समानतेचे सूत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2019
Total Views |

 


 
 
 
 
स्त्री-पुरुष समानता म्हणजे मुले व मुली यांच्या भूमिकांची अदलाबदल करणे नसून, मुळात अशा काही वेगवेगळ्या भूमिका नाहीत, हे स्वीकारणे. प्रत्येक मुलाला-मुलीला त्यांच्या गुणदोषांसकट एक व्यक्ती म्हणून स्वीकारणे व त्यांच्या विकासाला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. गरजेपुरता स्वयंपाक, घरगुती साधनांची दुरुस्ती, आपले कपडे, वस्तू यांचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, संभाषण, सामाजिक नियमांचे/संकेतांचे पालन यासारखी जीवनावश्यक कौशल्ये मुले, मुली दोघांनाही यायला हवीत याचा आग्रह धरणे म्हणजे खरी समानता.
 

प को तो पता हैं, हमारे समाज में लडकियोंको ज्यादा नहीं पढाते। हम इसे पढाना चाहते हैं, अपने पैरोंपे खडा करना चाहते हैं। और यह हैं की, पढाई का सिरीयसनेस ही नहीं। हम तीन बेहेनोंको हमारे पेरेंट्स ने ज्यादा नहीं पढाया। लेकीन हम बेटीको बहुत पढाना चाहते हैं। पर यह समझे तब ना?” मध्यमवर्गीय घरात वाढलेली, लग्नानंतर श्रीमंत, भलामोठा परिवार असलेल्या घरात गृहिणीपणाच्या कर्तव्यात अडकलेली ती आई खूप कळकळीने बोलत होती. गृहिणी, सून, पत्नी, आई म्हणून आपली कर्तव्ये चोख पार पाडताना मनात एका स्वप्नाळू मुलीला तिने जपून ठेवले होते. मुलीच्या जन्मानंतर तिने मनापासून ठरवले असणार की, ‘हिला उंच भरारी घेऊ द्यायची. त्यापायी मला झगडावे लागले तरी चालेल.’ आज आपल्या १६ वर्षांच्या मुलीपर्यंत आपली कळकळ पोहोचत नाही, याचा तिला खूप त्रास होत होता. या कुटुंबाचा विचार करताना मला एक बाब पुन्हा पुन्हा सलत होती. शिक्षणासारखी मूलभूत गोष्ट आजही काही कुटुंबांतून मुलींना उपलब्ध होत नाही. यामध्ये कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकस्तराचा काहीही संबंध नाही. संबंध आहे तो फक्त विचारांचा, प्रवृत्तीचा. सामाजिक पातळीवर स्त्री-पुरुष सामानतेच्या गप्पा मारताना आपण कौटुंबिक पातळीवर ती समानता खरेच आणतो आहोत का?

 

Men are expected to be apologetic for their weaknesses and women for their strengths असे वाचले होते. खरेतर आपली बलस्थाने व कमतरता यापैकी कशाबद्दलही अपराधी वाटणे घातकच आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात आजही कितीतरी घरांमध्ये कळत-नकळत मुला-मुलींमध्ये भेद केला जातो. यातून आपण केवळ मुलींचेच नाही, तर मुलांचेही नुकसान करतो आहोत हे पालकांनी जाणायला हवे. विशेषत: पौगंडावस्थेतील मुला-मुलींना याद्वारे मिळणारा संदेश त्यांच्या सर्वांगिण विकासात अडथळा ठरू शकतो. या वयातील मुले स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवत असतात. अशावेळी त्यांना, रडतोस काय मुलींसारखा?, मुलीच्या जातीनं असे पाय वर घेऊन बसू नाही, तू मदत कर मला, मुलीला स्वयंपाक यायलाच हवा, कायदा मुलींच्या बाजूने असतो बाबा, ती काहीही बोलली तरी तू उलट उत्तर देऊ नको, तो मुलगा आहे, उशिरापर्यंत घराबाहेर राहिला तर चालतं गं. मुलींसाठी जग फार वाईट आहे बाई. तू वेळेत घरी ये, मुलगी असून घाण शिव्या देते, याची बहीण उद्या लग्न होऊन जाईल. फॅमिली बिझनेस यालाच सांभाळायचाय, पण हा अभ्यासात डोकंच घालत नाही, कुटुंबीयांच्या, शिक्षकांच्या तोंडून सहजपणे बाहेर पडणारी वाक्ये मुलांच्या मनावर खोल परिणाम करून जातात. त्यातून स्वतःचा बिनशर्त स्वीकार होत नाही. या भावनेची निष्पत्ती म्हणून एकतर आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते अथवा टोकाचा विद्रोह उद्भवतो.

 

सध्याच्या मॉडर्न (?) जगात, मुलींना मुलांसारखे वाढवण्याचा ट्रेंड अंगिकारला जात आहे. याच्या जोडीने ‘मुलांना मुलींसारखे वाढवणेदेखील गरजेचे आहे’ असाही युक्तिवाद होत आहे. मनोविकासाची अभ्यासक म्हणून मला ही विचारसरणी चुकीची वाटते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘मुलांना व मुलींना वाढवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात’ हे यात गृहीत धरले आहे. स्त्री-पुरुष समानता म्हणजे मुले व मुली यांच्या भूमिकांची अदलाबदल करणे नसून, मुळात अशा काही वेगवेगळ्या भूमिका नाहीत, हे स्वीकारणे. प्रत्येक मुलाला-मुलीला त्यांच्या गुणदोषांसकट एक व्यक्ती म्हणून स्वीकारणे व त्यांच्या विकासाला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. गरजेपुरता स्वयंपाक, घरगुती साधनांची दुरुस्ती, आपले कपडे, वस्तू यांचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, संभाषण, सामाजिक नियमांचे/संकेतांचे पालन यासारखी जीवनावश्यक कौशल्ये मुले, मुली दोघांनाही यायला हवीत याचा आग्रह धरणे म्हणजे खरी समानता. समाधानी आयुष्य जगण्यासाठी लागणारी सक्षमता लिंगनिरपेक्ष असते हे स्वीकारणे व आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. नाहीतर टेलिव्हिजन, मीडियावरून दुर्दैवाने सतत काना-डोळ्यांवर आदळणारे लिंगभेदाचे नमुने खरे मानून आपली मुले संभ्रमित होत राहतील.

 
 
 - गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@