मोदीद्वेष्ट्यांचा मेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
देशाला विकासाकडे घेऊन जावे वा भारताला जगात विश्वगुरूचे स्थान मिळावे म्हणून नव्हे तर मतलब साधण्यासाठीच ही खुळ्यामागे धावणाऱ्या वेड्यांची जत्रा जमली होती. एका राष्ट्रनिष्ठ माणसाच्या द्वेषाने पछाडलेल्या अतृप्त आत्म्यांचा हा कळप होता.
 

मायभूमीच्या ऋणांचे पांग फेडण्यासाठी गेली साडेचार वर्षे न थांबता, न थकता कष्ट उपसणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात स्वार्थासाठी इमान विकणाऱ्या बुणग्यांनी शनिवारी कोलकात्यात गर्दी गेली. एरवी एकमेकांविरोधात कंठशोष करण्यातच ज्यांची हयात गेली, तेदेखील यावेळी एकमेकांची पाठ खाजवताना दिसले. का? कशासाठी? तर एका माणसाच्या प्रामाणिकपणामुळे सगळ्याच भ्रष्टांच्या अस्तित्वाला सुरूंग लागला म्हणूनच ना? सरकार कोणाचेही असो, आपापल्या मलिद्याची सोय करणाऱ्यांना दिवसरात्र उपवास पडू लागला म्हणूनच ना? सत्तेवर आले की, परस्परांना टोची मारत जनतेला ओरबाडून खाणारी ही जमात काल एकाच मंचावर आली, ती आपल्या उलट्यासुलट्या धंद्याला घरघर लागली म्हणूनच ना? देशाला विकासाकडे घेऊन जावे वा भारताला जगात विश्वगुरूचे स्थान मिळावे म्हणून नव्हे तर मतलब साधण्यासाठीच ही खुळ्यामागे धावणाऱ्या वेड्यांची जत्रा जमली होती. एका राष्ट्रनिष्ठ माणसाच्या द्वेषाने पछाडलेल्या अतृप्त आत्म्यांचा हा कळप होता. आपापल्या क्षेत्रात, आपापल्या राज्यात अपयशाचे मानकरी झालेले शिंगांना बेगड अन् गुडघ्याला बाशिंग लावून इथे आले होते. अर्थात कसेही आले तरी या सगळ्यांच्याच अंगावरच्या झुली मात्र स्वमतांधतेच्या, जातीयवादाच्या, लांगूलचालनाच्या अन् भ्रष्टवादाच्याच होत्या. खरे म्हणजे ‘चोर चोर मौसेरे भाई’ ही म्हण खरी करून दाखविणारा हा क्षण होता. भाजपला अन् मोदींना पाण्यात पाहणाऱ्यांच्या दृष्टीने मात्र हा सुवर्णक्षण ठरला किंवा तसा आभास निर्माण केला गेला. असाच आनंद या लोकांना कर्नाटकात कुमारस्वामींच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळीही झाला होता. तिथेही यातल्याच कित्येकांनी हात उंचावून आपल्यातल्या एकीचा पाळणा हलवला होता. पण गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी पाहिल्या की, ही मंडळी सत्तेच्या ताटातला मनासारखा वाटा मिळाला नाही की, कसा सगळ्याच गोष्टींचा कोळसा करतात, हेही अवघ्या देशाने बघितले. तेव्हा अशा लोकांना आगामी निवडणुकीत जनतेने देशाची कमान सोपवण्याची नुसती कल्पना करणेदेखील आत्मघातीच ठरू शकते. अर्थात देशभरातल्या जनतेने या प्रत्येकाचीच कुवत अन् पात्रता जोखली असल्याने ती या लोकांच्या पदरात मूठभर दान टाकण्याचीसुद्धा शक्यता नाहीच. कारण सूर्यकिरणांच्या कवडशामुळे राडारोडाही सोनेरी रंगाने तळपताना दिसतो, पण उचलू म्हणून म्हटलं की हाती येणारा चिखलच असतो.

 

आज मोदींना विरोध करणाऱ्या मंडळींनी मोदी मैदानात नसते तर एकमेकांच्या उरावर बसायलाही कमी केले नसते. म्हणजेच ही मंडळी कोणत्याही एका तत्त्वासाठी वा विचारधारेसाठी टोळक्या-टोळक्याने एकत्र आलेली नाहीत. या लोकांचे तत्त्व एकच, विचारधारा एकच; स्वार्थपरायणता. आपल्या हितसंबंधांच्या आड जो जो येईल, तो तो यांचा विरोधक अन् शत्रूच. कोणीतरी म्हटलेच आहे ना की, वाईट काम करून जितके शत्रू निर्माण होत नाहीत, तितके शत्रू चांगले काम करून निर्माण होतात. त्याचीच प्रचिती सध्या येते आहे. हे सगळे शत्रू मोदींनी केलेल्या चांगल्या कामामुळेच निर्माण झालेले आहेत. मोदींच्या देशविकासाच्या, जनविकासाच्या चांगल्या कामांमुळे ज्यांची दुकाने बंद झाली, ती ही सगळी मंडळी आहेत. परिणामी हे जसे मोदींचे विरोधक आहेत, तसेच ते चांगुलपणाचे, सत्याचे आणि जनतेचेही विरोधक ठरतात. पण एका व्यक्तीविरोधात झुंडीने एकत्र आलेल्यांवरून जनतेला प्रामाणिक कोण हेही चांगलेच समजते. म्हणूनच ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या विरोधकांचे हे कडबोळे जनतेच्या मनात घर करण्याची शक्यता नाहीच. परिणामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांच्या एकीची पराभवरूपी चटणी झालेलीच सर्वांना पाहायला मिळेल, याची खात्री वाटते.

 

शनिवारच्या ‘गठबंधन’ की ‘ठगबंधन’ मेळाव्यात सत्ता लालसेने एकत्र आलेल्यांचे वास्तव नेमके काय? शिवाय या सगळ्यात काँग्रेसची स्थिती काय राहिल, याचाही विचार केला पाहिजे. देशात भाजप आणि काँग्रेस हेच सध्या तरी प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असलेले राष्ट्रीय पक्ष आहेत. यापैकी भाजपविरोधात ज्याला देशभरात लढायचे आहे, त्या पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच राहुल गांधींनी ममतांच्या मेळाव्यात हजेरी लावलेली नाही. कदाचित आपल्या उपस्थितीमुळे ममतांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेला आपणही पाठिंबा दिल्यासारखे होईल म्हणूनच ते तिथे गेले नसावेत. तर काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे या आपल्या प्रतिनिधीला तिथे पाठवले. यातून काँग्रेसने आपल्याला ममतांचे देशव्यापी नेतृत्व मान्य नसल्याचाच संदेश दिल्याचे दिसते. दुसरीकडे काँग्रेसला कित्येक राज्यात भाजपसह मोदींना हरवण्यासाठी आपले पुरोगामित्व पाण्यात बुडवून बसलेल्यांशीही लढावे लागेल. यात उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण व दिल्लीचा समावेश होतो. कोलकात्यातील मेळाव्यात सहभागी झालेल्या अनेकांशी काँग्रेसचा वर उल्लेख केलेल्या राज्यात छत्तीसचा आकडा आहे. इथल्या जागांची संख्या होते १५०. पश्चिम बंगालमध्येही लोकसभेच्या ४२ जागांवर काँग्रेस वा तृणमूल काँग्रेसच्या आघाडीत एकमत नाही. सोबतच तिथे भाजपबरोबरच डाव्यांशीही त्यांना लढावेच लागेल. कर्नाटक, तामिळनाडू आणि जम्मू-काश्मीरमध्येही अशीच स्थिती आहे, इथेही विरोधकांचे ऐक्य विखुरलेलेच दिसते. उल्लेखनीय म्हणजे अशा तिरंगी लढती होऊ शकणाऱ्या राज्यांची संख्या ९ इतकी आहे, जिथे लोकसभेच्या ५४३ पैकी ४४ टक्के म्हणजेच २३७ जागा आहेत. या सर्वच ठिकाणी भाजपविरोधात महाआघाडीच्या एकाच उमेदवाराची शक्यता जवळपास नाहीच. मग तरीही हा महाआघाडीचा खेळ नेमका का खेळला गेला? अर्थातच यामागे ममतांच्या राजकारणाची चलाखी आहे. राज्यातल्या ढासळत्या लोकप्रियतेने पायाखालची वाळू सरकलेल्या ममतांना आपल्या राज्यात स्वतःची अन् स्वतःच्या पक्षाची खुंटी बळकट करायची आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्या विरोधकांच्या महाआघाडीचा डाव आखला. देशावर राज्य करायला तर मिळणार नाहीच, पण निदान राज्य तरी हातचे जाऊ नये, असे हे गणित आहे. जे भाजपने मारलेल्या मुसंडीमुळे त्यांनी मांडले. पण हे गणित सुटणार तर नाहीच आणि जरी सुटले तरी ममतांची बाकी शून्य करूनच सुटेल, हे नक्की.

 

पुन्हा नरेंद्र मोदीच का? हाही विचार देशातल्या जनतेने केला आहे. उज्ज्वला योजनेपासून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान, जनधन योजना, कृषी विमा, मुद्रा, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, पेन्शन योजना आदी अनेक लोककल्याणकारी योजनांबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासातील धडाडी, परकीय गुंतवणुकीत झालेली वाढ, भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शकता युक्त आणि सुरक्षित कारभार यामुळे जनतेला मोदीच पुन्हा देशाच्या सर्वोच्च पदावर हवे आहेत. गेली ७० वर्षे एकाच घराण्याच्या किंवा घराण्याच्या आधाराने खुरडत वाढलेल्या अंधाऱ्या माणसांचे राज्य देशाने अनुभवले. आज मात्र जनतेला दशकानुदशके अंधारात लोटणाऱ्या नव्हे तर अंधाराला दिपवून, उजळवून टाकणाऱ्या तळपत्या तेजाचे राज्य हवे आहे आणि हेच प्रकाशकण हाती घेऊन चालण्याचे कार्य गेली साडेचार वर्षे मोदींनी केले. पण अंधारातच आपल्या कारवाया करणाऱ्यांना ते कसे आवडेल? सगळीकडेच प्रकाश अन् प्रकाश झाला तर त्यांच्या कारवायाच थांबतील ना! म्हणूनच हे अंधाऱ्या मार्गावरचे वाटमारे आज एकत्र आल्याचे दिसते. पण जनता सुज्ञ आहे आणि ती या वाटमाऱ्यांना नव्हे तर देशाला उजेडाच्या गावी घेऊन जाणाऱ्यालाच साथ देईल, हे निश्चित.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@