प्रियांका गांधींना पती रॉबर्ट वाड्राच अडचणीचे ठरणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019
Total Views |



प्रियांका गांधींशी नाव जोडल्यानंतर रॉबर्ट वाड्राची वादग्रस्त व रहस्यमय कारकीर्द

 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी-वाड्रा यांना मैदानात उतरवले असून त्यांना उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या महासचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या आपला पदभार स्वीकारू शकतात अशी माहिती काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. मात्र, प्रियांका यांचे पती व वादग्रस्त उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांचे देशातील अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये नाव समोर आले आहे. घोटाळ्याची ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रियंका गांधी यांचे पती परमेश्वर व वादग्रस्त उद्योगपती रॉबर्ट वाड्रा हे प्रियांका यांच्यासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

 

वाड्राची रहस्यमय कौटुंबिक पार्श्वभूमी

 

प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मोठी रहस्यमय मानली जाते. रॉबर्ट यांची बहीण मिशेलच्या माध्यमातून प्रियांका आणि रॉबर्ट यांची ओळख बोफोर्स प्रकरणातील आरोपी ओतावियो क्वात्रोचीच्या घरी झाली. यानंतर प्रियांका आणि रॉबर्ट दोघे एकमेकांच्या प्रेमात पडून १९९७ साली विवाहबंधनात अडकले. वैवाहिक जीवनात व आपल्या औद्योगिक क्षेत्रात समाधानी असलेल्या रॉबर्ट यांनी प्रियंकाशी विवाह केल्यानंतर त्यांच्यामागे जणू साडेसातीच लागली असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. कारण, अनेक वादग्रस्त प्रकरणात रॉबर्ट यांचे नाव समोर येऊ लागले. सोबतच त्यांच्या घरातील सदस्यांचे एकापाठोपाठ रहस्यमय मृत्यू समोर येऊ लागले. २००१ साली रॉबर्ट यांची बहीण मिशेल यांचा अपघाती मृत्यू, २००३ साली रॉबर्टचे बंधू रिचर्ड यांचा आपल्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. तर २००९ साली रॉबर्टच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे रॉबर्ट यांच्या जीवनात प्रियांका गांधी यांनी पाय ठेवल्यानंतर अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राजकीय कारकिर्दीत हीच साडेसाती प्रियांका यांच्या मागे असणार हे नव्याने सांगायची गरज नाही.

 

वाड्रा आणि घोटाळे

 

गांधी-नेहरु घराण्याचे नाव वापरुन आपली खाजगी कामे करुन घेतल्याचे अनेक आरोप वाड्रांवर झाले आहेत. या आरोपांना २००२ पासून सुरुवात झाली. यासोबतच २०१२ साली आपने वाड्रांवर डीएलएफ डीलचे आरोप केले. ६५ कोटींचे बिनव्याजी कर्ज डीएलएफ कंपनीने वाड्रांना दिल्याचा खळबळजनक आरोप आपने केला होता. वाड्रा यांच्यावर जमिनव्यवहारात घोटाळे केल्याचे आरोपदेखील आहेत.

 

अनावश्यक वाचाळपणा

 

आपने वाड्रा यांच्यावर केलेल्या आरोपानंतर वाड्रांनी 'मॅंगो पिपल इन बनाना रिपब्लिक दॅट इज आम आदमी' अशा आशयाचे ट्विट केले होते. यावरून देशात मोठा वाद निर्माण झाला होता. यासोबतच ट्वीटरवर केलेल्या कमेंटसमुळे देखील वाड्रा वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

 

बेहिशोबी मालमत्ता

 

लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपदेखील वाड्रांवर करण्यात आला आहे. शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा हा आरोप आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी हे आरोप केले होते. त्यांनी ईडीला पत्र लिहून चौकशीची मागणीदेखील केली होती.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@