‘दया’ आणि ‘कणव’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |



‘दये’ची अनुभूती स्वत:ला असल्याशिवाय आपण ती दुसऱ्यांप्रति व्यक्त कशी करू शकू?आपल्याला स्वत:ला ‘दया’ ही भावना मनापासून समजली तर ती आपण दुसऱ्यांना देऊ शकतो.


आपण आयुष्यात ‘दया’ या मौलिक भावनेविषयी बऱ्याच वेळा विचार केला आहे. साने गुरुजींनी एक सुंदर कविता या ‘दया’ भावनेवर लिहिली. ती अशी-

 

खरा तो एकची धर्म

जगाला प्रेम अर्पावे॥

भरावा मोद विश्वात,

असावे सख्य जगतात।

सदा हे ध्येय पुजावे

जगाला प्रेम अर्पावे॥

 

या कवितेत त्यांनी दीनदुबळ्यांना प्रेम द्यावे, ही सुंदर कल्पना मानवासाठी किती महत्त्वपूर्ण आहे याचे भावपूर्ण वर्णन केले आहे. जगात विविध धर्मांच्या वा विविध जातींच्या संत-महात्म्यांनी मानवी विकासात दुसऱ्यांप्रती ‘दया’ महत्त्वाचीच मानली आहे. हे सुंदर सत्य आपल्या सर्वांना पटण्यासारखे आहे. थोडेसे वेगळे विचार येथे मांडावेसे वाटतात ते म्हणजे, आपण दुसऱ्यांप्रति कणव दाखवतो तेव्हा तो आपल्यालाच अनुभवायला मिळायला हवा. ‘दये’ची अनुभूती स्वत:ला असल्याशिवाय आपण ती दुसऱ्यांप्रति व्यक्त कशी करू शकू?आपल्याला स्वत:ला ‘दया’ ही भावना मनापासून समजली तर ती आपण दुसऱ्यांना देऊ शकतोआपल्याला स्वत:विषयी ‘कणव’ असण्याची गरज खरंच आहे का? आहे! निश्चित आहे. पण, त्याआधी आपल्याला ‘दया’ व ‘कणव’ या दोन्ही भावना समजून घेणे आवश्यक आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांनी स्वत:बद्दल ‘कणव’ कशी निर्माण करायची हे शिकायला पाहिजे. आज आपण मनाचा सावधपणा किंवा ‘माइंडफूलनेस’ या ‘मनाची जागरूकता’ या संकल्पनेबद्दल खूप चर्चा करत असतो. पण, मनाच्या जागरूक अवस्थेविषयी चिंतन करताना मानवतेबद्दल आपल्या सर्वसामान्य भावना व आपल्याबद्दल वाटणारी दयाही तितकीच महत्त्वाची आहे. स्वत:बद्दल ‘कणव’ निर्माण करताना आपण मुळातच ‘कणव’ या भावनेशी मैत्री करतो. स्वत:बद्दलची ‘कणव’ आपल्या आयुष्यातील समाधान, स्वस्थ प्रवृत्ती, प्रसन्नता व आशावाद यासारख्या ‘स्वस्थचित्र’ करणाऱ्या भावनिक घटकांचा विकास घडवून आणते. या भावनांमुळेच आपण व्यावहारिक जगात पावलोपावली स्वत:ला अस्वस्थ करणाऱ्या अपयश, स्पर्धा, टीका या विनाशी भावनांपासून सुरक्षित ठेवू शकतो. स्वत:बद्दल खरी ‘दया’ निर्माण झाली की, आपल्याला दुसऱ्याबरोबर तुलना करायची वा स्वत:च्या अभिमानाला गोंजारत बसायची गरज वाटत नाही. खऱ्या अर्थाने यामुळे आपली भावनिक लवचिकता किंवा ‘emotional resilience’ विकसित होऊ लागतो.

 

मी स्वत:बद्दल इतके कठोर का आहे? हा प्रश्न आपण स्वत:ला कधीतरी विचारायला हवा. आपण कष्ट करायला हवेत. कष्टाचे फळ गोड असते, यामध्ये वादच नाही. पण, कष्टाच्या रगाड्यात जेव्हा आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण वाहत जातो, तेव्हा खरी समस्या उभी राहते. आपल्या ऐहिक मागण्या संपतच नाहीत. आपण आपल्यावरच्या मागण्यांचा विचार न करता त्यात अधिक गुंतत जातो. थोडेसे विसावून या इतक्या गोष्टींची आपल्याला खरंच मूलत: गरज आहे का, याचा विचार आज माणूस करत नाही. फक्त ‘ये दिल मांगे मोअर’ या चक्रात शिरत जातो व स्वत:ला कठीण परिस्थितीत गुंतवत जातो. येथेच खऱ्या आपल्याला स्वत:विषयी ‘कणव’ वाटणे गरजेचे आहे. आपल्याला जगरहाटीच्या सुखाच्या संकल्पनेत बसूनच स्वत:शी कठोर होणे आवश्यक आहे का? तर मुळीच नाही. माझ्याकडे आता जे आहे ते समाधानकारक आहे, असे मानून स्वत:ला ऐहिक चक्रव्यूहात न अडकविता मूलभूत समाधानात स्थिरावलेला माणूस खऱ्या अर्थाने शांतचित्र जीवन जगतो. आपल्या अनुभवांशी सच्चाईने जगण्यासारखे दुसरे आंतरिक सुख माणसाला शोधूनही सापडणार नाही. स्वत:विषयी ‘दयाभाव’ व ‘कणव’ म्हणजे स्वत:बद्दल जाणून घेणे, स्वत:ची वास्तविक काळजी घेणे. वेळोवेळी आपले मन आपल्याला आवश्यक असे सिग्नल, सूचना देतच असते. आपला ताण किती वाढला आहे? आपल्याला प्रसन्न राहण्याची केव्हा गरज आहे? आपला अमर्याद वेग कधी कमी करायचा आहे? या विविध प्रश्नांवर आपल्याला खच्चितच विवेचन करायला पाहिजे. इथेच स्वत:बद्दल आवश्यक असणारी ‘दया’ निर्माण होते. ही ‘दया’ आपल्याला वेळोवेळी आपल्या अंतर्मनात घेऊन जाते. आपण काहीतरी भव्यदिव्य केल्यावर आपल्याला स्वत:विषयी ‘कणव’ वाटण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनातच स्वत:विषयी ‘दयाभाव’ जपला पाहिजे. आकांक्षांची भरारी घेणे योग्य आहे, पण त्यात हरवून जाऊन निर्भेळ आनंदाला मुकणे ही खूप मोठी शोकांतिका होऊ शकते. आयुष्य एकदाच मिळते, म्हणून ते प्रसन्न भावनेने जगता आले तर उत्तमच!

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@