मान, मद्यपान आणि अभिमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019
Total Views |



लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागतात, तसतसे चार वर्षं मतदारसंघातील केवळ मोजक्या कार्यक्रमांना हजेरी लावणारे खासदार महाशय पुन्हा जनतेसमोर झळकण्यासाठी पुढे सरसावतात. पुन्हा एकदा पक्षाने तिकीटरूपी आशीर्वाद द्यावा, यासाठी मग सगळा खटाटोप सुरू होता. आम आदमी पक्षाचे पंजाबचे खासदार भगवंत मानही याला अपवाद नाहीत. त्यांनीही नुकतीच एक मोठी घोषणा केली. घोषणा काय, एक संकल्पच जाहीर केला. हा संकल्पही काही साधासुधा नाही बरं का... हा संकल्प आहे मद्यस्पर्शमुक्तीचा. म्हणजे, एका साध्यासुध्या माणसाने असा संकल्प करण्याला फारसे महत्त्व नाहीच म्हणा. पण, चक्क खासदारमहाशयांनी असा संकल्प सोडल्यावर त्याची दखल घेतलीच पाहिजे की! माध्यमांनी भगवंत मानच्या या मद्यमुक्त जीवनशैलीची दखल तर घेतली, पण मानच्या या निर्णयामुळे कुणी सर्वाधिक खुश झाले असेल तर ते आहेत ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल. कारण, त्यांच्या मते हा काही छोटा-मोठा संकल्प नाही, तर दारू सोडणं हा भगवंत मान यांनी केलेला त्यागच आहे, असे म्हणत केजरीवालांनी आपल्या खासदाराच्या पाठीवर कौतुकाची थापच मारली. व्हा... किती हा केजरीवालांना मानचा ‘अभिमान’!! ‘आप’चे हे मानसाहेब म्हणजे अगदी अट्टल मद्यपीच. सूर्य डोक्यावर असो वा चंद्र, यांच्या हाती एकच प्याला... इतकेच काय तर लोकसभेतही मान मद्यपान करून येतात, म्हणून त्यांच्याजवळ बसायलाही एका खासदाराने नकार देऊन आपली जागा बदलण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली होती. यावरून मग काय ती कल्पना यावी. मद्यधुंद अवस्थेतील त्यांचे बोलणे, तमाशे हेही काही पंजाबी जनतेसाठी म्हणा नवीन नाहीच! पण, शेवटी हे मानही त्याच पंजाबचे जिथे ड्रग्स आणि दारू यांचा अगदी सुळसुळाट. त्यामुळे एकीकडे पक्ष, पक्षाचे संयोजक दारूमुक्त, ड्रग्समुक्त पंजाबची भाषा करतात आणि दुसरीकडे यांच्याच पक्षाचा खासदार दिवसाढवळ्या दारू पिऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात प्रवेश करतो. म्हणूनच प्रश्न पडतो की, दारू सोडायची घोषणा नेमकी निवडणुकीपूर्वीच का? चार वर्षं ढोसून जिरलेली आता एका क्षणार्धात कशी काय उतरली? कारण स्पष्ट आहे, समाजात असेच जर आपण मद्यधुंद हुंदडलो, तर ना मान मिळेल, ना लोकसभेचा तिकीटरूपी सन्मान. म्हणूनच, मग या भगवंत मानने आईशप्पथ दारूलाच बेई‘मान’ ठरवत स्वत:चेच कान पकडले.

 

महागडी अन् जीवघेणी ‘लिफ्ट’

 

बरेचदा ‘लिफ्ट’ अथवा फुकटच्या प्रवासाच्या नादात अनोळखी व्यक्तींबरोबर प्रवासाचा सोपा पर्याय स्वीकारला जातो. पण, हा फुकटचा प्रवास किती महागात पडू शकतो, याची प्रचिती नुकतीच एका मुंबईकराला आली. पुणे-मुंबई प्रवासादरम्यान लिफ्ट घेणे या इसमाच्या जीवावरही बेतले असते, पण सुदैवाने पैसे गेले, पण जीव मात्र वाचला. मुंबईतील जोगेश्वरीचे रहिवासी असलेल्या २६ वर्षीय महेश कारेकर यांच्यावर हा दुर्देवी प्रसंग ओढवला. गुरुवारी पुण्यातून मित्राच्या वाढदिवसाची पार्टी संपवून ते वाकड पुलाजवळ मुंबईच्या बससाठी थांबले होते. वेळ संध्याकाळी साडेसातची. तेवढ्यात चार जणांनी भरलेली एका गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी कारेकर यांना गाडीत बसवले. थोड्या अंतरावर गाडी गेल्यावर या चारही चोरट्यांनी कारेकर यांच्या हातातले ब्रेसलेट, त्यांचे पाकीट हिरावून घेतले. एवढेच नाही तर त्यांच्याकडून डेबिट कार्डचा पिन क्रमांकही चाकू मानगुटीवर ठेवून बळजबरीने मिळवला. त्यानंतर उर्से टोलनाक्याच्या आधी या भामट्यांनी कारेकरांना गाडीतून बाहेर फेकून दिले आणि गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने सुसाट नेली. या चोरट्यांनी कारेकर यांच्या खात्यातून २६ हजार रोख रक्कम काढली. या प्रकरणाचा सध्या हिंजवडी पोलीस तपास करीत असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू आहे. खरं तर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घडलेली ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा बऱ्याच घटना घडल्याची नोंद आहे. यावर उपाय एकच की, प्रवाशांनी कुठल्याही प्रकारे खाजगी वाहनांतून लिफ्ट स्वीकारता कामा नये. बस अथवा रेल्वे येईपर्यंत थोडा वेळ गेला तरी चालेल, पण सार्वजनिक वाहतूक हाच अशावेळी सुरक्षित वाहतुकीचा पर्याय ठरतो. उगाच, पैसे न देता आपला प्रवास फुकटात होईल, या विचाराने अशा लिफ्ट घेणे तसेच लिफ्ट देणेही तितकेच धोकादायक ठरू शकते, याची जाणीव ठेवावी. शक्यतो प्रवासात मौल्यवान गोष्टी सोबत बाळगू नयेच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या डेबिट, क्रेडिट कार्डचा खरा पिन क्रमांक कोणत्याही परिस्थितीत शेअर करणे योग्य नाही. अशा परिस्थितीतून सुटका करण्यासाठी म्हणूनच अगदी शिताफीने मदत मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. पण, खरं तर अशी वेळ आपल्यावर ओढवू नयेच म्हणून लिफ्ट घेणे किंवा अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देणे दोन्ही कटाक्षाने टाळायला हवे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@