वडपे ते ठाणे आठ पदरी महामार्ग, शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली मार्गांचे ई-भूमिपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |


 

शीळफाटा-बदलापूर मेट्रोचा आराखडा लवकरच मंजूर करणार : मुख्यमंत्री

 

भिवंडी : नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी दिला जाईल. तसेच शीळफाटा ते बदलापूर मेट्रो मार्गासाठी आराखडा तयार केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. तर मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग, डोंबिवली ते वसई जलवाहतुकीचे १५ दिवसांत भूमिपूजन करुन महिनाभरात काम सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. इटलीतील व्हेनिस विमानतळाच्या धर्तीवर विमानतळावर जलवाहतुकीने जाण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या असल्याचेही ते म्हणाले.

भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने साकारलेल्या ११८३ कोटींचा वडपे ते ठाणे आठ पदरी महामार्ग आणि शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली अशा ४४५ कोटींच्या नव्या महामार्गाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी होते. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, किसन कथोरे, निरंजन डावखरे, महेश चौगुले, प्रवीण दरेकर, नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, एमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर आदी उपस्थित होते.

खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नानेच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आणि वडपे-ठाणे महामार्गाचे काम सुरू होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आवर्जून सांगितले. खासदार कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के निधी व शीळफाटा ते बदलापूर मेट्रोमार्गाची मागणी केली होती. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारकडे पत्र आल्यानंतर तत्काळ ५० टक्के निधीची हमी दिली जाईल. शीळफाटा व बदलापूर मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला जाईल. त्यानंतर शीळफाटा ते बदलापूर मेट्रोला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

आता मेट्रो व रस्ते मार्गाने भिवंडीचा विकास होईल. लॉजिस्टीक पार्कमुळे हजारो नोकऱ्या मिळतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. माणकोली व रांजणोली पुलाचे काम मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबले आहे. ते काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुर्गाडी पुलाच्या कामासाठी नव्याने निविदा काढल्या असून, ते कामही लवकरच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मुंबई, ठाण्यासह कोकणात जलमार्गाने वेगाने वाहतूक होऊ शकेल. त्यादृष्टीने एमएमआर क्षेत्रात जलवाहतुकीसाठी पुढील आठवड्यात आराखड्याला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या संमतीने दोन महिन्यांत रो-रो प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. वडपे ते ठाणे रस्त्याचे भूमिपूजन म्हणजे खासदार कपिल पाटील यांची स्वप्नपूर्ती आहे, असा उल्लेख करुन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नव्या रस्त्यांमुळे भिवंडीच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे नमूद केले.

 

मुंबई-वडोदरा महामार्गाच्या निविदा काढण्यात आल्या असून, १५ दिवसांत भूमिपूजनही करता येईल. त्याचप्रमाणे जलवाहतुकीसाठी डोंबिवली ते वसईपर्यंत आठ जेटींना मंजुरी दिली आहे. कांचनगाव, भाईंदर, अर्नाळा किल्ला, डोंबिवली, दुर्गाडी, कोलशेत, बाळकूम, गायमुख आदी जेटींच्या माध्यमातून स्वस्तात प्रवास करता येईल. ठाणे-वसई जलमार्गाचेही १५ दिवसांत भूमिपूजन होऊन, महिनाभरात काम सुरू करता येईल. जलवाहतूक महत्वाची असून, जलवाहतुकीचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी सुचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली. जेएनपीटीला दरवर्षी १६०० कोटींचा फायदा होत असून, महामंडळात जेएनपीटीचाही सहभाग घेऊ शकेल, असे गडकरी यांनी सांगितले. भिवंडी व कल्याण मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी मास रॅपीड ट्रान्सपोर्टचा फायदा होईल. माळशेज घाट रस्त्याचा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचे तातडीने काम सुरू करण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले. मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेचे कामही वेगाने सुरू असून, जमीन संपादीत करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अविकसित भागातील जमीन संपादन केल्याने, या भागाचा विकास होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. इटलीतील व्हेनिसच्या विमानतळावर जलमार्गाने पोचता येते. त्याच धर्तीवर मुंबईतील विमानतळावर पोचण्यासाठी जलमार्ग विकसित करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.

 

भगिरथाच्या गंगेप्रमाणे फडणवीस व गडकरींकडून निधी

ज्याप्रमाणे भगिरथाने गंगा आणली होती. त्याप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी आणला, असा आवर्जून उल्लेख खासदार कपिल पाटील यांनी केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात तब्बल २४ हजार कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. नितीन गडकरी यांनी केवळ १५ मिनिटांत शहापूर ते खोपोली महामार्गाला मंजुरी दिली होती. देशाच्या इतिहासात एवढ्या कमी वेळेत मंजुरी मिळण्याची ही पहिलीच घटना आहे, असे पाटील यांनी सांगितले. वडपा ते नाशिक महामार्गावर काही ठिकाणी अंडरपास उभारण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली.

 

...तर मुंबईचा समुद्रही मॉरीशसप्रमाणे शुद्ध : गडकरी

गंगा नदीचे शुद्धीकरण होऊ शकते, तर मुंबईचा अरबी समुद्रही मॉरीशसच्या समुद्राप्रमाणे शुद्ध करता येईल. मात्र, त्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@