उपराष्ट्रपती, सरसंघचालकांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सल ब्रदरहूड थ्रू योगा’ ग्रंथाचे प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019
Total Views |


नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : विवेक समूह व सोमय्या ट्रस्टच्या वतीने ‘युनिव्हर्सल ब्रदरहूड थ्रू योगाया इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन सोमवारी नवी दिल्ली येथे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या ग्रंथाचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

 

नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला सोमय्या ट्रस्टचे अध्यक्ष समीर सोमय्या, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, के. जे. सोमय्या भारतीय संस्कृती पीठमच्या अध्यक्षा व या ग्रंथाच्या संपादक डॉ. कला आचार्य व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “योगशास्त्र हे धर्म-संस्कृती-भाषेच्या मर्यादा ओलांडून व्यक्तींना जवळ आणण्याचे काम करेल.

 

या ग्रंथात २६ देशांतील मान्यवरांनी लेखन सहभाग घेतला आहे, यावरूनही योगशास्त्राची ताकद लक्षात येते,” असे सांगत भागवत यांनी योगशास्त्राचे सामर्थ्य अधोरेखित केले. याचसोबत योगासने हा योगशास्त्राचा एक आयाम असल्याचे सांगत अन्य आयामांच्या वैशिष्ट्यांचा ऊहापोहदेखील त्यांनी यावेळी केला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या खुमासदार भाषणात,“शेअर अ‍ॅण्ड केअर’ ही आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत, हे सोदाहरण स्पष्ट केले. भारतीय जीवनशैली, आहारपद्धती, योगशास्त्र या सर्व गोष्टी आपल्यासाठी लाभकारक आहेत. त्याची उपयोगिता वारंवार सिद्ध झाली आहे आणि आज त्याचे महत्त्व जगालाही समजत आहे.

 

आपल्या संस्कृतीच्या या वैशिष्ट्यांचा डोळस अंगीकार करून ती पसरविण्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे,” असे आवाहन केले. “सेक्युलॅरिजम; हे हिंदूंचे अंगभूत वैशिष्ट्य असून ते आम्हाला कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही,” असेही नायडू यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप करंबेळकर यांनी केले तर सोमय्या ट्रस्टच्या विविधांगी कार्याची माहिती समीर सोमय्या यांनी दिली. डॉ. कला आचार्य यांनी या ग्रंथामागची भूमिका संस्कृत आणि इंग्रजीत विशद केली. या कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. या ग्रंथात संपादनाचे काम करणार्‍या प्राची पाठक, रंजना नायगावकर, रुद्राक्ष साक्रीकर, साबीर शेख, राजश्री खडके यांचा सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@