येत्या १ फेब्रुवारीपासून मिळणार १० % आरक्षण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
नवी दिल्ली : देशातील गरिब सवर्णांना येत्या १ फेब्रुवारीपासून केंद्र सरकारच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी नंतर जारी करण्यात येणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध होणाऱ्या सर्व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू करण्यात येणार आहे. याबाबतीत केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने एक आदेश जारी केला असून आरक्षणाचा लाभ मिळविण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियम अधोरेखित केले आहेत. 
 
ज्या गरिब सवर्णांनी कधीही कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेतला नसेल. तसेच ज्या गरिब सवर्णांचे कौटुंबिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे. अशा गरिब सवर्णांना आरक्षणाचा लाभ घेता येईल.
 

‘या’ व्यक्ती कुटंबातील सदस्य म्हणून ग्राह्य धरल्या जाणार!

 

आरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारासोबत त्याचे आईवडील, १८ वर्षांहून कमी असलेले त्याचे बहिण-भाऊ, आणि अल्पवयीन मुलांना कुटंबातील सदस्य म्हणून मान्यता असेल. याशिवाय, आरक्षणाच्या अर्हतेच्या तपासणीदरम्यान एकूण कौटुंबिक उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची तपासणी केली जाईल. शेती, नोकरी, व्यापार आणि इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न मोजण्यात येईल. हे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आढळल्यास त्या कुटुंबाला आरक्षणाचा लाभ घेता येईल.

 

५ एकराहून कमी जमीन असल्यास मिळणार लाभ

 

मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार, ज्या कुटुंबाकडे ५ एकर किंवा ५ एकरपेक्षा अधिक शेती करण्यास योग्य अशी जमीन असेल, किंवा ज्या कुटुंबाचे घर हे १ हजार चौरसफूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाचे असेल. तर अशा कुटुंबाला या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. तसेच ज्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे अधिसूचित जमीन असेल. तर अशा व्यक्तीदेखील आरक्षणाचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

 

सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार

 

आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंबाला तहसीलदार किंवा तहसीलदारापेक्षा वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्याकडून आपले उत्पन्नाचे आणि संपत्तीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र असलेले आणि वर नमूद केलेल्या सर्व नियमांमध्ये बसणाऱ्या व्यक्ती आरक्षणास पात्र असतील. १ फेब्रुवारीपासून किंवा त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या केंद्र सरकारच्या सर्व नोकऱ्यांमध्ये या व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@