आपुलाची वाद आपणासी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2019   
Total Views |
 
 
 
’सर, आपल्या शांतामावशींनी आज जेवणाच्या वेळी त्यांना लहानपणी अभ्यासक्रमात असलेली एक कविता खूप छान म्हणून दाखवली. आपल्या ’विचारमंच व्यासपीठावर’ त्यांना आपण ही कविता सर्वांसमोर म्हणायला सांगु शकतो.’ जनकल्याण रक्तपेढीतील तांत्रिक पर्यवेक्षिका सौ. शिल्पा जाजू मला उत्साहाने सांगत होत्या.
 
’अरे वा. फ़ारच छान. आपण नक्कीच सांगु या त्यांना.’ मी आनंदाने त्यांना म्हटले.
 
यानंतर एकदा या मावशींचीही भेट झाली. आम्ही उत्सुकतेने ती कविता त्यांना म्हणायला सांगितली. केवळ तीच नव्हे तर शाळेत असलेल्या अनेक कविता शांतामावशींना पाठ आहेत, हेही यावेळी समजले. सुरुवातीपासून रक्तपेढीत काम केलेल्या आणि रुढार्थाने फ़ार शिक्षण न झालेल्या शांतामावशी आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत आणि या वयातही त्यांनी आपल्या शालेय जीवनाची ओढ टिकवून ठेवली आहे. खूप प्रेरणादायी वाटलं हे. त्यांना अक्षरश: भरीला पाडुन आम्ही ती कविता त्यांना ’जनकल्याण विचारमंच’ या नव्याने सुरु झालेल्या मासिक कार्यक्रमात म्हणायला सांगितली. खूप आढेवेढे घेत शेवटी त्यांनीही ती म्हटली आणि सर्वांची दाद मिळवली.
 
ही कविता ज्या कार्यक्रमामुळे सर्वांपुढे आली तो ’जनकल्याण विचारमंच’ हा एक अनोख मंच. रक्तपेढीव्यतिरिक्त काही नवीन चांगले विषय सर्व कर्मचाऱ्यांसमोर यावेत या हेतुने हे एक स्वतंत्र व्यासपीठ रक्तपेढीमार्फ़त नुकतेच सुरु केले गेले. रक्तपेढीच्या कामाचा व्यापच इतका मोठा असतो की दैनंदिन काम करीत असताना एक जेवणाची वेळ सोडली तर अन्य वेळांना जो तो आपापल्या चक्राला जुंपलेला असतो आणि हे चक्र थांबायची शक्यता तर अजिबातच नसते. अशा वातावरणात रक्तपेढीच्या कामाव्यतिरिक्त काही चांगल्या गोष्टी इथल्या कर्मचाऱ्यांना कशा मिळतील, असा विचार एका अधिकारी बैठकीत झाला. ’जनकल्याण विचारमंच’ हे याच बैठकीचे फ़लित. याद्वारे महिन्यातून एकदा रक्तपेढीच्या कामाव्यतिरिक्त नव्वद मिनिटांचा एक कार्यक्रम असे ’विचारमंचा’ चे स्वरुप निश्चित झाले. सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे व्यासपीठ खुले असेल व प्रत्यक्ष रक्तपेढीच्या कामाशी याचा काहीही संबंध नसेल हेही सुरुवातीलाच ठरवले गेले. रक्तपेढीच्या सर्व विभागांच्या प्रतिनिधींचा एक संच ’विचारमंच समिती’ म्हणून नियुक्त झाला. या समितीच्या बैठकांद्वारेच विचारमंच कार्यक्रम ठरवले गेले. आजवर झालेले सर्वच कार्यक्रम अतिशय प्रभावी झाले. एखादा चांगला विषय ठरवून त्यावर मांडणी करण्यासाठी एखाद्या वक्त्यास आमंत्रित करणे हा मुख्य कार्यक्रम तर त्याला जोडुनच अन्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग असावा याकरिता काही छोटे छोटे कार्यक्रमांचे तुकडे आणि शेवटी प्रार्थना, हे सर्व मिळुन एक विचारमंच - अशी रचना ठरवली गेली. या छोट्या तुकड्यांमध्ये पुस्तक परिचय, चित्रपट परिचय, गीत, चिंतनिका, वृत्तसमिक्षा, कविता अथवा लेखाचे वाचन असे पर्याय दिले गेले. सर्वांनीच खूप उत्साहाने हा उपक्रम स्वीकारला आणि प्रत्येक वेळी तो पारही पाडला. वक्त्यांना दिल्या गेलेल्या विषयांमध्ये कौटुंबिक संवादाची आवश्यकता, आनंदाची संकल्पना, आपल्या परंपरांमागील विज्ञान, ओळख सांस्कृतिक भारताची असे विषय आजपर्यंत झालेले आहेत आणि आलेल्या प्रत्येक वक्त्याने ते अत्यंत प्रभावीपणे मांडलेले आहेत. यापुढेही सर्व प्रकारचे माहितीपूर्ण विषय याद्वारे सर्वांसमोर येतील याची योजना विचारमंच समिती करेलच. नवीन विषय समजून घेणे आणि आपल्याकडीलही काही चांगले सर्वांना देणे हेच विचारमंचाचे मुख्य सूत्र आहे. या निमित्ताने एरवी कधी लक्षात न येणारी कर्मचाऱ्यांची गुणवत्ताही समोर येते आहे. ’शांतामावशींची कविता’ हे त्याचेच एक उदाहरण.
 
अलिकडचीच गोष्ट. रक्तदूत-सेवेचा समन्वयक म्हणून सक्षमपणे काम पाहणारा आमचा मित्र नरेश देशमुख याला विचारमंच’च्याच एका कार्यक्रमामध्ये येणाऱ्या वक्त्यांचा परिचय करुन देण्याचे काम सांगितले गेले. वक्त्यांनी दिलेला परिचय सुमारे एक पानभर तरी होता. ’परिचय कसा करुन द्यायचा’ याबाबत एकदाच तो मला भेटला. यावेळी ’कागद हातात असु दे, वाटल्यास वाचुन दाखवलास तरी चालेल’ असे मी त्याला आवर्जून सांगितले होते. कारण अशा कार्यक्रमात उभे राहुन काही बोलण्याची ही त्याची पहिलीच वेळ असणार होती. पण ’वक्त्यांचा परिचय शक्यतो वाचुन दाखवु नये तर तो पाठ करुन सहजपणे करुन दिला जावा’ असा आधीच्या बैठकीत झालेला विषय नरेशने चांगला लक्षात ठेवला होता. केवळ लक्षातच ठेवला असे नव्हे तर त्याचे उत्तम प्रात्यक्षिकही त्याने या कार्यक्रमात सादर केले. हातात अजिबात कागद न धरता वक्त्यांचा संपूर्ण परिचय त्यातील बारकाव्यांसह आणि योग्य ठिकाणी योग्य त्या टिप्पणीसह जेव्हा त्याने करुन दिला तेव्हा सर्वांनी त्याला मनापासून दाद दिली.
 
 
 
 
’विचारमंच’सारख्या व्यासपीठामुळे एकेकाच्या अंगी असलेले चांगले गुण असे पुढे येत आहेत. रक्तपेढीत तांत्रिक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अभिरुची जगदळेंनी करुन दिलेला प्रभावी पुस्तक-परिचय असो किंवा तंत्रज्ज्ञ वर्षा आणि पियुषा यांनी केलेलं सुंदर सूत्रसंचालन असो ; तांत्रिक पर्यवेक्षक काशीनाथ गुरव यांनी सादर केलेली व्यक्तिमत्व विकासाची सूत्रे असोत किंवा मदतनीस अक्षय, कल्याणीमावशी यांनी सांगितलेली प्रार्थना असो… ही सर्व गुणवत्ता या मासिक कार्यक्रमामुळे समोर येऊ लागली आहे. बहुतेकांचे सादरीकरण आमच्या अपेक्षेपेक्षाही चांगले असल्याचे दिसते आहे. सभाधैर्य, वक्तृत्व, नियोजन, सादरीकरण-कौशल्ये इ. अनेक गोष्टींचा विचारमंचामुळे कस लागत आहे. व्यक्तिमत्व-विकास तरी आणखी काय असतो ? शिवाय परस्परांमधील संवादालाही आपोआप सूर सापडतो, हे निराळेच.
 
रक्तपेढीबाहेरीलही ज्यांना ज्यांना ही कल्पना समजली त्यांना ती खूपच आवडली. ’विचारमंचा’साठी आलेल्या वक्त्यांनीदेखील या कल्पनेचं कौतुक केलं आणि उपयुक्त सूचनाही दिल्या. अर्थात ही तर छोटीशी सुरुवात आहे, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. 'जनकल्याण रक्तपेढी' हा एक परिवार आहे, अशी धारणा इथे पहिल्यापासून रुजलेली आहेच. आता या परिवारातील सदस्यांची एरवी लक्षात न येणारी गुणवत्ता या निमित्ताने सर्वांसमोर येऊ लागली आहे. याचा उपयोग रक्तपेढीला – पर्यायाने रक्तसेवेला - तर होईलच शिवाय कर्मचाऱ्यांना व्यक्तिगतरित्या आणि कौटुंबिक पातळीवरही हे वैचारिक मंथन नक्कीच उपयुक्त ठरणार, यात शंका नाही.
 
अर्थात असं काही मिळण्यासाठी अशाच वेगवेगळ्या निमित्तांनी दैनंदिन कामापासून असं थोडंसं अलिप्तपण मात्र गरजेचं आहे. हे अलिप्तपण म्हणजे केवळ पोकळी नव्हे, तर निर्माण होऊ पाहणाऱ्या पोकळीला नव्या सकारात्मक विचारांनी भरणे म्हणजे खरे अलिप्तपण.
 
संत तुकाराममहाराजांनी या अलिप्तपणाचे वर्णन –
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुलाची वाद आपणासी ॥
 
- अशा समर्पक शब्दांत केले आहे. हा 'आपुलाची वाद आपणासी' तेव्हाच होऊ शकेल जेव्हा जगरहाटीपासून थोडेसे बाजुला येऊन आपण आपल्याच जीवनाकडे तटस्थपणे पहायला शिकू. या अनोख्या संवादातूनच काही अत्यंत जटील वाटणाऱ्या समस्यांचे समाधानही कदाचित सहजपणे मिळुन जाईल. पण अर्थात ते तितकं सोपंही नाही. 'आपुलाची वाद आपणासी' होणे ही एक श्रेष्ठ अवस्था आहे. त्या अवस्थेला जाणे कठीण आहे हे नक्की. पण तरीही त्या दिशेने एक एक पायरी चढायला काय हरकत आहे ? 'विचारमंच' वगैरे प्रयोगांच्या माध्यमातून येथील कर्मचारी वर्गाचा 'आपुलाची वाद आपणासी' व्हावा आणि आपले रक्तदानासंबंधातील कर्तव्य बजावण्यासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिगत विकासासाठीहि तो पूरक व्हावा, या हेतुने जनकल्याण रक्तपेढी प्रयत्नरत आहे.
 
प्रयत्न प्रामाणिक आहेत, म्हणूनच परिणामांची खात्री आहे !
 
 
- महेंद्र वाघ
@@AUTHORINFO_V1@@