होमियोपॅथीक तपासणी (केसटेकींग) भाग-६

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |



रुग्णाच्या कामाच्या तपशीलावरून व तो कुठल्या प्रकारचे व कुठे काम करतो, यावरूनसुद्धा त्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून येण्यास मदत होते.


आरोग्यविषयक इतिहास का महत्त्वाचा असतो, हे होमियोपॅथीक तपासणीमध्ये आपण पाहिले. रुग्णाची वैयक्तिक माहिती हीदेखील तेवढीच महत्त्वाची असते. वैयक्तिक माहिती घेताना त्याच्या शारीरिक व मानसिक सवयी या दोन्ही विचारात घेतल्या जातात. प्राथमिक माहितीमध्ये सर्वप्रथम रुग्ण काय काम करतो व कुठे राहतो हे विचारले जाते. रुग्णाच्या कामाच्या तपशीलावरून व तो कुठल्या प्रकारचे व कुठे काम करतो, यावरूनसुद्धा त्याच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून येण्यास मदत होते. (Occupational hazards) उदा. गरम भट्टीमध्ये काम करणाऱ्या माणसांना त्वचारोग होऊ शकतो. तसेच बसवाहकासारख्या लोकांना सतत उभे राहिल्यामुळे पायाच्या नसांचे विकार होऊ शकतात. वॉचमनचे काम करणाऱ्या माणसाला झोप न मिळाल्यामुळे काही आजार होऊ शकतात इत्यादी. त्याचप्रमाणे रुग्ण जिथे राहतो, त्या जागेच्या आसपासच्या वातावरणाचाही त्याच्यावर परिणाम होत असतो. प्रदूषित हवेच्या जागी राहणाऱ्या माणसांना श्वसनाचे विकार व फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. पाणथळ व दमट जागी राहणाऱ्या माणसांना वाताचा विकार होऊ शकतो. म्हणून या वैयक्तिक गोष्टींची माहिती प्राथमिक माहितीत विचारली जाते.

 

यानंतर रुग्णाला कुठल्याही प्रकारचे व्यसन व सवयी आहेत का, त्याचीही माहिती विचारली जाते. बरेचदा असे होते की, रुग्ण स्वत: स्वत:च्या वाईट सवयी व व्यसनांबद्दल डॉक्टरांना काहीही सांगत नाहीत व सत्य माहिती लपवून ठेवतात. अशावेळी रुग्णांच्या बरोबर असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक किंवा मित्र यांच्याकडून सत्य माहिती जाणून घेतली जाते. सर्वसाधारणपणे पाहाण्यात आलेल्या व्यसनांमध्ये तंबाखूसेवन, धुम्रपान, मद्यपान आणि काही ड्रग्स घेणे अशी व्यसने हल्लीच्या काळामध्ये दिसून येतात. व्यसनांच्या या माहितीमुळे संभाव्य आजार आणि त्यांना सध्या असलेल्या आजाराचे मूळ शोधण्यात महत्त्वाची मदत होते. याशिवाय यामागे मानसिक कारणही असते. रुग्ण व्यसनाधीन का झाला? किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये त्याने व्यसनाला जवळ केले, याचा शोध घेतला जातो. याद्वारे आजाराचे मूळ शोधण्याचा तज्ज्ञांचा प्रयत्न असतो. व्यसनांच्या बरोबरीनेच काही लोकांना काही विशिष्ट सवयी असतात. बरेचवेळा या वाईट सवयीसुद्धा रुग्णाचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत असतात.

 

हल्लीचे उदाहरण घ्यायचे झाले तर काही लोकांना रात्री उशिरापर्यंत जागून सवय सतत टीव्ही बघण्याची सवय असते. या कारणाने त्यांची झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराचा अंतर्गत समतोल चुकतो व त्यांना पुढे जाऊन त्रास होतो. काही लोक सतत मोबाईल फोन वापरतात. रात्रीच्या अंधारातही त्यांचा मोबाईल स्क्रीन चालू असतो. या स्क्रिनच्या प्रकाशामुळे डोळे कमकुवत होणे, डोळे थकणे, मानसिक चंचलता, अस्वस्थता, चिडचिड इत्यादी लक्षणे लोकांमध्ये दिसतात. ही सर्व लक्षणे ही या वाईट सवयींमुळे निर्माण होतात. याचा अभ्यास करून त्याप्रमाणे रुग्णाला योग्य तो सल्ला दिला जातो. पुढील भागात आपण या महत्त्वाच्या मुद्द्यावर आणखी भर देणार आहोत.

डॉ. मंदार पाटकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@