‘उरी’च्या निमित्ताने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019
Total Views |
 
 

हा प्रश्न डाव्या-उजव्याचा नाही. मुळातच आपल्याकडे अस्सल अभिव्यक्ती फार थोड्या आहेत. उरलेले सगळे नकला करीत असतात आणि कंपू तयार करतात. साहित्यिक किंवा कलेच्या क्षेत्रातील बावनकशी सोन्यासारखी नेतृत्वे जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत हा दोन पैशांचा तमाशा पाहातच राहावा लागणार.

 

‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ नावाचा सिनेमा सध्या सिनेमागृहात चांगलाच गाजतोय. विकी कौशल, परेश रावल, यामी गुप्ता यासारख्या मंडळींनी यात भूमिका साकारल्या आहेत. २०१६ साली उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा खणखणीत बदला घेण्यासाठी भारत सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कथानकावर हा सिनेमा बेतला आहे. कुठलेही तगडे आणि नावाजलेले अभिनेते मुख्य भूमिकांत नसताना आणि आज मनोरंजनाच्या अभिरूची कमालीच्या गतीने बदलत असताना ‘उरी’ सिनेमा जोरात चालतो आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला, यात काही संदेश दडलेले आहेत. या देशात देशभक्ती अभिव्यक्त करणार्‍या मंडळींची चेष्टा करणारा एक मोठा वर्ग गेल्या काही वर्षांत निर्माण झाला आहे. अशा प्रकारची कुचेष्टा करण्यासाठी लागणारे स्वातंत्र्य अनिर्बंधपणे वापरायला मिळणे म्हणजेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असा या मंडळींचा गैरसमज आहे. या मंडळींना टिळकांच्या अग्रलेखासारखे काही खणखणीत देऊन चालणार नाही. कारण, तो समजण्याचा विवेकच गमावून बसलेली ही मंडळी आहेत.

 

‘उरी’चा पहिला ट्रेलर आला तेव्हा ल्युटंट दिल्लीतल्या काही पत्रकारांनी ज्या प्रकारची ट्विट्स केली होती, ती विचार करायला लावणारी होती. यांचे विचार म्हणजे अभिव्यक्ती आणि इतरांचे विचार म्हणजे कर्णकर्कश गोंगाट असा काहीसा हा मामला आहे. या पहिल्या ट्रेलरच्या वेळी आता या देशात ‘हायपर नॅशनलिजम’ची लाट येणार आहे. अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या होत्या. आता हा अतिरेकी राष्ट्रवाद म्हणजे काय, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. या पुरोगामित्वाच्या स्वामित्वाचा दावा करणार्‍या मंडळींनी स्वत:चे काही शब्द आणि इतरांना त्यांच्या आधारावर संकुचित ठरविण्यासाठी लागणारे वाक्प्रचार निर्माण केले आहेत. ‘चेस्ट थम्पिंग’, ‘जिंगोइजम’ हे त्यातले काही शब्द. आता याचे अर्थ काय, तर त्याचे काहीच अर्थ नाहीत. सिनेमानिर्मितीच्या सर्वच निकषांवर ‘उरी’ सिनेमा पुरेपूर उतरला आणि या सगळ्यांची तोंडे बंद झाली. ‘उरी’ सिनेमात नरेंद्र मोदींचा जयजयकार केला जाईल, असा या सगळ्या मंडळींचा दावा होता. वस्तुस्थितीत तसे काही झाले नाही. सिनेमात राजकीय व्यक्तिमत्त्वांचे प्रतिबिंब दिसणे, हे काही गैर नाही. कितीतरी सिनेमात अशाप्रकारे राजकीय पात्रे रंगविण्यात आली आहेत.

 

दक्षिणेत तर राजकारण्यांचे थेट चित्रित प्रसंग वापरण्याचे दाखले देता येतील. एमजीआर, करुणानिधी यांच्यामध्ये घडलेल्या राजकीय नाट्याचे चित्रण करणारा ‘इरूवर’ नावाचा सिनेमाही याला अपवाद नाही. दक्षिणेतल्या जवळजवळ सर्वच भाषांत हा सिनेमा भाषांतरित झाला आहे. अशी अन्य कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील. यावेळी कुणाचेही पित्त खवळलेले नाही. मात्र, आता नरेंद्र मोदी कुठल्याही सिनेमात दिसले की, मात्र सगळ्यांचे पित्त खवळताना दिसते आणि मग वर उल्लेखलेले शब्द जोरकसपणे वापरताना दिसतात. प्रवाही असलेल्या समाजात अशा प्रकारचे सामाजिक ताणतणाव असतातच. अगदी ज्ञानेश्वर, तुकारामांच्या काळातही असे ताणतणाव होतेच. कुठल्याही संवेदनशील माणसाला ते जाणवावे, असे हे ताणतणाव होते. परंतु, या मंडळींच्या अभिव्यक्ती किती सशक्त आणि कालजयी ठरल्या, ते आपण आजही पाहातो. इथे तशा ताकदीच्या अभिव्यक्तीही नाहीत, कांगावा मात्र जोरात चालू आहे. हे सगळे कांगावखोरांचे फुलबाजे आहेत.

 

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा पूर्ण हक्क आहे. ही अभिव्यक्ती राजकीय असली तरी चालू शकते. मात्र, ती व्यक्त करण्याची जागा कोणती याचा विचार विवेकाने केला पाहिजे. तथाकथित पुरोगाम्यांकडून असली अपेक्षा ठेवणेच पाप आहे. या देशातली ही विभागणी आता विचार करायला लावणारी आहे. महाराष्ट्रातून ‘ज्ञानपीठ’ मिळालेल्या एका लेखकाने कुणाकडे खाजगीत एक मत व्यक्त केले होते - ‘सरकार यांचे असले तरी सांस्कृतिक विश्वात आमचेच राज्य चालणार.’ आता हे ‘आमचे’ आणि ‘त्यांचे’ म्हणजे नेमके काय याचा विचार आपल्याला करायला लागेल. कला, साहित्य क्षेत्रातील बरीच मंडळी ही डाव्या विचारांनी प्रेरित असलेली आहेत. लोकशाहीत तसे असायलाही हरकत नाही, मात्र त्याची व्यासपीठे कुठली याचे भान नक्कीच ठेवले पाहिजे.

 

नुकतेच ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे पार पडले. नयनतारा सहगलांच्या निमित्ताने जो काही वाद झाला, तो आता पुन्हा मांडण्याचे कारण नाही. कणाहीन आयोजकांनी कुणाच्यातरी झुंडशाहीसमोर दबून जाऊन पाठविलेले निमंत्रण परत पाठविले. आपल्या भ्याडपणाचे खापर अन्य कुणावर फोडण्याचा इतका क्लेशकारक प्रकार आजतागायत पाहण्यात आला नसेल. ताण आणि दबाव म्हणजे काय असतो याचा अनुभव यावेळी आला. अशा वादळी काळात साहित्य संमेलन यशस्वी करण्यापेक्षा त्यावर बहिष्कार टाकून ते अयशस्वी करण्यातच अनेकांना रस होता. नव्याने निवडलेली व्यक्ती आपल्या कंपूतील नाही, हे लक्षात आल्यावर झाला गेला प्रकार विसरून जाण्यापेक्षा अजूनही काहींचे कुटिरोद्योग सुरूच आहेत. नयनतारा सहगल यांना बोलावून त्यांचे भाषण पुन्हा ऐकण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. ‘कलाप्रेमी मराठी भाषकांचा मेळावाअशा गोंडस नावाखाली लोकांना एकत्र आणून विष कालविण्याचे उद्योग सुरू आहेतच. आता हा असा काही मेळावा होता तर ९२ वर्षांची परंपरा लाभलेले साहित्य संमेलन काय होते? एखादा चुकीच्या दिशेने फोफावत गेलेला विषय न संपविता वाढविण्यात कुणाला आणि का रस असावा, याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

 

मुळातच आपल्या देशातल्या अभिव्यक्ती काही नेमक्या लोकांकडेच शुद्ध स्वरूपात आहेत. बाकी सगळ्या नकला आहेत. या नकलांमधून कंपू तयार झाले आहेत आणि हे कंपू आपल्या कंपूबाहेरचे कुणी आले तर असहिष्णू होतात. मात्र, या जमातीची एक खासियत म्हणजे आपला सगळा कांगावा हे लोक इतरांवर असहिष्णुतेचे आरोप करून करीत असतात. साहित्यिक किंवा कलेच्या क्षेत्रातील बावनकशी सोन्यासारखी नेतृत्वे जोपर्यंत निर्माण होत नाही, तोपर्यंत हा दोन पैशांचा तमाशा पाहातच राहावा लागणार.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@