व खातं किंवा ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेने उत्खनन केलं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण, त्याबाबतचा निर्णय देण्यात जी चालढकल केली जात आहे; त्यावरून आपण पुरातत्त्व खात्याच्या उत्खनन अहवालात काय असेल याचा तर्क करू शकतो. काही वर्षांपूर्वी डॉ. स्वराज्य प्रकाश गुप्त आणि डॉ. बी. बी. लाल या दोन पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी अयोध्येत उत्खनन केलं होतं. त्या विषयावरच त्या दोघांचं सुंदर, सचित्र पुस्तक केव्हाच प्रकाशित झालेलं आहे. ती चित्र पाहिली तरी आपल्याला नव्या उत्खननातून काय निष्कर्ष निघाला असेल, याची सहज कल्पना येते. साधारण शंभर वर्षांपूर्वी राखालदास बॅनर्जी या पुरातत्त्व संशोधकाला तत्कालिन सिंध प्रांतात सिंधू नदीच्या खोऱ्यात एका विशाल टेकडीखाली एक अख्खं शहरचं सापडलं आणि तेच मोहेंजोदरो. अत्यंत उत्कृष्ट स्थापत्य, उत्कृष्ट बांधणी, उत्तम जलव्यवस्थापन, सांडपाण्याचा निचरा करण्याची अद्ययावत व्यवस्था इत्यादी त्या नगराची आधुनिक म्हणावीत अशी वैशिष्ट्यं पाहून इंग्रज सरकार धास्तावले. कारण, प्राचीन भारतीय (म्हणजे अर्थातच हिंदू) स्थापत्यकार्‍यांना नगररचना शास्त्राचं इतकं अद्ययावत ज्ञान होतं हे जर कबूल केलं, तर मग जगातला सगळा शहाणपणा ग्रीस आणि रोममध्ये निर्माण झाला आणि त्याचे वारस आम्ही युरोपीय लोकच फक्त आहोत; बाकीचे सगळे काळे, आशियाई, नीगर आणि नेटिव्ह लोक आमची गुलामगिरी करण्यासाठीच फक्त जन्मले आहेत, हा महान सिद्धांत कोसळून पडला असता की हो! तेव्हा मग व्हिन्सेंट स्मिथ साहेब पुढे सरसावले. त्यांनी मोहेंजोदरोचा बारकाईने अभ्यास करून एक दणकटसा ग्रंथ प्रसवला. या ग्रंथात त्यांनी असं प्रतिपादन केलं की, मोहेंजोदरो ही नगरी द्रविड वंशीय लोकांनी वसविलेली होती. वायव्येकडून आलेल्या आर्य आक्रमकांनी तिच्यावर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली, माणसांची कत्तल केली इत्यादी. म्हणजे भारतीयांना आपल्या पूर्वजांबद्दल अभिमान न वाटता उलट आर्य-द्रविड संघर्षाबद्दल त्यांच्या मनात तिरस्कार, घृणा किंवा किमान गोंधळ निर्माण व्हावा, असा हा पक्का बंदोबस्त होता. ही मात्रा किती अचूक लागू पडली पाहा, भारतीयांच्या कित्येक पिढ्या मोहेंजोदरोचा खोटा इतिहास शिकतच वाढल्या.

 

परंतु, विज्ञान हे कधी थांबून राहत नाही. गेल्या ५० वर्षांत उत्खनन विज्ञानाने आणखीनही कित्येक गोष्टी उजेडात आणल्या आहेत. मोहेंजोदरो आणि हडप्पा प्रमाणेच लोथल, कालिबंगा, चाहूंजोदरो, धोलवीरा आदी डझनभर ठिकाणी उत्खननं झाली आहेत आणि तिथल्या धरित्रीच्या कुशीतून विलक्षण गोष्टी बाहेर आल्या आहेत. लोथल हे शहर अत्यंत भरभराटीला आलेलं होतं. तिथे एक उत्तम बंदर होतं. एवढंच नव्हे, तर तिथे जहाजांच्या दुरुस्तीसाठी ‘सुकी गोदी’ म्हणजे ‘ड्राय डॉक’सुद्धा होतं. ‘सुकी गोदी’ किंवा ‘ड्राय डॉक’ म्हणजे जिथे जहाजं पाण्यातून बाहेर काढून दुरुस्त केली जातात ती जागा. इंग्लंड हे दर्यावर्दी राष्ट्र असल्यामुळे त्यांचा असा दावा आहे की, ‘ड्राय डॉक’ ही संकल्पना मूळ आमची. आम्ही ती जगाला दिली. पण, लोथलच्या उत्खननात सापडलेली ‘सुकी गोदी’ किमान पाच हजार वर्षांपूर्वीची आहे, हे विज्ञानाने सिद्ध झालं आहे. आता बोला! कोण आधुनिक नि कोण मागासलेले? या सगळ्या पुराव्यांवरून संशोधक आता म्हणतायत की, ही सगळी शहरं मुळात सरस्वती नदीच्या काठी वसलेली होती. सरस्वती नदीचा प्रवाहच बदलल्यामुळे तिथल्या नागरिकांना ती वस्ती सोडून द्यावी लागली. हा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाला आहे. अमेरिकेतल्या शालेय पाठ्यपुस्तकातून ‘आर्यांचे आक्रमण’ ही संकल्पना काढून टाकण्यात आली आहे. आपल्याकडचे विद्वान नि विचारवंत मात्र सगळ्या नव्या संशोधनाकडे साफ दुर्लक्ष करून व्हिन्सेंट स्मिथ साहेबांचे जुनचे धडे गिरवत आहेत. आता या अंधश्रद्धेचं निर्मूलन कुणी करायचं? ती पाहा, एक उझबेक महिला. तिचं नाव आहे झफीरा इश्मीर झायेवा. अत्यंत विद्वान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या झफीराबाई पुरातत्त्वशास्त्रज्ञ आहेत. मध्य आशियात कझाकस्तान, किरगिजीस्तान इत्यादी जी तुर्कवंशीय मुसलमानी राष्ट्र आहेत, त्यातील एक उझबेकिस्तान खरं म्हणजे त्याचा उच्चार उझबेगिस्तान असा आहे. याचे नागरिक ते उझबेग. बाबर हा उझबेग होता. वंशाने तुर्क होता आणि त्याच्या टोळीचं किंवा कुटुंबाचं नाव होतं ‘मुघल.’ आधुनिक भाषेत ‘उझबेग’ ऐवजी ‘उझबेक’ म्हणतात. आपल्याकडे तामिळ भाषेत ही ‘ग’ आणि ‘क’चा असाच गोंधळ आहे. ‘दिनकर’ ऐवजी ‘थिनगर’ म्हणतात. कारण ‘द’ आणि ‘ध’चाही गोंधळ आहेच.

 

असो. तर ही सगळी मध्य आशियाई राष्ट्रं १९९१ पूर्वी सोव्हिएत रशियाच्या अंकित होती. त्यावेळी सोव्हिएत सत्ताधार्‍यांनी झफीराबाईंकडे एक मोठं विलक्षण काम सोपवलं होतं. दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजा एकाएकी सोव्हिएत रशियावर तुटून पडल्या होत्या. जर्मनी आणि रशिया यांच्यात आक्रमण न करण्याचा करार करून हिटलरने स्टालिनला पूर्णपणे गाफील ठेवलं होतं. बेसावध रशियावर अचानक हल्ला चढवून विद्युत्वेगाने मॉस्को गाठायचं आणि साम्यवादी राजवट कामयची गाडून टाकयची, असा हिटलरचा बेत होता. या बेताचं सांकेतिक लष्करी नाव होतं ‘ऑपरेशन बार्बरोझा.’ आणि खरोखरच जर्मन फौजा विजेसारख्या रशियात घुसल्या. ठिकठिकाणची बेसावध रशियन ठाणी निकालात काढत त्या खोलखोल घुसल्या. दहा दिवस रशियन फौजा मार खात मागे हटत होत्या. पण, मग त्यांनीही जबरदस्त प्रतिकार सुरू केला. स्टालिनग्राड आणि लेनिनग्राड शहरांच्या परिसरातल्या भीषण लढाया तर जगाच्या लष्करी इतिहासात कायमच्या जागा मिळवून बसल्या आहेत. या सगळ्या भयंकर लढायांमध्ये अक्षरश: लाखो जर्मन आणि रशियन सैनिक ठार झाले. त्यांच्या सहकार्यांकडे त्यांचं लष्करी इतमामाने दफन करण्यासाठीही वेळ नसायचा. मग एक मोठा खड्डा खणला जायचा. त्यात ते मृतदेह लोटून वर माती टाकण्यात यायची नि खूण म्हणून एक किंवा अनेक क्रूस उभारले जायचे. रशियाच्या अवाढव्य पसलेल्या प्रदेशात अशी अक्षरश: हजारो कबरस्थानं इतस्तत: पसरलेली आहेत. सोव्हिएत सत्ताधार्‍यांनी झफीराबाईंना हे काम दिलं की, गावोगाव फिरायचं. जुने दस्तावेज मिळवायचे किंवा वयोवृद्ध नागरिकांच्या भेटी घेऊन अशा दफनभूमींची माहिती मिळवायची. मग त्या दफनभूमी प्रत्यक्ष शोधायच्या. तिथे उत्खनन करायचं. मिळतील तितके मृतदेह, त्यांचे अवशेष, त्यांच्या अंगावरच्या वस्तू इ. मिळवायच्या. त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करायचा नि मग लष्करी सन्मानाने त्यांचं नियोजित ठिकाणी पुन्हा दफन करायचं.

 

१९९१ साली सोव्हिएत रशिया संपला. उझबेकिस्तान स्वतंत्र बनला. सोव्हिएत राजवट ही साम्यवादी म्हणजे नास्तिक राजवट होती. त्यांनी ख्रिश्वन चर्चेस जशी बंद केली, उद्ध्वस्त केली, तशीच मुसलमांनाचे दर्गे, मशिदीही धुळीला मिळवल्या. नव्या उझबेक सरकारने झफीराबाईंना नवीच कामगिरी दिली. सोव्हिएत सत्ताधार्‍यांनी उद्ध्वस्त केलेली अशी सगळी पवित्र इस्लामी स्थळं शोधून काढायची नि पुन्हा बांधायचीज्युलियन हॉलोवे हा इस्लामी तुर्कांवर संशोधन करणारा एक अमेरिकन अभ्यासक आहे. तो उझबेकिस्तानात बेनाकत किंवा शाहरुखिया नावाचं प्राचीन शहर शोधत होता. एक भाड्याची मोटार घेऊन रणरणत्या उन्हातून हॉलोवे बेनाकत शहराच्या (म्हणजे आजच्या एका भिकार खेड्याच्या) आसमंतात पोहोचला. एक नव्या कोऱ्या चमकत्या मिनाराने त्याच लक्ष वेधून घेतलं. जवळ जाऊन पाहतो, तर एका दर्ग्याचं बांधकाम चाललेलं. जेवणाची वेळ झालेली. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ झफीरा झासेवा मस्तपैकी जमिनीवर मांडी ठोकून जेवायला बसलेल्या. राजधानी ताश्कंदमधील उच्च पुरातत्त्व अधिकारी, ताश्कंदच्या अमीर तैमूर या राष्ट्रीय संग्रहालयातले तज्ज्ञ संशोधक इ. त्यांच्या अवतीभवती आहेत. मग ज्युलियन हॉलोवेला झफीराबाईंकडून माहिती कळली की, बेनाकत उर्फ शाहरुखिया गावी १३व्या शतकात एक महान इस्लामी संत होऊन गेला. त्याचा दर्गा सोव्हिएत सत्ताधार्‍यांनी उद्ध्वस्त केला होता. त्या दर्ग्याचं पुनर्निर्माण करण्यासाठी झफीराबाई या आडगावी मुक्काम ठोकून आहेत नि बाकी उच्च अधिकारी येऊन-जाऊन असतात. झफीराबाई या उत्खननशास्त्रातल्या उच्चविद्याविभूषित आहेत. पण आपण इथे येऊन हे कार्य हाती घेतल्यावर त्या संताने आपल्याला स्वप्नात दर्शन देऊन आशीवार्द दिला, ही गोष्ट त्यांनी हॉलोवेला मुद्दाम आवर्जून सांगितली. इहवाद वगैरे पुस्तकी तत्त्व भलत्या ठिकाणी न आणता, श्रद्धा नि श्रद्धास्थानं जपायची असतात, जागवायची असतात, हे ज्यांना कळत त्यांचं राष्ट्र लवकर उभं राहतं.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@