आप महाराष्ट्रात लोकसभा लढणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |


 
 

काँग्रेस-राष्ट्रवादीला मतविभाजनाचा फटका?

 

मुंबई : आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपचे महाराष्ट्राचे नेते (नि.) ब्रि. सुधीर सावंत यांनी नुकतीच याबाबत अधिकृत घोषणा केली. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपविरोधी मतांच्या विभाजनाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

आपने २०१४ लोकसभा निवडणुकीमध्येही महाराष्ट्रात काही ठिकाणी निवडणूक लढवली होती परंतु मोदीलाटेत त्यांचा पार धुव्वा उडाला होता. आता मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपली ताकद अजमावून पाहण्याचे ठरवले आहे. दिल्लीमध्ये सत्तेत असलेला आणि पंजाबसारख्या राज्यात थोडीफार ताकद असलेला आम आदमी पक्ष महाराष्ट्रात कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, आपमुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला याचा फटका बसण्याचीही शक्यता आहे. आधीच भारिप बहुजन महासंघ-एमआयएमच्या आघाडीमुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भासह काही भागांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यात आपदेखील महाराष्ट्रात उतरल्यामुळे काँग्रेसच्या अडचणींत वाढ होऊ शकते.

 

जिथे आमची ताकद आहे, अशा ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करू, असे जरी सुधीर सावंत यांनी म्हटले असले, तरी आपची दखल घ्यावी अशी ताकद राज्यात कुठेही सिद्ध झालेली नाही. त्यामुळे मुख्यतः शहरी भागात आप उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. येत्या ३० जानेवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून त्यांचा अभ्यास करून त्वरित उमेदवार घोषित करण्याचा निर्णय आप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत झाल्याचे सावंत म्हणाले.

 

भाजपच्या फसव्या घोषणांना कंटाळून जनता आता पर्याय शोधत आहे. भाजपचा पराभव करण्याची संधी आहे तिथेच आम्ही उमेदवार लढवणार आहोत. त्याची चाचपणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- (नि.) ब्रि. सुधीर सावंत, आप नेते

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@