‘विश्वस्त’ आणि ‘वारसदार’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019   
Total Views |

 

 
 
 
 
‘विश्वस्त’ या कादंबरीत हिंदू संस्कृतीच्या दोन्ही टोकांच्या धडपडीचे दर्शन घडते. आपली मूल्यपरंपरा कायम राहिली पाहिजे, अशी श्रीकृष्णाची धडपड आणि एकविसाव्या शतकातही त्याच परंपरेतून सामर्थ्य संपादन करू पाहणाऱ्या व्यक्तींची व संस्थांची धडपड या दोन्हींचे प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीत घडते. हे दर्शन घडवत असताना ‘विश्वस्त’ व ‘वारसदार’ या दोन अभिनव संकल्पना वसंत वसंत लिमये यांनी वापरल्या आहेत.
 

अगदी वेदकाळापासून हिंदू समाजात सांस्कृतिक सातत्य राहिले आहे. याचा अर्थ या सांस्कृतिक प्रवाहात परिवर्तन झालेले नाही, असे नाही. त्यात अनेक परिवर्तने झाली. परंतु, ती होत असतानाही त्यातील अनेक मूलभूत तत्त्वे कायम राहिली. त्यामुळे इजिप्त, ग्रीक, रोमन यांसारख्या अनेक प्राचीन संस्कृती लयाला गेल्या तरी हिंदू संस्कृतीतील जिवंतपणा मात्र कायम आहे. एवढेच नव्हे तर या परंपरेने अनेक साहित्यिक, सांस्कृतिक व कलात्मक आकारही घेतलेले आहेत. रामायण, महाभारतातील पात्रे दशावतारी किंवा अन्य लोकनाट्य परंपरेतून हिंदू भावविश्वाचा भाग बनली आहेत. भारतात ब्रिटिशांचे राज्य आल्यानंतर युरोपियन प्रबोधन पर्वातील मूल्यांनी नवशिक्षित हिंदू तरुणांना आकर्षित केले. त्यामुळे त्यांचे भावविश्व बदलले. युरोपियन नवमूल्यांच्या प्रकाशात जुन्या सांस्कृतिक मूल्यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला. पण यातूनच हिंदू परंपरेकडे नव्या चिकित्सक दृष्टीने पाहणारा नवा वर्ग तयार झाला. तो या परंपरेला नव्याने अभिव्यक्त करू लागला. जुन्या-नव्याची सांगड घालताना जुनी कथानके नव्याने मांडू लागला. वसंत वसंत लिमये यांनी लिहिलेली ‘विश्वस्त’ ही कादंबरी याच प्रकारात मोडते.

 

वसंत वसंत लिमये यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय त्यांच्या नावापासूनच होतो. पण, त्या तपशिलात इथे जाण्याचे कारण नाही. आयआयटीमधून त्यांनी बी. टेक. ही पदवी घेतली. ट्रेकिंग व रॉक क्लायम्बिंग ही त्यांनी जोपासलेली आवड. त्यात त्यांचा युरोप व भारतातील उदंड अनुभव. यातूनच त्यांनी निसर्ग, साहस व व्यवस्थापन यांची सांगड घालून व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था सुरू केली. हे सर्व करीत असताना त्यांना अनुभवायला आलेल्या आंतरराष्ट्रीय घटनांच्या आधारे भारतात घडलेल्या घटनांचा नव्याने अर्थ लावायला सुरुवात केली. त्यातून त्यांची ‘लॉक ग्रिफिन’ प्रकाशित झाली. या क्षेत्रातील जाणकारांच्या वर्तुळात तिचे उत्तम स्वागत झाले. एखाद्या इंग्रजी रहस्यमय कादंबरीप्रमाणे ही कादंबरी भारतातील अनेक राज्ये व अमेरिकेत फिरवून आणते. राजीव गांधी यांच्या हत्येवर नव्याने प्रकाश टाकणारी व वाजपेयींच्या भूमिकेवर चकित करून टाकणारी ही कादंबरी आहे. यावर यापेक्षा अधिक काही लिहिणे म्हणजे लेखक, कादंबरी व वाचक या तिघांवरही अन्याय करण्यासारखे होईल. एक वेगळ्या प्रकारचा आश्चर्यचकित करणारा आनंद ती देते. या कादंबरीत संघाचा संदर्भ येतो. लिमये यांची वैचारिक पार्श्वभूमी संघाची नाही. पण, त्यांनी तटस्थ भूमिकेतून, पण सकारात्मकरित्या संघाचा अनुभव घेतला. त्याचे प्रतिबिंब या कादंबरीत दिसते.

 

परंतु, त्यांची ‘विश्वस्त’ ही दुसरी कादंबरी मात्र एक नवी उंची गाठते. कृष्णाच्या काळापासून आत्ता घडत असलेल्या घटनांचा आंतरिक सांधा जोडण्याचा ती प्रयत्न करते. यादवीनंतर द्वारकेमध्ये झालेले अराजक, चाणक्य,चंद्रगुप्त, महमद गझनीचे आक्रमण, सरदार वल्लभभाई पटेल, २०१४ ची मोदींची लोकसभा निवडणूक, संघाची भूमिका या सर्व साखळीला जोडणारा म्हटले तर ‘काल्पनिक’ म्हटले तर शक्य वाटू शकतो, असा दुवा ही कादंबरी निर्माण करते. या कादंबरीत हिंदू संस्कृतीच्या दोन्ही टोकांच्या धडपडीचे दर्शन घडते. आपली मूल्यपरंपरा कायम राहिली पाहिजे, अशी श्रीकृष्णाची धडपड आणि एकविसाव्या शतकातही त्याच परंपरेतून सामर्थ्य संपादन करू पाहणाऱ्या व्यक्तींची व संस्थांची धडपड या दोन्हींचे प्रत्ययकारी दर्शन या कादंबरीत घडते. हे दर्शन घडवत असताना ‘विश्वस्त’ व ‘वारसदार’ या दोन अभिनव संकल्पना लिमये यांनी वापरल्या आहेत व संघ आणि मोदी यांच्या परस्पर संबंधातून त्यांचे नाते उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात कादंबरीत यांची नावे वेगळी आहेत. पण, ती कोणालाही कळू शकतील, अशी आहेत.

 

हिंदू सांस्कृतिक मूल्यांचे पिढ्यान्पिढ्या जतन करून ती पुढच्या पिढीच्या हाती सोपविणाऱ्या वर्गाला लिमये यांनी ‘विश्वस्त’ अशी संज्ञा दिली असून देश, काळ वर्तमानानुसार त्या आधारे परिवर्तन घडवू पाहणाऱ्यांना त्यांनी ‘वारसदार’ अशी संज्ञा दिली आहे. या परिवर्तनासाठी ‘विश्वस्ता’ने आपले धन हे ‘वारसदारा’ला उपलब्ध करून द्यायचे आहे. हे केवळ वैचरिक किंवा तत्त्वज्ञानाचे धन नाही, तर प्रत्यक्षातले आहे. ट्रेकिंग व ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेण्यात रस असलेली एक चौकडी ‘जेएफके’ या नावाने पुण्याच्या एका छोट्या जागेत बसून काम करत असते. ‘द विन्ची कोड’ मधल्या कादंबरीप्रमाणे या शोधात एक अकल्पित खूण त्यांच्या हाती लागते व त्याआधारे त्यांचे संशोधन सुरू राहाते. हे सर्व सुरू असतानाच यात एका अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीचे हितसंबंध दुखावले गेले असल्याने या गटातील काहीजणांचा पाठलाग होतो, हल्ले होतात व त्यात एकाचा मृत्यू होतो. तिथून हा केवळ इतिहास संशोधनाचा प्रकल्प राहात नाही तर ते रहस्यमय प्रकरण बनते. ते रहस्य उलगडण्याच्या आतच कथानकात मोदींचा प्रवेश होतो. त्या अनुषंगाने संघाचा प्रवेश होतो. कथानकाच्या ओघात संघाची कार्यपद्धती, विचार यांचा वाचकांना परिचय होत जातो. हे सर्व सहज व नैसर्गिकपणे कथानकाच्या ओघात घडत जाते.

 

अशा प्रकारच्या कादंबरीची सुरुवात जशी संथ असते तशी याही कादंबरीची सुरुवात संथ आहे. विविध पात्रांचा परिचय करून देत असताना महाराष्ट्रातील ट्रेकिंगची स्थाने, कोकण, शिवाजी महाराजांचा इतिहास अशी अनेक वळणे घेत जाते व नंतर अमेरिका, इंग्लंड, गुजरात अशा अनेक ठिकाणी कादंबरीतील घटना घडत जातात. भारतीय नौदलापासून इतिहास संशोधनातील चौर्य, आध्यात्मिक संप्रदायातील गुन्हेगारी अशा अनेक प्रसंगांतून वेगवेगळ्या मानवी स्वभावांचे दर्शन होत जाते. नंतर ती एवढी गतिमान होते की, वाचक कथानकासोबत ओढला जातो. त्याला धक्क्यामागून धक्के बसत जातात. पण एक उत्कंठावर्धक कादंबरी एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. आपला इतिहास जिवंत स्वरूपात पुढे येत राहतो. महाभारतातील काळ आपल्यासमोर जिवंत होऊन पुढे उभा राहतो.

 

ग्रीक, रोमन, युरोपियन इतिहासाची अनेक अंगांनी मांडणी झालेली आहे व तो इतिहास चित्रपट, मालिकांच्या स्वरूपात जगापुढे आला आहे. आपल्या इतिहासाबद्दल मात्र असे फारसे घडलेले नाही. प्रारंभीच्या काळात या इतिहासाला महत्त्व दिले गेले नाही. तो पाश्चात्त्य संशोधकांनी आपल्या चिकित्सक पद्धतीने मांडल्यानंतर त्यावर तीन तर्हेच्या प्रतिक्रिया उमटल्या. पहिली, आजचे सर्व दोष परंपरेच्या इतिहासाच्या गाठोड्यात बांधण्याची. दुसरी, ज्या चुकीच्या संकल्पनांच्या आधारावर अशी चिकित्सा झाली, त्याचीच री ओढण्याची आणि तिसरी आत्मगौरवाची. दूरदर्शनवर रामायण व महाभारताच्या मालिका लोकप्रिय झाल्यावर तशाच पौराणिक मालिकांचे पेव विविध वाहिन्यांवर फुटले. आज इतिहासावर आधारित अनेक मालिका विविध वाहिन्यांवर दाखविल्या जात आहेत. परंतु, या सर्व घटना एका सातत्यपूर्ण सांस्कृतिक प्रवाहाचा एक भाग आहेत, याचे भान त्यात नसते. या कादंबरीचे वेगळेपण हे की, वरवर पाहाता इतिहासातील घटनाक्रम स्वतंत्र दिसत असला तरी त्यात एक आंतरिक सातत्य असते. ही कादंबरी अशा सातत्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करते.

 

या कादंबरीत जो घटनाक्रम दिला आहे, ते निखळ कल्पनारंजन आहे म्हणून त्याची वासलातही अनेक वाचक लावू शकतात. अनेक मिथके निर्माण करण्याचे सामर्थ्य इतिहासात असते. अशी मिथके समाजमनाचा भाग बनून समाजमन घडवत असतात. अशा मिथकातून इतिहास पुन्हा जिवंत होत असतो. ज्यांना समाजमन घडवायचे असेल त्यांना परंपरेवर आधारित अशी कालसापेक्ष मिथकांची निर्मिती करावी लागते. कथा, कविता, विविध कलाप्रकार यातून पिढ्यान्पिढ्या रामायण, महाभारताच्या कथा नवनव्या रूपात प्रकट होत गेल्या, जनमानसावर आपला ठसा उमटवत गेल्या. त्यामुळे या कथांमधला ताजेपणा कमी झाला नाही. पण, एखाद्या महासागरासारख्या असलेल्या सांस्कृतिक प्रवाहातील सातत्याचा शोध घेऊन त्याची पुनर्मांडणी करण्याकरिता अभ्यास व प्रतिभेसोबत सकारात्मक दृष्टिकोनाचीही आवश्यकता असते. लिमये यांनी आपली बुद्धिमत्ता, तांत्रिक ज्ञान, अभ्यासशीलता याचबरोबर परंपरेकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन या कादंबरीतून दिला आहे. सव्वा वर्षात या कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. यावरून ती लोकप्रियही ठरली आहे. ही कादंबरी विविध भाषांमधून आणि अन्य माध्यमांद्वाराही समाजासमोर आली पाहिजे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@