अर्जुनाचा पराक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
श्रीकृष्णाने आपल्या हातांनी अश्वांना न्हाऊ घातले. त्या चारही घोड्यांवर चिलखते घातली. सारी शस्त्रे रथात ठेवली. वानराची प्रतिमा असलेला ध्वज रथावर फडकवला. रथ अर्जुनाकडे नेऊन तो म्हणाला, “अर्जुना, रथ तयार आहे. चल, आपण निघूया.” अर्जुनाने सुवर्णाचे चिलखत घातले होते. ते त्याला इंद्राने बहाल केले होते. एकाच वेळी हजारो बाण ते चिलखत झेलू शकत होते. स्वर्गीय रत्नांनी जडलेला मुकुट त्याच्या शिरावर होता. सारेच शुभशकून पांडवांच्या बाजूने होते. अर्जुनाने सात्यकीला आठवण करून दिली की, “युधिष्ठिराचे रक्षण करायचे आहे. कारण, द्रोणांनी दुर्योधनास वचन दिले आहे, युधिष्ठिरास कैद करून देईन. आज समोर दोन उद्दिष्टे आहेत, एक जयद्रथाचा वध आणि दुसरे युधिष्ठिराचे संरक्षण.”
 

अर्जुनाच्या रथाचा आवाज ऐकून कौरव सैन्यात घबराट पसरली. जयद्रथाचे तर हातपाय कापू लागले. अर्जुनाने आपला देवदत्त शंख फुंकला आणि त्याला कृष्णाच्या पांञ्जन्य शंखाची साथ मिळाली. तो आवाज ऐकून कौरव सैन्याच्या उरात धडकी भरली. अर्जुनाने कृष्णास सांगितले,“दुर्मर्षणाच्या दिशेने रथ ने.” निकराचे युद्ध झाले आणि अर्जुनाने कौरव सैन्याची कत्तल करण्यास सुरुवात केली. तो इतक्या वेगाने बाण सोडत होता की, डोळ्यांनी कुणी ते पाहू शकत नव्हते. खूप मोठ्या संख्येने कौरवांचा संहार अर्जुन करीत होता. दुर्मर्षणही घाबरून पळून गेला. समोरून हत्तींचे सैन्य घेऊन दु:शासन आला. परंतु, काही क्षणातच अर्जुनाने त्यांचा पाडाव केला. दु:शासनालाही पळून जावे लागले. अशा रीतीने अर्जुनाने पहिला ‘त्रिशूळ व्यूह’ मोडून काढला. आता द्रोणांच्या चक्रव्यूहासमोर सामना होता. अर्जुनाने दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंना प्रणाम केला. तो त्यांना म्हणाला, “मी तुमचा पट्टशिष्य आणि पुत्रासमान आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या, जसा आशीर्वाद एक पिता आपल्या पुत्रास देतो.” पण द्रोण म्हणाले, “अर्जुना, माझा पराभव केल्याखेरीज तू या व्यूहात प्रवेश करू शकत नाहीस.” अर्जुनाने आपल्या प्रिय गुरूंवर बाणांचा वर्षाव केला. दोघेही निकराने लढत होते. कृष्ण अर्जुनास म्हणाला, “तू या द्रोणांशी लढण्यात वेळ दवडू नको. व्यूहात प्रवेश कर.” मग अर्जुनाने रथ वळविण्यास सांगितले तेव्हा द्रोण तुच्छतेने बोलले, “अर्जुना, माझा पराभव न करता तू वाट काढत आहेस हे योग्य नाही. तू पळून जात आहेस.” त्यावर अर्जुन म्हणाला, “यावेळी मी तुमच्याकडे शत्रू म्हणून नाही, तर गुरू म्हणून पाहतो आहे. तुम्ही मला पित्यासमान आहात, तेव्हा आशीर्वाद द्या.”

 

अर्जुनाचा मुकाबला आता सुदक्षिण राजा आणि श्रुतायुध यांच्याशी होता. पाठोपाठ द्रोण पण आले. अर्जुनाचा चुलत भाऊ कृतवर्मा पुढे आला. “त्याला अजिबात दया दाखवू नकोस,” असे कृष्णाने सांगितले. कारण, ज्या सहाजणांनी अभिमन्यूचा कपटाने वध केला, त्यात एक कृतवर्मा होता. अर्जुनाने त्याला बेशुद्ध केले. मग श्रुतायुध पुढे आला. त्याची गदा हे एक विशेष आयुध होते जी त्याला वरुणाने दिली होती. जोवर ही गदा त्याच्याजवळ असेल तोवर कोणी त्याचा पराभव करू शकत नव्हता. पण, वरुणाने अशी अट घातली होती की, जर तो नि:शस्त्र योद्ध्यावर गदा चालवेल तर ती गदा उलटून त्याचाच विनाश करेल. त्याची बुद्धी फिरली आणि उत्साहाच्या भरात हे विसरून त्याने ती गदा श्रीकृष्णावर उगारली, जो नि:शस्त्र होता. कारण, त्याने हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे ती गदा त्याच्यावर उलटली. श्रुतायुधाचा असा नाश झाला. हे पाहून सुदक्षिण राजा त्वेषाने अर्जुनावर चालून आला. पण, अर्जुनाने एकातीक्ष्ण बाणात त्याचा वध केला. नंतर श्रुतायु आणि अच्च्युतायु हे बंधू अर्जुनावर चालून आले. श्रुतायुने तर कृष्णास बेशुद्ध पाडले. अच्च्युतायुने अर्जुनास जखमी केले. शेवटी अर्जुनाने इंद्रास्त्र सोडून त्या दोन्ही भावांना ठार केले. त्यामुळे कौरव सैन्य गर्भगळीत झाले. ते पळू लागले. अर्जुनाची सरशीच होत गेली.

 

- सुरेश कुळकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@