'आठवणींचे अमृत' पुस्तक प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणा देणारे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |


 


रत्नागिरी : कै. अप्पासाहेब साठे यांचे व्यक्तीमत्व चतुरस्त्र असे होते. 'आठवणींचे अमृत' हे त्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या जीवनातील वस्तुनिष्ठ अनुभव कथन करणारे आहे. हे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण येथे काढले. नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कै. अप्पासाहेब साठे यांच्या आठवणींचे अमृत (द्वितीय आवृत्ती) या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, भैयाजी जोशी, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार विनय नातू, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे कार्यवाह प्रकाश देशपांडे, श्रीधर भिडे, मंगेश तांबे, आनंद लिमये, बाबा चांदेकर, राजनभाई दळी, मोहनभाई संसारे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

संस्कार, उर्जा व सामाजिक कार्याचा वसा व प्रेरणा साठे कुटूंबियांबरोबरच समाजालाही मिळाली ती कै. अप्पासाहेबांच्या आठवणींचे अमृत या पुस्तकातून मिळाली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कै. अप्पासाहेबांच्या या पुस्तकातील या लेखनात दिनता किंवा दैन्यभाव नाही तर त्यांच्या जीवनातील वस्तुनिष्ठ व वास्तववादी प्रसंगांचे वर्णन आहे. दिलेला शब्द पाळायचा ही त्यांच्या आईची आणि आजीची शिकवण त्यांनी आयुष्यभर जोपासली. तत्वनिष्ठपणा त्यांनी आयुष्यभर जोपासला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लोक हातच राखून लिहितात पण अप्पासाहेबांनी या पुस्तकामध्ये जे घडल जे भोगल ते खरखुर वर्णन लिहिले आहे. जे चांगले आहे ते पण आहे तथापि काही चुकाही त्यांनी प्रांजळपणे कबुल केल्या आहेत. संस्कारक्षम असे हे पुस्तक सर्वांनी आर्वजून वाचावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले सत्कार्य करायचे ते फळाची अपेक्षा धरुन करायचे नाही हे व्रत अप्पासाहेबांनी आयुष्यभर जपत त्यांनी संस्कार करण्याचे कार्य अविरत करण्याबरोबर समाजप्रबोधनाचा वसा जोपासला.

 

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यावेळी बोलताना म्हणाल्या, कै. अप्पांची ही आठवणींचे अमृत या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित होताना मला व माझ्या साठे कुटूंबियांना मोठा आनंद होत आहे. कै. अप्पांची चिपळूण शहरात पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी तीव्र इच्छा होती ती आज पूर्ण होत आहे. या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांसोबतच चिपळूण शहरवासिय मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले यामुळे मी भारावून गेले आहे. संघर्ष करीतच संकटांवर मात कशी करायची व समाजाप्रती संस्कार जपत कसे वागायचे याची शिकवण आम्हाला व समाजाला कै. अप्पांनी दिली ते आमचे प्रेरणास्थान आहेत.भैयाजी जोशी यावेळी बोलताना म्हणाले की, ज्या काळात देशात संघर्षाचे वातावरण होते, समाजात नैराश्यलय होती स्वामी श्रध्दानंद म्हणायचे समाज मरणपंथाला लागला आहे. अशा परिस्थितीत अप्पा साठे यांनी समाजप्रबोधनाची धूरा यशस्वी वाहिली. भारत हा सुपरपॉवर होण्यापेक्षा भारताने विश्वगुरुत्वाची संकल्पना रुजवून सुपरपॉवरपेक्षा, सर्व शक्तीमान होण्यापेक्षा विश्वामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावून विकसित राष्ट्र ही भावना वृध्दींगत करण्यात यशस्वी व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. स्वागतपर भाषणात चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी आठवणींचे अमृत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा अमृतयोग असल्याचे सांगून त्या म्हणाल्या मान्यवरांचे स्वागत हा माझ्या आयुष्यातील चिरस्मरणीय योग आहे.

 

प्रकाशक आनंद लिमये यावेळी बोलताना म्हणाले, आमच्या संस्थेमार्फत ४०हून अधिक लेखकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्रत्येक पुस्तक कायमस्वरुपी दस्ताऐवज व समाजाला दिशा देणारे आहे. कै. अप्पासाहेबांनी लिहिलेल्या अधिकच्या दोन लेखांसह व सुमित्राताईंनी लिहिलेली प्रस्तावनेच्या समावेशासह ही दुसरी आवृत्ती आम्ही प्रकाशित करीत आहोत.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विशारद व तन्वी यांनी स्वागत गीत गायले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आठवणींचे अमृत या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. समारंभाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्राचार्य शाम जोशी यांनी केले. समारंभास कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल तसेच चिपळूण शहरातील नागरिक, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

चांगल्या गोष्टी नागपूरातच

 

कै. अप्पासाहेबांचा एक लेख खूप ठिकाणी शोधला असता तो मिळाला नाही पण हा दुर्मिळ लेख नागपूरात मिळाला. चांगल्या गोष्टी नागपूरातच मिळतात असा भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट व हास्यात उर्त्स्फूत दाद दिली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@