यवतमाळच्या स्वामिनींचा दारूबंदीचा लढा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019   
Total Views |

आता मागच्या महिन्यात गाडगेबाबांची पुण्यतिथी होती. त्या वेळी त्यांचे अखेरचे कीर्तन- त्यांच्याच आवाजातले- पुन्हा एकदा एका मित्राने मला पाठविले. आजकाल हे सोपे झाले आहे. व्हॉटस्अॅपवर हे सहज शक्य असते. पंधराएक वर्षांपूर्वी गाडगेबाबांच्या या अखेरच्या अन् एकमेव, त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेल्या कीर्तनाची ध्वनिफीत करण्यासाठी मोठाच आटापिटा करावा लागला होता. बोरीवली पोलिस स्टेशनसमोर त्यांनी केलेले हे कीर्तन. तिथून परतताना त्यांना वाटेतच मृत्यूने गाठले. तत्पूर्वी, एका पोलिस शिपायाने त्या वेळी फॅड असलेल्या ‘टू इन वन’मध्ये हे टेप करून घेतले होते. त्यात हवेचा अन् कसला कसला गोंगाट होता. तो नव्या तंत्राने शक्य तितका साफ करून त्याच्या सीडीज् केल्या होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या वाटल्याही होत्या. त्यात गाडगेबाबा समूहाशी संवादी होतात. ‘‘आया-बहिनीय होऽऽ पती हा देवच असते, असते का नाही?’’ बायका एका सुरात ‘‘होऽऽ’’ असे म्हणतात. मग गाडगेबाबा विचारतात, ‘‘त्याची आपन पूजा केली पाह्यजे... पन जसा देव तसी पूजा. तो दारू पेत असीन त त्याची खेटरानं पूजा करा...’’ समोर बसलेल्या खेडोपाडीच्या, दारूने गांजलेल्या असंख्य महिलांनी एकच हुंकार भरत त्याला दिलेला प्रतिसाद त्या ध्वनिफितीत अधिक स्पष्टपणे जाणवत राहिला होता...
 
 
दारू प्यायली जात नाही, असे ठिकाण शोधूनही सापडणार नाही. वर्ध्याला पवनार आश्रमाच्या मागच्या झाडीझुडपाच्या भागात दारूच्या भट्ट्या होत्या. जी. ए. कुलकर्णी त्यांच्या एका कथेची सुरुवात करताना म्हणतात, ‘‘मी आता तुम्हाला इतकी प्राचीन गोष्ट सांगणार आहे, इतकी प्राचीन की, त्या काळात दारूचाही शोध लागला नव्हता...’’ त्यामुळे मद्यपान सार्वकालिक आणि सर्वस्थानी असेच आहे. अर्थात ती कुणी, किती आणि कशी प्यावी, यावर त्याचे काय परिणाम व्हायचे ते ठरत असते. अर्थात तुम्ही ती कशीही प्या, त्याचे चांगले अंतिमत: चांगले परिणाम होताना किमान मला तरी दिसलेले नाहीत. जिथे मुळातच विपन्नावस्था आहे अन् त्यामुळे नैराश्याची काजळी दाटली आहे, अशा खेड्यांमध्ये तर दारू थोडीही असली तरीही ती विध्वंसकच असते. म्हणूनच शेतकर्यांच्या आत्महत्या या व्यसनाधीनतेने होतात, असे म्हणण्याची संधी त्या आत्महत्यांची जबाबदारी झटकणार्या सुखवस्तू शहरींना मिळत असते. मात्र, खेड्यांचा जीवच अगदी छोटा असल्याने दारूचे दुष्परिणाम गडद होतात. अगदी तोरणा- मरणालाही दारूशिवाय गाडं समोर सरकत नाही, अशी स्थिती आहे. त्यात यवतमाळ जिल्हा तर शेतकर्यांच्या आत्महत्यांसाठी कुख्यात आहे.
 
 
एकीकडे आत्महत्या अन् दुसरीकडे दारू सगळंच उद्ध्वस्त करत सुटली आहे. महेश पवार या युवकाने गेल्या पाचेक वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची चळवळ उभी केली आहे. आता महिलांसाठीच्या या चळवळीचे नेतृत्व एक पुरुष करतो आहे... एकतर महिलांनी मूकच असावं, अशी व्यवस्था दीर्घ काळापासून निर्माण करण्यात आली आहे. आता कुठे त्या बोलू लागल्या आहेत. त्यात महेशनं, त्याच्या आईची दारूमुळे होणारी अक्षरश: होरपळ जळत्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्याचे वडील खूप दारू प्यायचे अन् त्यामुळे त्याच्या आईने जाळून घेतले. त्यात ती वाचली, पण मग तिच्या वाट्याला ती होरपळ मरेपर्यंत आली. अंगावर ओली साडी पांघरूनच तिला राहावे लागे. महेशने हे अनुभवले होते. आता तर अशी अवस्था आहे की, घरचे पुरुष दारूच्या आहारी गेले आहेत, अशी किमान साठ-सत्तर टक्के घरे आहेत. नवरा दारू पितो, मुलंही दारू पितात अन् रात्रभर धिंगाणा घालतात, नवरा बायकोला अन् मुलं आईला मारहाण करतात म्हणून ती माउली शेजारच्या घरी जाऊन झोपते. गेली दहा-बारा वर्षे ती घरी झोपलेलीच नाही...
 
 
अशा अनेक कहाण्या आहेत. त्याने मनही पिळवटून जात नाही, इतके आम्ही निब्बर झालो आहोत. ही स्त्रियांची समस्या आहे. समजा तिनेही उद्या दारू प्यायला सुरुवात केली तर काय होईल? आता जे काय संसार उभे आहेत, गावे तग धरून आहेत ते केवळ ती व्यसनाधीन नाही, सहन करत संसाराचा भार पेलून नेते आहे म्हणून आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे, असे म्हटले जाते. मग हा साठ टक्के देशही ती दारू पीत नाही, अधीन झालेली नाही म्हणून टिकून आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. अगदी शेतांमध्ये काम करायलाही मजूर मिळत नाहीत. यामागेही दारू बर्यापैकी कारणीभूत आहे. एकतर रात्री दारू जरा जास्तच झाली असते. त्यामुळे सकाळ होतच नाही कामकरी पुरुषांची. थेट दुपारीच भानावर येतात ते. मग अंग दुखत असते, डोके दुखते, डोळे चुरचुरतात... आरोग्याच्या तक्रारी आता तर तीस-चाळीसनंतरच सुरू झालेल्या असतात. अशात घरची बाईच कामाला जाते. नवरा घरी पडलेला असतो. सायंकाळी बाईच्या मजुरीवर तो दरोडा टाकतो अन् पुन्हा दारू पितो. शेतातली कामे होतात, आर्थिक चलनवलन राहते ते केवळ बाई काम करते म्हणून. असे असूनही तिचा दरडोई उत्पन्नातला वाटा ग्राह्यच धरला जात नाही. गावखेड्यातल्या बहुतांश महिलांच्या आयुष्याला दारू नावाचा करप्या रोग लागलेला आहे. गाडगेबाबा म्हणाले होते, पतिदेवाची खेटरानं पूजा करा. दारू पिणार्या पुरुषांची लायकी, बाईचं खेटरही त्याच्या अंगाला लागावं इतकीही नसते.
 
 
त्यासाठी महेश पवार अन् त्याने उभी केलेली ‘स्वामिनी संघटना’ काम करते आहे. तो ‘नाम फाऊंडेशनचं’ही काम करतो. आता जवळपास सातशे-साडेसातशे महिला त्याच्या सक्रिय कार्यकर्त्या झाल्या आहेत. घाटंजीला तो राहतो अन् या गावाजवळच त्याने एक सुसज्ज असे कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र उभे कले आहे. त्याचे स्वच्छेने काम करणारे दीडशे कार्यकर्ते हे काम करतात. महेश तसा रंगकर्मी. रंगभूमीवर वावरलेला अन् तो सेन्स असलेला कुणीही आयुष्यातल्या सृजनाच्या क्षेत्रात कमी पडत नाही. महेशने गेल्या पाच वर्षांत, यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा, ही चळवळ मोठी केली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर त्याच्या या स्वामिनी संघटनेच्या भगिनी पायदळ आल्या होत्या. माध्यमांनी अगदी अलीकडे त्याची दखल घेणे सुरू केले आहे. आत्ता 20 जानेवारीला यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंडवर जवळपास एक लाख महिला एकत्र आल्या होत्या. इतक्या प्रचंड संख्येत कुठल्याही राजकीय पाठिंब्याशिवाय अन् कसलेही प्रायोजकत्व नसताना एक लाख महिला केवळ एकच मागणी घेऊन समोर येतात, ही दखल घेण्यासारखीच बाब आहे. महेश कुठल्याही राजकीय पक्षात नाही. त्यामुळे कदाचित प्रस्थापित नेत्यांना त्याच्या या आंदोलनाचे श्रेय घेता येत नसावे म्हणूनही असावे, की त्याच्या या चळवळीकडे दुर्लक्षच केले जाते. पुन्हा हीदेखील भीती आहेच की, दारूबंदी केली तर ती केवळ देखावा राहणार नाही, कारण महेश अन् त्याच्या या स्वामिनी त्याची अंमलबजावणी चोख होईल, याचा कडेकोट बंदोबस्त करतील. त्यामुळे, ‘दारूबंदी म्हणजे अधिक पिण्याची संधी,’ असे राहणार नाही.
खरेतर त्याची ही चळवळ म्हणजे खेडी वाचविण्याची चळवळ आहे. दारूबंदी झाली तर काम करणारे हात कामाला लागतील. शेतीत राबायला लागतील. अनेक समस्या सुटतील. व्यवस्थेला तेच नको असावे कदाचित. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला अशी पोळलेली भगिनीच हवी असते, मात्र दारूच्या आगीत होरपळणारी खेडी वाचविण्यासाठी दारूबंदी करावी, असे कुणालाच वाटत नाही. एकल महिलांचा संघर्ष एकाकी राहू नये, यासाठी दारूबंदी आवश्यक आहे. महेश पवार त्यासाठी लढतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊ शकते तर मग यवतमाळ जिल्ह्यात का नाही, असा त्याचा सवाल आहे. दारूबंदीने काय होईल, ज्या जिल्ह्यांत, राज्यांत ती झाली तिथे काय असे भले झाले आहे अन् किती परिणामकार रीत्या ती राबविली जाते, असा प्रश्न विचारणार्यांनी जिथे दारूचा महापूर वाहतो, तिथे काय भले झाले आहे? किमान बंदीमुळे थोडा अटकाव तर असेल... सरकारचा दारूचा महसूल मोठा असतो, असेही कारण सांगितले जाते. महेश अन् त्याच्या सहकार्यांकडे या महसुलाची तूट कशी भरून निघेल, याचेही गणित तयार आहे. एकदा त्यांच्याशी बोलायला काय हरकत आहे?
@@AUTHORINFO_V1@@